खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कुणी पाहिलं का? जनतेकडून युद्धपातळीवर शोध सुरू

IMG--WA0002

द्वारा.. अतुल दत्तात्रय काळे

शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव अढळराव यांचा पराभव करून निवडून गेल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला क्वचितच दर्शन झालेले आहे. किंबहुना त्यांचे दर्शन अत्यंत दुर्लभ झालेले असल्याची चर्चा मतदारसंघात जोर धरत आहे. जिथे स्वत:च्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना खासदार महोदयांना वेळ देता येत नाही, तिथे सर्वसामान्य लोकांचा विचार न केलेला बरा. त्यातच लोकप्रतिनिधी या नात्याने स्वत:च्या मोबाईलवर आलेले सर्वांचेच ‘कॉल’ उचलायचे असतात, किंवा कामाच्या गडबडीमुळे उचलणे शक्य नसेल तर पुन्हा संबधितांना माघारी कॉल करायचा असतो, याचे बाळकडू व प्रशिक्षण आपल्याच पक्षाचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून कोल्हे यांनी घेतले तर बरेच होईल.

दुसरीकडे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अजित पवार यांनी नुकतेच पिंपळे गुरव येथील पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘आमदार-खासदार होऊन दारोदारी फिरायचे असते की पान टपऱ्यांवर गप्पा मारायच्या असतात? अशा पद्धतीचे वक्तव्य केलेले आहे. दरम्यान ‘सुंभ जळाला तरी चालेल पण पिळ जाता कामा नये’ अशाच पद्धतीची ही भाषा आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

तसेच गेल्याच आठवड्यात इंदूरच्या भाजपच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञासिंग यांनी देखील शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेली नसल्याचे भाजपच्याच कार्यकर्त्यांना सुनावले होते. या दोन्ही वक्तव्यांमध्ये फारसा काही फरक नाही. हल्ली निवडून देणारे मतदार मुर्ख असतात, त्यांना काय कळते? असाच मस्तवालपणा बहुतांश लोकप्रतिनिधींमध्ये ठासून भरलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने अशा उन्मत्त भाषेची सवय लावून घेणेच इष्ट ठरेल. 

पूर्वीचा खेड व आत्ताच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात सलग तीन निवडणूका जिंकलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव अढळराव चौथ्यांदा खासदारपदाची स्वप्ने पाहत होते. परंतु पंधरा वर्षे केवळ खोटी आश्वासने देणाऱ्या व सर्वसामान्य जनतेला विकासापासून वंचित ठेवलेल्या अढळराव यांना सर्व घटकांतील मतदारांनी पद्धतशीरपणे पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठविले. पंधरा वर्षांत अढळराव यांच्या निष्क्रीयतेमुळे मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न न सुटता ते प्रलंबितच पडले. दरम्यान ‘आपला माणूस’ म्हणून कोल्हे यांना लोकांनी निवडून दिले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हे यांनी गावोगावी , वाड्या-वस्त्यांवर जाऊन, दारोदारी, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून मतदारसंघ पिंजून काढला होता. लोकांनी देखील आपल्या माणसावर मनापासून प्रेम केले. हक्काचा माणूस या नात्याने कोल्हे यांच्या माध्यमातून आता आपले प्रलंबित प्रश्न सुटतील, ही आशा सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाली. मात्र निवडणूक झाल्यानंतर अपवाद वगळता खासदार कोल्हे मतदारसंघात कधी आले व कधी गेले हे सर्वसामान्य जनतेला कधी समजलेच नाही. अधिवेशनाचा काळ सोडला, तर कोल्हे हे मतदारसंघात फिरकल्याचे दिसून आले नाही. प्रचारादरम्यान अढळराव यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करुन लोकांच्या मनांत घर करणारा हाच का तो तरुण? असाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे. इतरांचे जाऊ द्या हो, पण त्यांच्या स्वत:च्या पक्षातीलच कार्यकर्त्यांनी देखील खासदार कोल्हे हे मतदारसंघात येत नसल्याची तक्रार केली आहे. 

पिंपळे गुरव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत खासदार कोल्हे हे मतदारसंघात येत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांच्याकडे केली असता, पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत कार्यकर्त्यांनाच उपदेशाचे डोस पाजले. अजित पवार म्हणाले की, आमदार-खासदार होऊन दारोदारी फिरायचे असते की पान टपऱ्यांवर गप्पा मारायच्या असतात? कोल्हे हे शिरुर पुरते मर्यादित नसून त्यांना राज्यभर ( प्रचारासाठी) फिरवायचे आहे. कोल्हे यांनी संसदेत शेतकऱ्यांचे, बैलगाडयांचे प्रश्न मांडले. कोल्हे यांच्या वकृत्वाने प्रभावित झालेल्या पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केलेले आहे. दरम्यान अजित पवारांनी असेही धक्कादायक विधान केले की, भोसरीत कोल्हे यांना कमी मतदान झाल्यामुळे त्यांना भोसरीत कसे यावे वाटेल? 

