खून प्रकरणातील फरारी कुख्यात गुंड जेरबंद.. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई.
खूनासह गंभीर गुन्ह्यातील फरारी कुख्यात गुंडाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गावठी पिस्तूलासह अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे. प्रकाश उर्फ पप्पू अरुण गायकवाड ( रा. बहुली ता. हवेली जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. तो मुळशी तालुक्यातील एका कुख्यात टोळीशी संबंधित असून त्याच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिस हद्दीत अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवार ( दि, ६) रोजी मुठा गावाच्या परिसरात आरोपी प्रकाश उर्फ पप्पू गायकवाड याची माहिती घेत असताना तो पिस्तूल बाळगून मुठा एसटी स्टॅण्ड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत आरोपीला ताब्यात घ्यायचेच, या पद्धतीने नियोजन केले होते. आरोपी प्रकाश उर्फ पप्पू एसटी स्टॅण्ड परिसरात येताच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. यावेळी त्याच्याकडून गावठी कट्टा व पाच जीवंत काडतुसे असा साडे पंचवीस हजारांचा माल जप्त केला. सासवड पोलिस ठाणे ( पुणे ग्रामीण) व दत्तवाडी पोलिस ठाणे ( पुणे शहर पोलिस) येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात तो फरारी होता. त्याच्यावर पुणे शहर पोलिस हद्दीतील भारती विद्यापीठ, हिंजवडी पोलिस ठाणे, पुणे
ग्रामीण पोलिस हद्दीतील हवेली, पौड, राजगड पोलिस ठाणे अंतर्गत अकरा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दोन महिन्यांपूर्वी पुणे शहरांतर्गत दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत साथीदारांच्या मदतीने केलेल्या एका खून प्रकरणात तो फरारी होता. त्याच्याबद्दल माहिती देण्यास कुणीही पुढे येत नसत. तो नेहमी पिस्तूल बाळगून असत.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश मुंढे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलिस कर्मचारी विजय कांचन, रौफ इनामदार, चंद्रशेखर मगर, धीरज जाधव, साईनाथ रोकडे, शाहू राणे, विशाल भोर किशोर वाळुंजकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.