उमेदवार सर्वसमावेशक चेहऱ्याचा असावा

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

एकदाची राज्य विधानसभेची निवडणूक घोषित झाली. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. या मतदारसंघातून महायुतीचा घटकपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे सहाव्यांदा या मतदारसंघातून निवडणूकीला सामोरे जात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून नेमकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, याकडे तालुक्यांतील जनतेचे लक्ष लागून आहे. उमेदवारीबाबत या आठवड्यातच निर्णय होऊ शकतो. ही जागा शरदराव पवार यांच्या पक्षाकडे जाते की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे जाते, याबाबत जनतेत कमालीची उत्सुकता आहे. 

दरम्यान गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीतील इच्छूकांनी आमदार मोहितेंविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा संकल्प सोडला आहे. ज्या कुणाला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल, त्या उमेदवाराच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याच्या आणाभाका सर्व इच्छूकांनी घेतलेल्या आहेत. परंतु स्वार्थापोटी संबंधित सर्व इच्छूक आपापल्या भूमिकांवर ठाम राहतील का? असा प्रश्न तालुक्यात विचारला जात आहे. असो, घोडामैदान जवळच आहे.

महाविकास आघाडीकडून इच्छूक असलेले सर्व उमेदवार गुण्यागोविंदाने एकमेकांच्या गळ्यात गळे घालून ‘हम साथ साथ है’ चा स्वर आवळत आहेत. या एकजुटीला आमदार दिलीप मोहितेंची नजर लागू नये, यासाठी सर्व इच्छूक कमालीची काळजी घेताना दिसत आहेत. परंतू निवडणूका घोषित होताच, अशा एकजुटी किती तकलादू असतात, हे यापूर्वी देखील तालुक्यांतील जनतेने पाहिलेले आहे.

खेड तालुक्यात विद्यमान आमदारांविरोधात मोठे जनमत आहे. २०१४ च्या तुलनेत तालुक्यांतील सद्यतची राजकीय परिस्थिती अधिक पोषक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या विरोधी जनमताचा कसा फायदा उठवितात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. त्यामुळे आघाडीचा उमेदवार देताना संबंधित उमेदवाराचे समाजातील स्थान, त्याची प्रतिमा, पार्श्वभूमी कशी आहे, हे पाहणे अधिक महत्वाचे आहे. नाही तर ‘कालचा गोंधळ बरा होता’ असं म्हणण्याची वेळ तालुक्यांतील जनतेवर येऊ नये. 

दरम्यान तालुक्याच्या दोन माजी आमदार पुत्रांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्याच्या चर्चा आहेत. मुळातच कोणत्या आधारावर त्यांना उमेदवारी द्यावी, असा गहन व गंभीर प्रश्न पक्षनेतृत्वाला पडला असेल.

एकंदरीतच महाविकास आघाडीचा उमेदवार हा सर्वसमावेशक चेहऱ्याचा असेल, असे संकेत मिळत आहेत.    

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरदराव पवार यांच्या पक्षाचे माजी जिप सदस्य अतुल देशमुख हे प्रमुख दावेदार असले तरी आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, माजी आमदारांचे गट, प्रामुख्याने स्व. सुरेशभाऊ गोरे यांना मोठ्या प्रमाणात मानणारे कार्यकर्ते, मतदार तसेच शरदराव पवार यांच्याच पक्षाचे काही कार्यकर्ते देशमुख यांना मनापासून साथ देतील अशी परिस्थिती अजिबात नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे देशमुख आमदार होऊ नये, म्हणून ज्यांना ज्यांना वाटते असे देशमुख यांचेच काही हितचिंतक देखील पाण्यात देव ठेऊन बसलेले आहेत. कदाचित देशमुख यांना वरील गणिते पटणार नाहीत, परंतु त्यांना ही वस्तुस्थिती अजिबात नजरेआड करता येणार नाही. 

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे गेला तर या पक्षाचे बाबाजी काळे हेच प्रमुख दावेदार असतील. काळे यांची विधानसभेची तयारी ही गेल्या काही वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. काळे हे मोहितेंना एक सक्षम पर्याय आहेत. संपर्क व प्रचाराच्या बाबतीत काळे हे इतर इच्छूकांच्या तुलनेत खुप पुढे निघून गेलेले आहेत. परंतू त्यांची सर्वात मोठी अडचण ही त्यांच्याच पक्षाचे काही असंतुष्ट पदाधिकारी व शिवसैनिक आहेत. काळे यांना पक्षाअंतर्गत मोठाच विरोध आहे. तसेच काळे यांना जरी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली तरी अतुल देशमुख व सुधीर मुंगसे हे दोघे इच्छूक मनापासून त्यांचे काम करतीलच याबाबतीत हमी देतां येत नाही.

दरम्यान खेड तालुक्यात शिवसेनाच शिवसेनेचा उमेदवार पाडते, हा इतिहास आहे. २००९ मध्ये अशोक खांडेभराड यांच्या झालेल्या पराभवाने ते अधिकच अधोरेखित झालेले आहे. त्या निवडणूकीत खांडेभराड निवडून येऊ नयेत, म्हणून अखंड शिवसेनेचे तत्कालीन माजी खासदार शिवाजी अढळराव व त्यांना मानणाऱ्या खेड तालुक्यांतील सेनेच्याच बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून एका अपक्षाला मदत केली होती. की जो अपक्ष उमेदवार अढळरावांचा लाडका होता. अढळराव संबंधित अपक्षाला सेनेची अधिकृत उमेदवारी देऊ इच्छित होते. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. मात्र माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे हे अपवाद ठरले गेले. सुरेशभाऊंची स्वच्छ प्रतिमा, विशेषत: चाकण परिसरातील एकगठ्ठा मतदान व दिलीप मोहिते यांच्याविरोधात असलेले जनमत, यामुळे गोरेंचा विजय सहज सुकर झाला होता. 

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ शरदराव पवार यांच्या पक्षाकडे  गेला तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे बाबाजी काळे हे गप्प न बसतां बंडखोरीचे निशाण फडकावून निडणूकीला सामोरे जातील, अशी तालुक्यात चर्चा आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी जिप सदस्य अनिलबाबा राक्षे यांनी देखील महाविकास आघाडीकडून विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर इतर इच्छूकांच्या तुलनेत भले राक्षे यांचा प्रचार, जनसंपर्क कमी झाला असेल, परंतु जनसामान्यांतील त्यांची प्रतिमा चांगली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे खेड तालुक्यात अजित पवार यांना मानणारा जो मोठा वर्ग आहे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांशी राक्षे यांचे सलोख्याचे संबंध आहेत. तसेच मोहितेंना मानणारे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी देखील राक्षे यांचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे जर राक्षेंना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी मिळाली, तर राक्षे हे मोठ्या प्रमाणात मोहितेंची हक्कांची मते आपल्याकडे वळवू शकतात. तसेच हा महाविकास आघाडीसाठी बोनस ठरेल. आघाडीतील इतर उमेदवारांच्या तुलनेत अनिलबाबा राक्षे यांच्या नावावर एकमत होणे अवघड नाही. राक्षे एक सर्वसमावेशक चेहरा म्हणून अधिक फायदेशीर ठरू शकतात. 

माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे यादेखील प्रमुख इच्छूक उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी गोरे कुटुंबीय पडद्यामागून मोठे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. गोरे कुटुंबीयांनी थेट समोर येऊन ठामपणे आपली उमेदवारी निश्चित केली पाहिजे. मनीषा गोरे या चांगल्या पद्धतीने सर्वसमावेशक चेहरा होऊ शकतात. परंतु सद्यस्थितीत त्यांची सर्वात मोठी अडचण अशी आहे की त्या शिंदे गटात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कितपत सकारात्मक असतील, हे सांगणे अवघड आहे. मनीषा गोरे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला नसता किंवा तटस्थ राहिल्या असत्या तर आज चित्र वेगळे दिसले असते. काहीही करून उद्धव ठाकरे यांनी मनीषा गोरे यांना उमेदवारी दिली असती. असो, राजकारणात काहीही होऊ शकते.