स्फोटके तयार करणाऱ्याला शस्त्रांसह अटक
पिंपळवंडी ( ता. जुन्नर ) येथील अभंगवस्ती येथे एकाला स्फोटके तयार करणाऱ्या साहित्यासह पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी त्याच्याकडून इलेक्ट्रीक गन मशीन व पाईप बॉम्ब ताब्यात घेण्यात आले. राजाराम किसन अभंग ( वय-६०, अभंगवस्ती, पिंपळवंडी, ता. जुन्नर) असे त्याचे नाव असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. २००३ मध्ये त्याने स्फोट घडवून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळवंडी येथील राजाराम अभंग याच्याकडे बॉम्ब बनविण्याचे साहित्य व मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, जीवन माने यांना मिळाली होती.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप जाधव व पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभंग याच्या शेतातील घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून विद्युत प्रवाहावर चालणारी इलेक्ट्रीक गन मशीन, पाईप बॉम्ब बनविण्यासाठी तयार केलेला सांगाडा, गन पावडर, दोन तलवारी, दोन धारदार भाले, डिटोनेटर, हाताने तयार केलेले चिलखत तसेच बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान राजाराम याच्या पत्नीचे एका पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून २००३ मध्ये त्याने संबंधित पुरुषाला बॉम्बचा स्फोट घडवून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या स्फोटात एक स्थानिक महिला व काही लहान मुले जखमी झाले होते. याप्रकरणी तो येरवडा कारागृहात तीन वर्षे होता. त्याला दोन मुले असून त्याची पत्नी व दोन्ही मुले त्याच्यासोबत राहत नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
