लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होणार? विरोधकांचे मनोबल वाढले.
By अतुल दत्तात्रय काळे
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फाजील आत्मविश्वासाने चौकाराची भाषा करणाऱ्या व विरोधकांना सातत्याने तुच्छतेने हिणवणाऱ्या शिवाजीराव अढळराव यांना जनतेने ज्या पद्धतीने चारीमुंडया चीतपट केले, त्यामुळे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांचे मनोबल चांगलेच उंचावले गेले आहे. अढळराव यांच्याप्रमाणेच विद्यमान आमदार सुरेश गोरे यांना देखील धोबीपछाड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणण्याची जबाबदारी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहावयास मिळू शकते.
दरम्यान गोरे यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात तालुक्याचा भरीव व दृष्टीस पडेल, अशा स्वरुपाचा विकास झाला, असे म्हणणे मात्र धाडसाचेच ठरेल. त्यांना तालुक्यात विशेष अशी छाप पाडताच आली नाही. खासदार व आमदार दोघेही शिवसेनेचे, तसेच राज्यात व केंद्रात देखील शिवसेना सत्तेत. असे असूनही खेड तालुक्याच्या विकासाला फारशी गतीच मिळाली नाही. ‘विकास’ कोसो मैल दूरच राहिला. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला पुरक ठरणारा आंतरराष्ट्रीय विमानतळ अढळराव व गोरे यांच्याच निष्क्रीयतेमुळे पुरंदरला गेला आहे. आणि आज आमदार गोरे विमानतळ पुन्हा खेड तालुक्यात आणण्याची भाषा करत आहेत. याला शुद्ध पोरकटपणा व थिल्लरपणा म्हणतात. दुसरीकडे विकासाच्या थापा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना तालुक्यातील बहुतांश जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी देखील पुरविता आलेले नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे ज्या तालुक्यात तीन तीन धरणांच्या माध्यमातून मुबलक पाणी उपलब्ध होते, आणि त्याच तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्या लागतात, हे लोकप्रतिनिधींसाठी नक्कीच भूषणावह नाही. तरी देखील निगरगट्ट लोकप्रतिनिधी स्वतःला विकासपुरुष म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. असो घोडामैदान जवळ आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील विकासाचा मुद्दाच केंद्रस्थानी राहणार आहे.
शिवसेना पक्षाचा विचार केला तर, विद्यमान आमदार सुरेश गोरे यांची उमेदवारी निश्चित आहे. तालुका पातळीवर सर्वसमावेशक व जनाधार असलेला अन्य पदाधिकारी शिवसेनेत नाही. कारण त्यांच्या कर्तृत्वाला मर्यादा आहेत. ग्रामपंचायत व पंचायत समितीला निवडून येण्याची क्षमता नसलेले देखील काहीजण विधानसभेत जाण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. दरम्यान माजी खासदार अढळराव यांच्याप्रमाणेच आमदार गोरे यांनी देखील तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी व सर्वसामान्य शिवसैनिकांना बळ देण्यासाठी काहीही केलेले नाही. तसेच पाच वर्षांपूर्वी जे मुद्दे प्रलंबित होते, ते आजही ‘जैसे थे’ आहेत. परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. बाकीचे जाऊ द्या, परंतू स्वतःचे गांव असलेल्या चाकण शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न आमदार गोरे यांना सोडविता आलेला नाही. परिणामी या महामार्गाने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशी व वाहनचालकांना वाहनकोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. राजगुरुनगर ते मोशी टोलनाका यादरम्यान प्रवास करताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. या वाहनकोंडीचा रुग्णवाहिकांना देखील फटका बसतो. हे अढळराव यांच्याप्रमाणेच गोरे यांचे देखील अपयशच म्हणावे लागेल.
काँग्रेसच्या बाबतीत बोलायचे झाले तर, एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या खेड तालुक्यात आज काँग्रेस पक्ष अखेरच्या घटका मोजत आहे. पुन्हा उभारी घेण्यासाठी तालुका काँग्रेसमध्ये त्राणच शिल्लक राहिलेला नाही. आणि ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे तालुक्यात काँग्रेसला पुन्हा एकदा जुने दिवस दाखवायचे असेल तर पक्षाला दमदार नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी आक्रमक व निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यातच हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे.
दरम्यान या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यातच लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे विजयी झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठा उत्साह आहे. त्यातल्या त्यात माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला चांगलीच टवटवीत पालवी फुटलेली आहे. “जनतेचं ठरलयं” असे म्हणत कॉलर नव्हे मफलर उडवतच मोहिते यांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान कॉलर व मफलर उडविण्याची नवीच स्टाईल राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रुजू पाहत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीपासून मोहितेंनी चांगलच बाळसं धरलं आहे. असो.. चार विधानसभा निवडणुकींचा अनुभव मोहिते यांच्या पाठीशी आहे. दोन विजय व दोन पराभव. दरम्यान कामांच्या बाबतीत विचार केला तर मोहिते हे आमदार सुरेश गोरे यांच्यापेक्षा निश्चितच उजवे ठरतात. आमदारकीच्या काळात मोहिते यांचा अधिकाऱ्यांवर मोठा वचक होता. मात्र मोहिते यांना देखील खेड तालुक्यातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यात अपयशच आलेले आहे. आमदारकीच्या दहा वर्षांच्या काळात मोहिते यांनी स्वपक्षातील विरोधकांना त्रास देण्याचे काम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच केवळ ‘तोंडाळपणा’मुळेच त्यांच्यापासून स्वपक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते दूर गेलेले आहेत. आणि त्याची शिक्षा त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळाली.
दुसरीकडे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल राक्षे हे देखील आगामी विधानसभेसाठी तीव्र इच्छूक आहेत. उमेदवारीसाठी प्रामुख्याने राक्षे यांची स्पर्धा मोहिते यांच्याशीच असणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तुलनेने तरुणांना उमेदवारी देण्याचे संकेत दिल्यामुळे अनिल राक्षे उमेदवारी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करतील. एक मात्र नक्की की माजी आमदार दिलीप मोहिते व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल राक्षे या दोघांतच उमेदवारीसाठी मोठी चुरस असेल. मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटागटाचेच राजकारण आहे. माजी खासदार अढळराव यांच्या तिन्ही व आमदार गोरे यांच्या विजयात राष्ट्रवादीतील नाराजांचा मोठा हात राहिलेला आहे. राष्ट्रवादीने एकमताने उमेदवार देऊन त्याचे प्रामाणिकपणे काम केले, तर आमदार गोरे यांच्यासाठी ते अडचणीचे ठरु शकते.
दुसरीकडे पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांनी देखील जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेत असताना राजगुरुनगर येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभेत ठाकूर यांनी जे शक्तिप्रदर्शन केले, त्यामुळे सेनेतून त्यांना नारळ देण्यात आला होता. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी ठाकूर प्रयत्नशील असले तरी ती त्यांना मिळेल हे सांगणे कठीण आहे.