लाजत लाजत न लाजता..आता तरी थांबा
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे
‘नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत अत्यल्प मतांनी विजय मिळाल्यामुळे आपण लाजत लाजत फिरतोय’ अशा अपमानास्पद विजयाची सल व्यक्त करून आमदार दिलीपराव वळसे यांनी त्यांचा झालेला विजय हा किती निष्ठूर, किती क्रूर, किती लज्जास्पद, किती मानहानीकारक, किती वेदनादायी होता, हे एकदाचे जाहीरपणे सांगून असल्या विजयापेक्षा पराभव परवडला, अशीच काहीशी भावना व्यक्त केली आहे.
एकंदरीतच वळसेंचा झालेला विजय हा त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. पराभव जिव्हारी लागतो हे मान्य, पण इथे विजयच जिव्हारी लागल्याचे दुर्मिळ चित्र दिसत आहे. एकंदरीतच वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाची सत्ता जनता सहन करत नाही. हेच या नकोशा विजयाचे सार आहे. आता लोकं तुम्हाला कंटाळलेली आहेत. तिसऱ्या पिढीला देखील तुम्ही जनतेवर लादत असाल तर जनता ते कसे सहन करील?
तर दुसरीकडे पन्नास हजारांपेक्षा अधिक मतांनी दणदणीत पराभूत होऊनही ‘गिरे तो भी टांग ऊपर’ या आविर्भावात, थाटात, कोणताही विधीविनेश न बाळगता, न लाजता, गावोगावी फिरून जाहीर सभांमधून आपल्या पराभवाला कारणीभूत असलेल्यांना बघून घेईन, साम, दाम, दंडाची जाहीर धमकी देणारे दुसरे दिलीपराव बघा. ‘सुंभ जळाला तरी पीळ जात नाही’ दुसरे काय?
तालुक्यातील जनतेने ज्या व्यक्तीला राज्याच्या सर्वोच्च अशा विधीमंडळात तीन वेळा तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली, तीच व्यक्ती पराभूत झाल्यावर उघडउघड बघून घेईन, साम, दाम, दंड व भेदाचा वापर करण्याची धमकी आपल्याच जनतेला देते, विरोधकांना देते, स्वपक्षीय व मित्र पक्षीयांना सुद्धा देत असेल तर याला कोणती संस्कृती म्हणायची? याला राजकीय परिपक्वपणा व प्रगल्भता तर अजिबात म्हणता येणार नाही. ही दांडगाई व मोगलाईची भाषा आहे, उन्मतपणा, मस्तवालपणाची भाषा आहे. एका अर्थाने ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मत दिले नाही, त्या प्रत्येकाच्याच घरावर तुम्ही नांगर चालवणार आहात का?
लोकशाहीत जनता हीच सर्वोच्च असते. आणि त्याच जनतेच्या जीवावर तुम्ही विधानसभा पाहिली. आणि त्याच जनतेला तुम्ही दमदाटीची भाषा करता? शेवटी कुणाला निवडून द्यायचे हा तालुक्यांतील जनतेचा अधिकार आहे. पुढच्या निवडणूकीत नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांना पुन्हा निवडून द्यायचे की अन्य कुणाला, हे सर्वस्वी मतदारांच्या हातात आहे. बाबाजी काळे यांचे काम जनतेला आवडले नाही किंवा त्यांनी देखील स्वत:ची पोरं, भाचा, पुतणे, मेव्हणे, जवळचे, लांबचे, नातेवाईक, सगेसोयरे, पै पाहुणे यांच्याच हिताचा विचार केला, त्यांना तालुका आंदण दिला तर काळेंना देखील तालुक्यांतील मतदार घरी बसावयास मागेपुढे पाहणार नाही.
दुसरीकडे तीन वेळा आमदार म्हणून निवडून देऊनही तुमचे समाधान होत नसेल तर याला काय म्हणायचे? ‘दिलं तर गोड नाहीतर दोड’, अशाच पद्धतीची ही भाषा आहे. सुंभा बरोबरच पीळ देखील जळून खाक झालेला आहे. त्याचे अस्तित्वच कुठे दिसेना. तरीही निवडून न देणाऱ्यांबद्दल एवढा पराकोटीचा द्वेष कसा काय मनांत येऊ शकतो?
