‘महादेव वन’ येथील खोलीचे पत्रे उडाले.. बांधकामाचा निकृष्ट दर्जा उघड
द्वारा.. अतुल दत्तात्रय काळे
‘महादेव वन’ या पर्यटनस्थळातील बांधकामाच्या खोलीचे पत्रे जोरदार वाऱ्याने उडून गेले आहेत. सिमेंटच्या खांबाला देखील तडा गेला आहे. त्यामुळे येथे सुरु असलेल्या बांधकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून स्थानिकांनी चौकशीची मागणी केली आहे. या पर्यटनस्थळासाठी सुमारे दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली जात आहे.
राज्याचे वनमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सर्वस्वी कल्पना असलेल्या ‘महादेव वन’ या पर्यटनस्थळाची, भीमाशंकर अभयारण्यातील नागफणी डोंगराच्या पायथ्याशी कोकण कड्यावर वनस्पती पॉईंट जवळ युद्धपातळीवर निर्मिती सुरु आहे. अभयारण्य क्षेत्रात सुरुंगाचे स्फोट घडविण्यास पूर्णपणे बंदी असूनही याठिकाणी तळे व कालवा खोदाईसाठी प्रचंड प्रमाणात सुरुंगाचा वापर करण्यात आलेला आहे. याची पुरेपूर कल्पना संबधित मंत्री महोदय व वनविभागाच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. मात्र ज्यांच्या खांद्यावर जंगलांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी आहे, तेच अधिकारी केवळ मंत्र्यांची मर्जी सांभाळण्यासाठी चुकीच्या व नियमबाह्य गोष्टींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी संबंधितांच्या आशिर्वादाने अभयारण्याची मात्र अपरिमित हानी सुरु आहे. अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातच हा विध्वंसकारी प्रकल्प राबविताना वन्यजीव तसेच पर्यावरण संवर्धन व संरक्षण कायद्याला पूर्णपणे तिलांजली देण्यात आलेली आहे.
सध्या कोल्हापूर व सांगली येथे महापुरामुळे हाहाकार माजलेला आहे. पाणी कमी व्हायचे नाव घेईना, तरीदेखील राज्यकर्तेच चुकीच्या पद्धतीने श्रद्धेचा विषय पुढे करून महादेव वनाच्या माध्यमातून निसर्गालाच आव्हान देऊ पाहत आहेत? आणि केवळ फायद्यासाठी काही अधिकारी राज्यकर्त्यांच्या प्रस्तावाला खतपाणी घालण्याचे काम करतात. हे अनाकलनीय आहे.
पश्चिम घाटावरील वन्यजीवांच्या दृष्टीने अतिशय समृद्ध व अतिसंवेदनशील अभयारण्य म्हणून भीमाशंकर अभयारण्याची ओळख आहे. परंतु गेल्या काही वर्षात पर्यटनाला चालना देण्यासाठी अभयारण्याच्या गाभा क्षेत्रासह सर्वच बीटमध्ये वन्यजीव विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आलेली आहे. संबंधित बांधकामे करताना व ठिकाणांची निवड करताना वरिष्ठ व स्थानिक वन अधिकाऱ्यांनी कोणतीही संवेदनशीलता पाळलेली नाही. त्याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘महादेव वन’.
वस्तुस्थिती अशी आहे की, अलिकडच्या काळात भीमाशंकर अभयारण्याची जी काही नासाडी व पर्यावरणविरोधी गोष्टी झालेल्या आहेत, त्याला सर्वस्वी वन्यजीव विभागच थेट जबाबदार आहे. त्यातच श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान परिसराच्या विकासासाठी दिडशे कोटी रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आलेला आहे.
