शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस भाकरी फिरविणार का?
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विद्यमान खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांचे गेल्याकाही दिवसांपासून ‘भाजप’प्रेम भलतेच ऊतू जाऊ लागलेले आहे. त्यामुळे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपर्यंत कोल्हे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्येच राहतील, ही शक्यता अजिबात दिसत नाही. लोकसभा निवडणूकीत कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून नक्कीच भाजपचे उमेदवार असू शकतात. कारण कोल्हे हे मनाने राष्ट्रवादीत नाहीतच. स्वत: कोल्हे वा राष्ट्रवादीचा इतर कोणताही नेता हे नाकारू शकत नाही.
ताजेच उदाहरण द्यायचे म्हणजे नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे स्टार प्रचारक असूनही आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी कोल्हे यांनी मैदानातूनच पळ काढला, हे पुरेसे बोलके आहे. एकीकडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या ‘छत्रपतींच्या’ भूमिका साकारायच्या व दुसरीकडे लढाईला सामोरे जाण्याऐवजी मैदानातूनच पळ काढायचा, हेच का खासदार कोल्हेंचे कर्तृत्व? नाटक, चित्रपटांमध्ये तलवारी चालवणे, प्रशिक्षित घोड्यांवर बसणे वेगळे व प्रत्यक्ष लढाईत शत्रूंशी दोन हात करणे वेगळे, याची जाणीव कोल्हेंना नक्कीच झालेली असणार.
दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदराव पवार यांच्यासारखा राजकारणातील ‘मनकवडा’ नेता कुणीही नाही. त्यामुळे त्यांच्या चाणाक्ष नजरेतून ही गोष्ट सुटणे शक्यच नाही.
त्यामुळे राष्ट्रवादीने फाजील बेसावधपणा न दाखवता शिरूर लोकसभा मतदारसंघात करपायला लागलेली भाकरी फिरविणे अधिक योग्य ठरेल.
दरम्यान एक अशीही शक्यता नाकारता येत नाही की शिवाजी अढळराव हे जरी शिंदे गटाच्या शिवसेनेत असले तरी ते ऐनवेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असू शकतात. हल्लीच्या राजकारणात काहीही घडू शकते. कारण भाजपच्या तिकिटावर आगामी शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास कोल्हे व अढळराव या आजी-माजी खासदारांची ‘सुप्त’ चढाओढ लपून राहिलेली नाही.
या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे आंबेगावचे आमदार दिलीपराव वळसे व खेडचे आमदार दिलीपराव मोहिते हे दोन तगडे उमेदवार आहेत. ही लोकसभेची जागा टिकवायची असेल तर या दोघांपैकी एकाच्या गळ्यात आगामी शिरूर लोकसभेची उमेदवारी घालणे अधिक योग्य ठरेल.
परंतु याठिकाणी एक महत्वाची गोष्ट नमूद करणे अधिक योग्य ठरेल. २००९ व २०१४ च्या पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत दिलीप वळसे माजी खासदार शिवाजी अढळराव यांच्या विरूद्ध लढण्यास तयारच होत नव्हते. अढळरावांनी आपल्या विरूध्द लढण्यास वळसेंना जाहीररीत्या अनेकवेळा ललकारले होते, परंतू वळसेंनी अढळरावांचे आव्हान काही स्वीकारले नाही. त्यामुळे हा पूर्वानूभव बघता २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत पण वळसे अंगाला कासरा लावून घेणार नाहीत. कारण वळसे आंबेगांवसारखा अतिसुरक्षित असा विधानसभा मतदारसंघ सोडून लोकसभा निवडणूकीच्या भानगडीत कधीच पडू शकत नाही.
२०१४ च्या निवडणूकीत अढळराव यांच्याविरोधात राष्ट्रवादीने म्हणण्यापेक्षा वळसेंनीच देवदत्त निकम यांच्यासारखा अक्षरश: ग्रामपंचायत स्तरावरचा उमेदवार देऊन निवडणूक लढण्यापूर्वीच पराभव मान्य केला होता.