मुळातच अजित पवारांनी कोल्हे यांची ज्या पद्धतीने पाठराखण केली, ती अत्यंत चुकीची आहे. अजित पवार व कोल्हे यांच्यासहित राष्ट्रवादीचे सर्वच नेते, कार्यकर्ते मतदारांच्या दारोदारी मतांचा जोगवा मागत पायाला भिंगरी लावून हिंडत होते. कोल्हे यांच्या विजयात शेतकरी, शेतमजूर, पानटपरीवाले, हातगाडीवाले, झोपड्यांमध्ये राहणारे तसेच गरीबातल्या गरीबांचा, वंचितांचा मोठा वाटा आहे. हे विसरता कामा नये. पवारांनी ही भाषा मतदानापूर्वी केली असती तर बरे झालं असतं, अशी स्वपक्षातील कार्यकर्ते व सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा आहे. भोसरी व हडपसर वगळता तुलनेने ग्रामीण भाग असलेल्या खेड, आंबेगांव, जुन्नर व शिरुर तालुक्यातील मतदारांनी कोल्हे यांना दोन्ही हातांनी भरभरुन मत’दान’ केलेले आहे. कमी मतदानामुळे भोसरी व हडपसर येथे जायला कोल्हेंना संकोच वाटत असेल तर जास्त मतदान झालेल्या इतर चार तालुक्यात जायला कोल्हे यांना कुणी अडविले आहे? भोसरी व हडपसर येथील ज्या मतदारांनी कोल्हे यांना मतदान केले, ती त्यांनी चूक होती का? 

राज्यात पंधरा वर्षे व केंद्रात दहा वर्षे काँग्रेस आघाडीचे सरकार अस्तित्वात होते. परंतु आघाडी सरकारला देखील बैलगाडा शर्यतबंदीचा प्रश्न सोडविता आला नाही. सध्या राज्यात व केंद्रात भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे. तरीदेखील या सरकारला बैलगाडा शर्यतबंदीवर ठोस काही निर्णय घेता आलेला नाही. बैलगाडा शर्यतबंदीचा प्रश्न चघळून चघळून नर्मदेचा गोटा झालेला आहे. अढळराव यांनी शेतकऱ्यांना फसवून लोकसभेच्या तिन्ही निवडणूका बैलगाडा शर्यतबंदीच्या प्रश्नावरच जिंकलेल्या होत्या. विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे देखील त्याच मार्गाने जाऊन मतदारसंघातील प्रलंबित व पायाभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करु पाहत असतील तर ते सर्वथा चुकीचेच ठरेल. त्यांची गतही अढळराव यांच्यासारखीच होईल, हे त्यांनी ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे.

चाकण परिसरात मोठे औद्योगिक क्षेत्र विकसित होऊनही त्याचा फायदा स्थानिक तरुण तरुणींना कितपत होतो? याचा विचार करण्याची गरज आहे. कोल्हे यांच्या विजयात चाकण येथील वाहतूककोंडी या प्रश्नाचा मोठा वाटा राहिलेला आहे. मोशी टोलनाका ते राजगुरुनगर यादरम्यानचे वीस ते एकवीस किलोमीटर इतके अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. निवडणूकीपूर्वी जी वाहतूककोंडी होती, ती आजही तशीच आहे. निवडून आल्यानंतर वाहतूककोंडी सोडविण्याचे कोल्हे यांनी आश्वासन दिले होते. परंतू वाहतूककोंडी काही सुटली नाही. कदाचित कोल्हे यांना वाहतूककोंडी या प्रश्नाचे विस्मरण झाले की काय? अशीच शंका येत आहे. “बोलाचीच कढी व बोलाचाच भात”. दुसरे काय. 

कोल्हे यांना राज्यभर फिरवायचे की देशभर फिरवायचे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोल्हे यांना जगाच्या दौऱ्यावर पाठविले तरी कुणाचीच आडकाठी असणार नाही. त्यांचे लोणचे खारु घातले, तरी काही हरकत नाही. एक मात्र ध्यानात ठेवले पाहिजे की कोल्हे यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिलेले आहे. 

दरम्यान कोल्हे यांच्या वकृत्वाने प्रभावित झालेल्या पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केल्याचे अजित पवार सांगतात. कोल्हे यांचे वकृत्व निश्चितच चांगले आहे. संसदेत जास्त प्रश्न मांडून, चांगले वकृत्व करून मतदारसंघातील सर्व प्रश्न सुटतील, असे मात्र बिलकुल नाही. असे असते तर गेल्या पंधरा वर्षांत शिरुर लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रलंबित प्रश्न सुटून मतदारसंघ सुजलाम सुफलाम झाला असता. परंतु तसे झालेच नाही. कारण अढळराव यांनी संसदेत मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले होते. मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी लोकप्रतिनिधीच्या अंगात स्वकर्तृत्व, रग तसेच प्रश्न व समस्या तडीस नेण्याची अंगभूत क्षमता व जनतेशी प्रामाणिक असावे लागते. जो लोकप्रतिनिधी स्वत:च्या मतदारसंघातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी देऊ शकत नाही, तो काय मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार?