द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

‘पहिली उचल पाच हजार रुपये द्यायला काय तुमच्या काकाने पैसे ठेवलेत का? कुठून देणार पाच हजार? कारखाने चालवून दाखवा.’

वरील मस्तवाल व असंवेदनशील वक्तव्य हे कुणा एखाद्या एैऱ्यागैऱ्या हूरडाभूक्या वा वाचाळवीर गल्लीतील नेत्यांचे वा कार्यकर्त्यांचे नाही. हे वक्तव्य आहे ते राज्याच्या सत्तेत अनेक वर्षे विविध मलईदार खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपदे उपभोगलेले तसेच विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहिलेल्या अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे यांचे. 

महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच जे काही संस्कारी व सुसंस्कृत असे नेते आहेत, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगांव तालुक्याचे विद्यमान आमदार व माजी मंत्री दिलीपराव वळसे यांचे देखील नांव घ्यावे लागेल. त्यातच कितीही कडवा विरोधक असला तरी त्याच्याबद्दल सार्वजनिकरीत्या अजिबात आक्षेपार्ह वा फालतू शब्दांत टिका न करता त्याचा शालजोडीतून समाचार घेणारे देशाचे ज्येष्ठ नेते शरदराव पवारांचे दिलीप वळसे हे तर मानसपुत्र. तरीदेखील वळसेंचा तोल एवढा कसा घसरला? 

दिलीप वळसे शरदराव पवारांच्याच मुशीत घडले अन् दुर्दैव असे की शरदरावांची साथ सुटताच बिघडले. असे म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही. 

दिलीप वळसे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झाले, आयुष्यभर राजकारण करत आहेत, विविध पदे उपभोगली अन् त्याच शेतकऱ्यांच्या ऊस दरासंबंधी ते असे वक्तव्य करतात, हे खुपच लाजिरवाणे व वाईट आहे. जसे की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या अगणित संपत्तीतून शेतकऱ्यांना पाच हजारांची पहिली उचल देणार आहात. साखर कारखाने ही शेतकऱ्यांचीच संस्था वा संपत्ती आहे. परंतु तुम्हा नेत्यांनी या साखर कारखान्यांना स्वतःची जहागीर बनवलेली आहे.

असे वक्तव्य करण्यापूर्वी वळसेंनी शंभर वेळा विचार करायला पाहिजे होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा राजकीय स्मृतीभ्रंश झाला की काय? अशीच शंका येते. त्यामुळे एखादेवेळी ते कुणाला काही फेकून मारतील अशी भीती वाटते. आणि याची काहीच हमी देता येणार नाही. खुपच अवघड विषय झालेला आहे त्यांचा. असो. 

दिलीपराव, साखर कारखानदारी अडचणीत येण्यामागे तुम्हीच राजकारणी जबाबदार आहात. तुमचेच गैरव्यवस्थापन जबाबदार आहे. साखर कारखान्यांना तुम्हा राजकारण्यांनीच राजकीय अड्डे बनवलेले आहेत. सुतळी, गोण्यां, बारदाण्यांपासून सर्वच पुरवठा साखळ्या तुमच्याच घरात, नात्यागोत्यांत, जवळच्या पंटरांच्या हातात आहेत. तसेच साखर कारखानदारीनेच राज्यातील जलव्यवस्थापनाचे पुरते वाटोळे केलेले आहे. 

साखर कारखाने तुम्ही देशोधडीला लावायचे, कर्जांच्या विळख्यात घालायचे व शेतकऱ्यांनी जादा ऊसदराची मागणी केली तर त्यांनाच म्हणायचे की कारखाने चालवून दाखवा? 

दरम्यान वळसेंची उन्मत भाषा बघता त्यांना काका ऐवजी बापच म्हणायचे होते. परंतु त्यांनी तोंडात आलेला बाप हा शब्द ऐनवेळी आवंढ्या सारखा गिळून टाकला व काकावर येऊन थांबले. 

हल्ली वळसे असे अचानक काय बिघडतात? हेच कळेनासे झालेले आहे. ते खुपच चिडचिडे आलेले आहेत. राजकीय उपचारांसाठी त्यांना खरोखरच एखाद्या चांगल्या सामाजिक मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. 

कदाचित गेल्या विधानसभा निवडणूकीत जिंकूनही पराभूत झाल्यामुळे त्यांनी आपल्या जीभेवरील ताबा सोडलेला आहे. दुसऱ्या भाषेत दिलीपरावांनी खरोखरच तारतम्य सोडून दिलेले दिसते. कंबरेचे सोडून डोक्याला बांधलेले आहे. 

हल्ली ते नेहमीच आपल्या विरोधकांबद्दल फारच टोकाचे व अद्वातद्वा बोलत असतात. कुणी काही टिका केली तर, लगेच प्रत्युत्तर देऊन मोकळे होतात. त्यांचा संयम पूर्णतः ढासळलेला आहे. त्यांचा स्वतःवरचा ताबाच राहिलेला नसल्याचे दिसून येते. एका अर्थाने त्यांचे राजकीय संतुलनच बिघडलेले आहे. राज्य स्तरावरचे नेते म्हणून ओळखले जाऊनही ते आता स्वतःची बराबरी वा तुलना थेट गल्लीतील कार्यकर्त्यांशी करून त्यांच्यासोबत वाद घालत असतात. भांडणे करत असतात. 