दरवर्षी पडणाऱ्या धो धो पावसामुळे भीमाशंकर अभयारण्य व परिसराला पावसाचे आगर म्हणून ओळखले जाते. या अभयारण्याला अतिशय समृद्ध अशी जैववैविध्यता लाभलेली आहे. तिचे संवर्धन व संरक्षण करणे गरजेचे असताना उलट विविध प्रकल्प राबवून, बांधकामांची गर्दी करुन जैववैविध्यतेला नख लावले जात आहे. दरम्यान या ठिकाणी पडणाऱ्या पावसात कोणतेही बांधकाम तग धरू शकत नाही. आणि याची चांगली जाणीव वनाधिकाऱ्यांना आहे. पावसाबरोबर येथे वाऱ्याचा वेग देखील प्रचंड असतो. महादेव वन ज्या ठिकाणी विकसित केले जात आहे, ती जागा कोकण कड्यावर आहे. गेल्यावर्षी महादेव वनात लावलेली शेकडो झाडांची रोपे पावसामुळे जळून गेली होती. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. येथील हवामान ‘उपऱ्या’ जातींच्या वृक्षांसाठी अजिबात पोषक नाही. तरीदेखील वन्यजीव विभागाने भलताच धाडसीपणा करुन पाहिला होता. याठिकाणी ‘बाहेरच्या’ वृक्षांच्या जाती जिवंत राहू शकत नाही.
मुळातच वन्यजीवांच्या अधिवासाला पूर्णपणे धोकादायक ठरलेले ‘महादेव वन’ हे पर्यटनस्थळ निर्माण करण्याची काहीही गरज नव्हती. केवळ हट्टापायी हा प्रकल्प निर्माण केला जात आहे. एकीकडे राज्यात शतकोटी वृक्षलागवडीचा टेंभा मिरवायचा व दुसरीकडे समृद्ध अशा अभयारण्याची वाट लावायची. यातूनच राज्याच्या वनविभागाला जंगल संवर्धनात किती गांभीर्य आहे? हे सहज लक्षात येते. गांभीर्य नसलेल्या वनाधिकाऱ्यांमुळेच राज्याला लाभलेल्या समृद्ध अशा पश्चिम घाटातील जैववैविध्यतेची नासाडी सुरु असून निसर्गाला हानिकारक ठरणाऱ्या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात उभारणी होत आहे. त्याचाच परिणाम महापूर वा आदी नैसर्गिक संकटांच्या माध्यमातून जनतेला भोगावा लागत आहे.
महादेव वनाच्या जागेत पूर्वीपासूनच वनविभागाची जी जुनी इमारत उभी आहे, तिचे नूतनीकरण व दुरुस्ती करुन विस्तार करण्यात आलेला आहे. मुळातच नूतनीकरणाचे झालेले काम चांगल्या दर्जाचे नव्हते. या इमारतीला पूर्वीचे सिमेंटचे छत होते. त्या छतावर लोखंडी पत्रा टाकण्यात आलेला आहे. तरीदेखील छापून पाण्याची गळती सुरु होती. चार दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वाड्यात एका खोलीवरील पत्रे भिंतीतून उखडून आजूबाजूला पडले. यावेळी एका खांबाला देखील तडा गेलेला आहे. पत्रे उडाल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगली धावपळ उडाली. दरम्यान एका वनकर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पत्रे बसविण्यासाठी घाईघाईने आजूबाजूच्या गावातील कारागीरांना आणून पत्रे बसविण्यात आली.
तसेच याठिकाणी करण्यात येत असलेल्या कामांच्या ई टेंडरींगमध्येच घोळ असून या महादेव वनाच्या निर्मितीची जबाबदारी ज्या निवृत्त वनाधिकाऱ्याकडे देण्यात आलेली आहे, त्याच अधिकाऱ्याच्या संबंधित लोकांना सर्व कामे देण्यात आली असून संबंधित लोक त्या अधिकाऱ्याच्या गावाकडील आहेत. तसेच या ठिकाणी काम करणारे मजूर देखील त्याच्याच गावाकडील आहेत. दुसऱ्यांच्या नावावर संबंधित अधिकारीच कोट्यावधी रुपयांची कामे करत असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. महादेव वनातील बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झालेली असल्याचे समजते. त्यातच वरिष्ठ अधिकारी देखील संबंधिताला पाठिशी घालत आहेत.