निघोजे गावाच्या हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रात रात्रीच्या वेळी वाळूचोरी..
खेड तालुक्यातील निघोजे गावाच्या हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रात रात्रीच्या वेळी वाळू तस्करांकडून दहशतीच्या जोरावर मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी केली जात आहे. धक्कादायक म्हणजे तालुका महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्याचा अत्यंत जवळचा नातेवाईक या वाळूचोरीचा सूत्रधार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. त्यामुळे संबंधित वाळू चोरांवर कारवाई कोण करणार? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. एकंदरीतच थेट महसूल अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने होत असलेल्या वाळूचोरीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. खेड तालुका आम्हाला आंदणच मिळालेला आहे, असाच समज संबंधितांचा झालेला आहे.
दरम्यान शुक्रवार दि, २९ रोजी संबंधित तलाठी वाळू चोरी होत असलेल्या ठिकाणी कारवाईसाठी समक्ष गेले होते. त्याठिकाणी वाळूने भरलेल्या गाड्या व पोकलेन मशीन तसेच ट्रॅक्टर देखील घटनास्थळी होता. परंतु संबंधितांवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबची माहिती अशी की, गेल्या दोन आठवड्यांपासून निघोजे गावाच्या हद्दीत असलेल्या इंद्रायणी नदी पात्रात वाळू चोरांकडून रात्रीच्या वेळी तीन ते चार पोकलेन मशीनच्या साहाय्याने प्रचंड प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. उपसा केलेल्या वाळूची रात्रीतूनच हायवा गाड्यांमधून वाहतूक केली जाते. दररोज तीस ते चाळीस गाड्या इतकी वाळू नदी पात्रातून काढली जात असल्याचे समजते. दिवसा पोकलेन मशीन बाजूला काढून ठेवले जातात.
हा सर्व प्रकार महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना व स्थानिकांना माहित आहे. परंतु वाळूचोरी करणारे वाळूतस्कर हे एका महसूल अधिकाऱ्याशी निगडीत असल्यामुळे त्यांच्यावर ते कारवाई करू शकत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
निघोजे येथील इंद्रायणी नदी पात्रात होत असलेल्या बेकायदा वाळू उत्खननबाबत माहिती मिळाली आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर निश्चितच योग्य ती कारवाई केली जाईल.
संजय तेली ( प्रांताधिकारी, खेड).
खेड तालुक्यात वाळू, मुरुम व माती यासारख्या गौण खनिजाच्या चोरीत काही टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. हा सर्व प्रकार महसूल विभागाला माहिती आहे. परंतु आचारसंहितेच्या नावाखाली महसूल अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. काही महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानेच या चोऱ्या होत आहेत. परिणामी शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या गोष्टींना पायबंद घालण्यासाठी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
पै. बाळासाहेब चौधरी ( सामाजिक कार्यकर्ते).