दिलीपराव उमेदीत घडले परंतु उतारवयात बिघडले. 

राजाश्रय मिळाल्यामुळे अलिकडच्या काळात राज्यात वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळेच कदाचित त्याचा परिणाम त्यांच्या मनावर झालेला दिसतोय.  

दुसरीकडे गेल्या महिन्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलीप वळसे व देवदत्त निकम यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी बोलताना वळसे यांनी आपलेच जुने सहकारी असलेल्या देवदत्त निकमांना साखर कारखान्याचे संचालक केले, चेअरमन केले, लोकसभेला उमेदवारी मिळवून दिली, असे सुनावले होते. एकप्रकारे वळसेंनी निकमांवर केलेल्या उपकाराची जाणीव करून दिली होती. 

मुळातच देवदत्त निकमांची लायकी होती, म्हणूनच तुम्ही त्यांना संघी दिली. उपकाराची भाषा काय करताय? लायकी नसती तर निकमांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एवढे मोठे मतदान झाले असते का?

दिलीपराव, निकमांविरोधात तुम्ही फक्त १५२३ मतांनी विजयी झालेला आहात. हे विसरू नका. हा तुमचा मानहानीकारक विजय आहे. अपक्ष देवदत्त निकम नावाच्या व्यक्तीला उभा केला नसता तर, तुमचा कार्यक्रमच झाला होता. उगा कशाला बाता मारता? तालुक्यातील लोकं मोठ्या संख्येने तुम्हाला का सोडून गेले, याचे आत्मपरीक्षण करा एकदा. ते बिचारे देवदत्त निकम तुमची सावली म्हणूनच वावरत होते. तुमच्यासाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतले आहे.

दरम्यान शरदराव पवारांनी तुम्हाला काय कमी केले? तुम्हाला तर आमदार केले, मंत्री केले, विधानसभेचे अध्यक्ष केले. जे नाही ते दिले. तुम्ही आज जे काही आहात ते केवळ शरदराव पवारांमुळेच आहात. त्यांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवला नसता तर तुम्ही आज घोडेगांव नाही तर पुणे जिल्हा न्यायालयात वकिली करत असता. तरीही तुम्ही त्यांच्याशी एवढा कृतघ्नपणा करून त्यांची साथ सोडली. त्यामुळे देवदत्त निकमांना बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच कसा पोहचतो?

तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवून देऊन मीच तुम्हाला निवडणुकीला उभं केलं होतं, असेही वळसे म्हणाले. वळसेंच्या या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. मुळातच तत्कालीन खासदार शिवाजीराव अढळराव यांच्यासोबत लढायला लागून बळी जाऊ नये म्हणूनच वळसेंनी स्वतः ऐवजी देवदत्त निकमांना बळेच घोड्यावर बसविले व त्यांचा बळी दिला. 

मुळातच अढळराव यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढविण्याची वळसेंमध्ये हिंमतच नव्हती. अढळराव यांच्याविरोधात निवडणूक लढवली तर आपले डिपॉझिट जप्त होईल, या भितीनेच वळसे मैदानातून …… ला पाय लावून पळाले होते. 

अढळराव यांच्याविरोधात पक्षाचा उमेदवार द्यायचा म्हणून निकमांच्या गळ्यात उमेदवारी घातली, बाकी काही नाही. त्याआधी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील अढळराव यांच्याविरोधात माजी आमदार विलास लांडे यांचा बळी दिला होता. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे वळसे पळकुटे आहेत. 

जर वळसे स्वतःला खरोखर राज्य स्तरावरील नेते समजत असते तर त्यांनी २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत शिवाजीराव अढळराव यांच्याविरोधात नक्कीच निवडणूक लढविली असती. परंतु केवळ पराभवाच्या भितीने वळसेंनी दोन्ही निवडणुकांमधून सपशेल माघार घेतली होती. 

२००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघात अढळराव यांची प्रचंड हवा होती. त्यांच्याविरोधात कुणाचाच निभाव लागणे शक्य नव्हते. परिस्थितीच अशी होती की अढळराव यांच्याविरोधात अगदी शरदराव पवार व स्व. अजित पवार जरी उभे राहिले असते, तर त्यांना धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले असते. मग तिथे दिलीप वळसे ‘किस खेत की मूली?’ होते. आणि याच भीतीपोटी वळसेंनी अढळराव यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची कधी स्वप्नात देखील हिंमत केली नाही. ही अतिशयोक्ती नसून वस्तुस्थिती आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत शिवाजीराव अढळराव यांच्याविरोधात देवदत्त निकमांना जेवढी मते मिळाली होती, तेवढी मते वळसेंना देखील मिळाली नसती. 

असो. घडले…बिघडले तरी गुर्मी मात्र जात नाही. 

थोडक्यात काय तर ‘सुंभ जळाला तरी पीळ जात नाही’.