मुळातच झालेल्या पराभवातून बोध घेऊन आपले नेमके काय काय चुकले, कुठे कुठे चुकले, यावर मंथन, रवंथ करण्यापेक्षा तुम्ही नाहक चिडचिड करून आपलेच राजकीय अस्तित्व पणाला लावत आहात. २०१४ मध्ये झालेल्या पराभवानंतर दिलीपरावांनी पुढच्या दिवसापासून कामाला सुरवात केली होती. न थकता, न आराम घेता पाच वर्ष जनतेत राहून तालुका पिंजून काढला होता. आणि त्याचेच फळ त्यांना २०१९ विधानसभा निवडणूकीत मिळाले होते. आताचा पराभव नक्कीच जिव्हारी लागेल असाच आहे. परंतु त्यासाठी इतरांना साम, दाम, दंडाची भाषा काढून दम देणे हे नक्कीच चुकीचे आहे. ज्या गोष्टींमुळे दिलीपरावांचा २०१४ ला पराभव झाला होता, त्याच गोष्टी २०२४ मध्ये झालेल्या त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या आहेत. हे त्यांनी प्रांजळपणे मान्य केले पाहिजे.
दरम्यान तालुक्यात दिलीपरावांसारखा परिपक्व व प्रगल्भ म्हणावा असा एकही राजकारणी नाही. तरीदेखील दिलीपराव असे अद्वातद्वा बोलत असतील तर ते स्वीकारार्ह नाही. एखादा अर्धवटराव असा बोलला असता तर ते ऐकून सोडून देतां आले असते. असो.
एक मात्र नक्कीच मान्य करावी लागेल की, कोणत्याही कामांचा, प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात मोहितेंचा हात कुणीच पकडणार नाही. तसेच त्यांना कुणीही, कितीही वाजता, कोणत्याही कामासाठी मोबाईल फोन वा साध्या फोनवरून संपर्क केला तर ते तातडीने समोरच्या व्यक्तीला प्रतिसाद देतात. किंवा नंतर तास दोन तासाने वा दुसऱ्या दिवशी देखील संबंधित व्यक्तींशी संपर्क करून माहिती घेतात व मदत करतात. या दोन्ही गोष्टी तालुक्यातील सर्वच राजकीय महोदयांनी नक्कीच आत्मसात करण्याची गरज आहे. त्याची त्यांना खुप खुप गरज आहे. जनतेचे प्रतिनिधी असूनही काहीजण सर्वसामान्य नागरीकांचे फोन उचलत देखील नाहीत. कदाचित त्यांना संकोच वाटत असावा किंवा कमीपणा वाटत असावा.
वळसे व मोहिते यांनी या निवडणूकीत थांबून इतरांना संधी देणे अपेक्षित होते. परंतु मंत्रीपदाच्या झुलीमुळे त्यांना आमदारकी महत्वाची वाटली व दोघेही तोंडावर आपटले. एक दणकन आपटले तर दुसरे न पडताही आपटले. याचाच अर्थ एकाला विजय मिळूनही तो पचवतां आलेला नाही, तर दुसरा पराभूत होऊनही विजयाच्या थाटात लोकांना दमबाजी करत आहे.
कुणाला पटो अथवा न पटो, पण या दोघांच्या पराभवात श्री भीमाशंकरच्या देवस्थानात जी आर्थिक अनागोंदी, अनियमितता माजलेली आहे, तिला या दोघांनी विश्वस्त असूनही आजपर्यंत जे पाठीशी घालण्याचे काम केले त्याचा देखील मोठा वाटा आहे. मोहितेंनी मध्यंतरी याविरूद्ध आवाज उठविला होता, परंतू त्यात पाहिजे ती धार नव्हती. त्यांना तो विषय तडीस नेता आला नाही. आम. वळसे हे तर देवस्थानच्या दोषी व निलंबित विश्वस्तांचे थेट पाठीराखेच आहेत. सहा वर्षांपूर्वी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे यांनी वेळोवेळो निर्गमित केलेल्या कायदेशीर आदेशांची बुद्धी:पुरस्पर अवज्ञा केल्यामुळे दहा विश्वस्तांना दोषी ठरवून निलंबित केले होते. वळसे या दोषी लोकांना देवस्थानच्या कामकाजापासून चार हात दूर ठेवू शकले असते. परंतु त्यांनी तसे काहीही न करता याच लोकांच्या हातात मंदीराचे व्यवस्थापन देऊन वळसेंनी त्यांचे गुन्हे नजरेआड करण्याचे काम आजवर केलेले आहे. संबंधित दोषी व निलंबित विश्वस्त हे उजळमाथ्याने मंदिराचे सर्व कामकाज पाहत आहेत. आज देवस्थानला अधिकृत असा अध्यक्ष नाही. तरीदेखील एक दोषी विश्वस्त स्वत:ला देवस्थानचा अध्यक्ष म्हणूनच मोठ्या रूबाबात वावरत आहे. तरीदेखील त्याच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. सर्वजण बघ्याची भूमिका घेऊन त्या बोगस व बनावट अध्यक्षाला डोक्यावर घेऊन नाचत आहेत. देवस्थानच्या बोगस अध्यक्षाच्या वरदहस्तामुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक भाविकांशी अक्षरश: गुंडगिरीसारखे वर्तन करून प्रसंगी त्यांना मारहाणही करतात. याच गोष्टींमुळे पश्चिम भागातील बांधवांमध्ये या दोन्ही आजी माजी लोकप्रतिनिधींवर मोठा रोष आहे. आणि तोच रोष, चीड मतदानाच्या माध्यमातून व्यक्त झालेली आहे.
पराभवाचे शल्य मनांत जरूर ठेवा. परंतु त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याच गरीब लोकांना धमक्या घेणे चुकीचे आहे. मोठ्या मनाने तुम्ही या भोल्या भाबड्या जनतेला माफ केले पाहिजे. विरोधक व पक्षांतर्गत स्पर्धक तुमच्याएवढे राजकीयदृष्ट्या प्रगल्भ व परिपक्व तर नक्कीच नाही. त्यांना देखील माफ करा. तुमचे एवढे मोठे मन नक्कीच आहे. शेजारच्या तुमच्या नावकऱ्याचेच उदाहरण घ्या. प्रत्येक सरकारमध्ये त्यांना मानाचे पद हे ठरलेलेच होते ना. नंतर आघाडी सरकार व महायुती सरकारमध्ये देखील ते होतेच ना. त्यांच्यासाठी मंत्रीपद हे पदसिद्ध होते. परंतू यावेळी ते काठावर पास झाल्यामुळे त्यांना निवडून येऊनही मंत्रीपद मिळाले नाही. त्यांना कसं कसं वाटत असेल, याचा जरा विचार करा. ते ‘थंड’ आहेत. जाहीररीत्या व्यक्त व्हायचे नाही, ही त्यांना त्यांच्या गुरूंकडून मिळालेली शिकवण आहे. एवढे असूनही ते व्यक्त झालेच ना. याचाच अर्थ त्यांचा झालेला विजय हा त्यांना सुईसारखा टोचत आहे. थोरल्या पातीमुळेच त्यांना गेली अनेक वर्षे महत्त्वाच्या मंत्रीपदाची चव चाखायला मिळाली. पण धाकटी पाती हाताला लागणारी नाही. वरच्या फळीतील नेते असूनही धाकट्या पातीने कस्पटासमान त्यांना मंत्रीपदापासून दूर केलेच ना? त्यामुळे तुम्हीदेखील निवडून आला असता तर आजची परिस्थिती पाहता तुम्हाला तरी मंत्रीपद मिळाले असते का?
तुम्हाला महामार्गावरील साध्या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविता आलेला नाही की तालुक्यांतील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करता आलेले नाही. उलट संबंधित गरीब धरणग्रस्तांचे पुनर्वसन होऊ नये यासाठी लाभक्षेत्रातील हजारो एकर जमीन वगळण्याचे काम तुम्हीच केले. तालुक्यात तीन तीन धरणे असूनही तुम्हाला पूर्व व पश्चिम भागातील पिण्याच्या पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविता आला नाही.
मुळातच लग्नाला, पूजेला वा अन्य एखाद्या कार्यक्रमाला कुणाकुणाला बोलवायचे, हा सर्वस्वी त्या कुटुंबाचा वा आयोजकाचा व्यक्तीगत प्रश्न असतो. त्या कुटुंबाने दहा लोकांच्या उपस्थित लग्न लावावे की दहा हजार लोकांत लावावे. यात आपल्याला पडायचा काहीएक संबंध नाही. आपल्याला बोलावले की नाही बोलावले, याचा फारसा विचार न करता त्यांच्या आनंदात आपणही सहभागी व्हायचे असते. हे द्यायचे सोडून व दररोज तोंडावर पडूनही याने मला लग्नाला का बोलावले नाही? साधी पत्रिका सुद्धा दिली नाही की, की तोंडीही सांगितले नाही, याचा राग वा वाईट वाटून घ्यायचे तर काहीच कारण नाही. आदळआपट करण्याचा तर संबंधच नाही. त्याने मला आमंत्रण न देतां शेजारच्याला आमंत्रण दिले. मी पण त्याच्या शेजारीच राहतो ना. मग मला का आमंत्रण नाही, म्हणून त्याला शिव्या देऊन, बघून घेईन म्हणायचा काय अधिकार आहे ? तो त्याचा प्रश्न आहे. आपण एवढा काय इगो दुखावून बसायचे?