आमदार गोरे गड राखणार कि मोहिते बाजी मारणार?

CollageMaker_20190916_223747398

द्वारा…  अतुल दत्तात्रय काळे

सुरवातीपासूनच काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आमदार सुरेश गोरे यांच्या माध्यमातून प्रथमच भगवा फडकवला. गोरे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छूक होते. परंतू तिकिट न मिळाल्यामुळे त्यांनी अखेरच्या क्षणी शिवसेनेत प्रवेश करुन उमेदवारी मिळविली. त्या निवडणूकीत गोरे यांनी दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते यांचा मोठा पराभव केला होता.

तसे पाहिले तर गोरे यांच्या विजयात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचेच अधिक योगदान होते. कारण २०१४ चा मोहिते यांचा पराभव स्वतः त्यांनीच घडवून आणला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कुणावरही तोंड टाकण्याच्या सवयीमुळे त्यांचे स्वपक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते दुखावले गेले होते. तसेच त्यांच्या जवळच्या काही नातेवाईकांचा मोठा हस्तक्षेप तालुक्यात वाढला होता. कि ज्यामुळे सर्वसामान्य नागरीक व राष्ट्रवादी पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेले. गावोगावच्या राष्ट्रवादीच्या काही उन्मत्त कार्यकर्त्यांचा देखील फटका मोहितेंना बसला होता. ज्या कार्यकर्त्यांना गावात कुणी धड विचारत नाही, ज्यांच्यामागे दोन मते नाही, गावांनी व स्वत:च्या कुटुंबांनी ओवाळून टाकलेल्या अशा गणंग कार्यकर्त्यांच्या भरवशावर मोहिते विसंबून राहिले. त्यातच मोहितेंनी अनेकांना व नको त्यांना मोठे केले. शेवटी याही लोकांनी त्यांच्या विरोधात काम करून गोरेंना मदत केली होती. अशा मोहिते विरोधी विविध घटकांचा गोरेंच्या विजयात हातभारच लागला होता. 

दरम्यान आगामी राज्य विधानसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहिर होऊ शकते. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय विद्यमान आमदार व इच्छुकांकडून आपापल्या गडांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.  

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला, तर शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेशराव गोरे व राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीपराव मोहिते यांच्यातच पुन्हा विधानसभेचा सामना रंगणार आहे. यदाकदाचित भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांत मानापमानावरुन काही बिनसले, तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत पाहावयास मिळू शकते. मात्र हि शक्यता फार अंधूकशी आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या राजकिय भविष्यासाठी सेना युती तोडणार नाही. युती तुटली तर सेनेचेच अधिक राजकीय नुकसान होऊ शकते. असो. 

एक मात्र नक्की की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार गोरे हे ज्या सहजतेने निवडून आले होते, तशी परिस्थिती आता निश्चितच नाही. राज्यात भलेही युतीला पोषक वातावरण असले, तरीही खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला म्हणजेच पर्यायाने आमदार गोरेंसाठी लढत सोपी नाही. विजयासाठी संघर्ष अटळ असणार आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर गोरेंना कामांच्या माध्यमातून तालुक्यात पाहिजे तशी छाप पाडता आली नाही. प्रशासनावर वचक ठेवता आला नाही. अनेक जुने प्रश्न प्रलंबित आहेत. राजगुरुनगर, चाकण व आळंदी या तीन शहरांतील बकालपणा कमालीचा वाढलेला आहे. सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे.

महत्वाचे म्हणजे तालुका शिवसेनेतील सध्याचे वातावरण बघता त्यांना स्वपक्षातूनच किती ‘अढळ’ मदत मिळू शकते हे सांगणे कठीण आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खेड तालुक्यात शिवसेनेच्या शिवाजीराव अढळराव यांना अनपेक्षितपणे सात हजारांपेक्षा अधिक मतांची पिछाडी मिळाली होती. अढळराव यांना स्वत:च्या आंबेगांव तालुक्यापेक्षा खेड तालुक्यातून मिळालेल्या पिछाडीचे अधिक शल्य आहे. तालुक्यात अढळराव सेना तगडी आहे. मुळचे शिवसैनिक व पदाधिकारी २०१४ च्या तुलनेत या निवडणूकीत आमदार गोरेंचे कितपत काम करतील? हे सांगणे अवघड आहे. त्यातच सेनेतून हकालपट्टी केलेले व राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रामदास ठाकूरांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आमदार गोरे स्वपक्षीयांना कसे सांभाळतात? यात त्यांची कसोटी लागणार आहे. त्यातच सेनेतील एक गट या निवडणुकीला चाकण हिंसाचाराचा जातीय रंग देऊ पाहत आहे. 

दरम्यान कामांच्या बाबतीत विद्यमान आमदार सुरेश गोरे व माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यात तुलना केली तर मोहिते हे गोरेंपेक्षा निश्चितच उजवे ठरतात. पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्या पाच वर्षांत मोहिते यांनी तालुक्यातील जनसंपर्क कमी होऊ दिलेला नाही. त्यांनी मतदारसंघाची बांधणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. तसेच मोहितेंची निवडणूक तयारी देखील जोरदारपणे सुरु आहे. आगामी निवडणूक आमदार गोरे व त्यांचे समर्थक समजतात तेवढी नक्कीच सोपी राहिलेली नाही. गोरे व मोहिते यांच्यातील लढत तुल्यबळ होणार आहे. मोहिते गेल्या  निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आतुर आहेत. 

आमदार सुरेश गोरे हे आपला गड राखण्यात यशस्वी होतात की माजी आमदार दिलीप मोहिते हे बाजी मारुन पुन्हा विधानसभेत जाण्यात यशस्वी होतात, याची उत्सुकता तालुक्यातील जनतेला लागलेली आहे. घोडामैदान जवळच आहे