२०१९ ची लोकसभा निवडणूक शिवाजी अढळराव यांच्यासाठी अवघडच होती. तीन लोकसभा निवडणूका जिंकूनही अढळराव हे मतदारसंघात निष्क्रियच राहिले होते. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ होता. तरीही वळसे लोकसभेसाठी अढळराव यांच्याविरोधात लढण्यास तयारच झाले नाहीत. २०२४ च्या निवडणूकीत शिवाजी अढळराव जरी पुन्हा निवडणूकीत उभे राहिले तरीही मतदारसंघातील बहुतांश सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक अढळरावांना पुन्हा एकदा साथ देतील, अशी परिस्थिती अजिबात नाही.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते हे आक्रमक स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. कामांच्या बाबतीत देखील त्यांचा मोठाच झपाटा असतो. राष्ट्रवादीने आगामी शिरूर लोकसभेची उमेदवारी मोहिते यांना दिली तर ते पक्षाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यातच आमदार मोहिते यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान जाहीर सभांमधून आमदारकीची ही आपली ‘शेवटची’ निवडणूक असून यावेळी मला संधी द्या, अशी विनंती मतदारांना केली होती. मतदारांनी देखील त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले होते. त्यामुळे मोहिते यांनी सुद्धा आपल्या ‘शब्दाला जागून‘ विधानसभा न लढण्यावर ठाम राहून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार झाले तर खेड तालुक्याची जनता त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही.
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत शरदराव पवार यांच्या चाणाक्ष खेळीने तत्कालीन एकसंध शिवसेनेचा अमोल कोल्हेंसारखा तरूण उमेदवार राष्ट्रवादीने अढळराव यांच्याविरोधात दिल्यामुळे निवडणूकीत रंगत आली होती. मुळात तत्कालीन एकसंघ शिवसेनेतच अढळराव यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती. स्वत: एक उद्योजक असूनही अढळराव विकासकामांऐवजी बैलगाडा शर्यत व घाट यातच अधिक रमले गेले. तसेच मोठमोठ्या प्रकल्पांना जाणूनबूजून विरोध करत बसले आणि त्याचाच फटका अढळरावांना बसला गेला. महत्वाचे म्हणजे शिवसेना पक्षवाढीसाठी देखील त्यांनी खुप काही केले, असेही नाही. याचाच परिपाक म्हणजे अमोल कोल्हेंचा विजय.
दरम्यान लोकसभेला निवडून गेल्यानंतरही अमोल कोल्हेंना मतदारसंघात फार काही करता आलेले नाही. कोल्हे हे अढळराव यांच्यापेक्षाही जास्त निष्क्रीय राहिले आहेत. सुरवातीचे काही महिने हे महाशय तर मतदारसंघात कधी फिरकलेच नाही. मतदारसंघातील ज्या मतदारांनी कोल्हे यांना निवडून दिले त्यांना प्रश्न पडायचा की आपण या बाबाला का निवडून दिले? हे महाशय तर तोंडच दाखवायला तयार नाही? एकवेळ मतदारांचे जाऊ द्या, राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे कोल्हे हे निवडून गेल्यापासून मतदारसंघात कधी दिसलेच नाहीत, तसेच कार्यकर्त्यांना देखील भेटत नाही, अशी जाहीर तक्रार केली होती.
त्यामुळे अमोल कोल्हे यांच्याबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा प्रचारादरम्यान लोकांमध्ये जसे आकर्षण होते, तसे आकर्षण आता अजिबात राहीलेले नाही. मतदारसंघात त्यांना आपल्या कामांचा ठसा उमटविता आलेला नाही. कोल्हेंना प्रवाशी व वाहनचालकांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला चाकण वाहतूककोंडीसारखा प्रश्न देखील सोडविता आलेला नाही. कोल्हेंनी संसदेत किती भारी भाषणे दिली, कागदोपत्री किती निधी दाखवला, याच्याशी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला काहीही घेणेदेणे नाही. जनतेसाठी ठोस काय व किती केले? यावरच लोकप्रतिनिधीचे खरे मूल्यमापन केले जाते. आणि यात खासदार कोल्हे पास झाले, असे म्हणण्याची हिंमत अपवाद वगळता बहुसंख्य करणार नाहीत, हे ही तितकेच खरे.
एकंदरीतच भाकरी मोठ्या प्रमाणात करपलेली असून ती अजून करपू द्यायची की फिरवायची ? हा सर्वस्वी संबंधितांचा अंतर्गत विषय आहे.