‘पुणे ग्रॅंड टूर’साठी वर्क ऑर्डर न काढताच रस्त्यांच्या कामांचा सपाटा?

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

काकूबाई खिंड

पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रॅंड टूर-२०२७’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्यांच्या रूंदीकणाची कामे कोणत्याही वर्क ऑर्डरशिवाय जोरात चालू असल्याचे समजते. तसेच या कामांसंबंधीची निविदा प्रक्रिया ही जरी कागदोपत्री पूर्ण झालेली असली तरी प्रस्ताव खाली आल्याशिवाय वर्क ऑर्डर काढता येत नाही.

साधारणतः गेल्या दिड महिन्यापासून सदर सायकल ट्रॅक रस्त्यांची कामे सुरू आहेत. वर्क ऑर्डरशिवायच जवळपास चाळीस ते पन्नास टक्के इतकी कामे पूर्ण देखील करण्यात आलेली आहेत. ठराविक ठेकेदारांनाच या कामांचे वाटप करण्यात आलेले आहे.

या प्रकारची गंभीर दखल घेऊन सर्व ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाच्या ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डरशिवाय कामे करण्यास हिरवा कंदील दाखवला, त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी पश्चिम भागातील लोकांची मागणी आहे.

धक्कादायक म्हणजे पश्चिम भागातील पर्सूल-कुडे बुद्रूक सीमेवरील पर्सुल फाट्याजवळ असलेल्या काकूबाई खिंडीत रस्त्याचे रूंदीकरण करताना संबंधित ठेकेदाराने बेकायदेशीरपणे रस्त्याच्याकडेची झाडे जेसीबी, पोकलेनने तोडून टाकलेली आहेत. एकंदरीतच वनविभागाने देखील या वृक्षतोडीकडे दुर्लक्षच केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. तसेच संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याची मशिनरी जप्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान खेड तालुक्यात जी कामे केली जात आहेत, त्या बहुतांश कामांमध्ये या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचा मोठा हिस्सा आहे. कारण सायकल ट्रॅकच्या लाभार्थ्यांमध्ये लोकप्रतिनिधीच्या अतिशय जवळच्या गणगोताचाच जास्त भरणा आहे. या लाभार्थी यादीमध्ये खुद्द स्वतः व स्वतःच्या पोरांसोबतच व्याही, मावसभाऊ, मेव्हणे, भाचा, पुतणे यांचा समावेश आहे. दुसऱ्यांच्या नावावर कामे घेऊन ती या लाभार्थ्यांना वाटण्यात आलेली आहेत. एकंदरीतच खेड तालुक्याचा ठेकेदारी व्यवसाय तालुक्याचा प्रमुख लोकप्रतिनिधी व त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात गेलेला आहे.

त्यातच एखाद दुसरा अपवाद वगळता बहुतांश कामांचे प्रस्ताव अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभाग ( उत्तर ) पुणे कार्यालयात आलेले नसल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. प्रस्ताव खाली आल्याशिवाय वर्क ऑर्डर काढता येत नाही, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच याबाबत खेड तालुक्यातील ठेकेदारांमध्चे अशीही कूजबूज आहे की, पुणे जिल्ह्याची जबाबदारी सांभाळण्याऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तोंडी आदेश देऊन रस्त्यांची कामे करण्यास ठेकेदारांना सांगितलेले आहे. ‘आधी कामे सुरू करा, वर्क ऑर्डरचे आचारसंहिता संपल्यावर पाहू, असा दिलासा या वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित ठेकेदारांना दिलेला असल्याचे खात्रीलायक समजते.

नियम बनवणारेच नियम पायदळी तुडवत असतील तर काय म्हणायचे?

दरम्यान कोट्यवधींची कामे ठराविक ठेकेदारांना मिळावी, यासाठी निविदा भरण्यासाठी यावेळी अतिशय जाचक अटी घालण्यात आल्या. त्यामुळे अनेक ठेकेदारांना निविदा भरता आल्या नाहीत. एखाद दुसरा अपवाद वगळता जवळपास सर्वच कामे ही अधिकारी व ठेकेदारांनी ‘मॅनेज’ केलेली आहेत. या कामांमध्ये मोठाच आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. संबंधित जवळपास सर्वच कामे ‘मॅनेज’ करण्यात आलेली असल्यामुळे ठेकेदारांनी सुमारे ‘१५%’ इतक्या शेतसाऱ्याचे वाटप केलेले आहे. या शेतसाऱ्याचा मोठा नैवेद्य तालुक्याच्या पालकत्वाची जबाबदारी सांभाळण्याला ‘कबूल’ करण्यात आला आहे.

वर्क ऑर्डर तथा कार्यारंभ आदेश नसताना केवळ निविदा प्रक्रिया पूर्ण झाली म्हणून कामे सुरू करणे पूर्णपणे बेकायदेशीर, नियमबाह्य आहे. त्यामुळे कार्यारंभ आदेशाशिवाय कामे सुरू करणाऱ्या ठेकेदारांचे कोणत्याही प्रकारे देयक न काढता त्यांच्यावर तसेच कामे मॅनेज करण्याऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर देखील प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

खेड तालुक्यात ज्या मोजक्याच ठेकेदारांना कामांचे वाटप करण्यात आलेले आहे, त्यामध्ये एका बड्या वृत्तपत्राचा बातमीदार पण असून त्याने खेड तालुक्यातील एका ठेकेदाराच्या नावे काम घेतलेले आहे. नेत्यांच्या खास मर्जीतील असलेला हा बातमीदार खेड व आंबेगाव तालुक्यात एक मोठा ठेकेदार म्हणून नावारूपाला आलेला आहे.

खेड तालुक्यातील ज्या ठेकेदारांना संबंधित रस्त्यांची कामे मॅनेज करून मिळालेली असल्याचे समजते, त्यापैकी दोन ठेकेदार हे तालुक्याच्या लोकप्रतिनिधीच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय असून त्यापैकी एक ठेकेदार हा तालुक्यात ‘शॅडो आमदार’ म्हणून ओळखला जातो. हा शॅडो आमदाराने दुसऱ्याांच्या नावावर देखील कामे घेतलेली असल्याची चर्चा आहे. निकृष्ट दर्जांची कामे करण्यात हा ठेकेदार भलताच पटाईत आहे. तालुक्यातील बहुतांश मोठी कामे ही या दोघांनाच मिळतात, असेही बोलले जाते. तसेच उर्वरित कामे ही लोकप्रतिनिधीच्या इतर टिल्ल्या पिल्ल्या ठेकेदारांमध्ये वाटली जातात. मुख्यत्वे करून तालुक्याचे जे दोन बडे ठेकेदार आहेत, त्यांच्या कामात लोकप्रतिनिधी हा स्लीपिंग पार्टनर आहे. या तिघांनी तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातलेला असल्याचे ठेकेदारांमध्ये बोलले जाते.

दरम्यान पुणे प्रादेशिक बांधकाम विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याने नांव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) पुणे अंतर्गत खेड, आंबेगाव व जुन्नर या तीन तालुक्यात गेल्या एक ते दिड महिन्यांपासून ‘पुणे ग्रॅंड टूर-२०२७’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी रस्ते तयार करण्याचे कामे चालू आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असली तरी या कामांसाठी अद्यापही वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही. काही कामांचे प्रस्ताव प्रलंबित असून संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच वर्क ऑर्डर दिली जाईल. तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्याने असेही सांगितले की, कामांना तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून वर्क ऑर्डर मागच्या तारखेची दिली जाऊ शकते.