जनहितासाठी अमोल कोल्हेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा..!
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे


शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी २०२९ पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीची वाट न बघता, आता जनहितासाठी स्वतःहूनच राजीनामा देणे अधिक उचित ठरेल. या मतदारसंघातील जनतेने कोल्हेंना खासदार म्हणून दोनदा निवडून दिले. परंतु कोल्हेंनी जनतेच्या या उपकाराची जराही जाणीव ठेवलेली नाही. या मतदारसंघातील जनतेच्या काय अडीअडचणी आहेत, याची साधी चौकशी करण्यासाठी देखील कोल्हे मतदारसंघात फारसे फिरकलेलेच नाहीत.
लोकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठीच नाराजी आहे. एवढी की पुढील निवडणुकीत ते मते मागायला आले तर लोकं त्यांना अक्षरशः हाकलून लावतील, अशीच परिस्थिती आहे.
खासदार म्हणून या लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, विविध समस्या, चाकण व शिक्रापूरची जीवघेणी वाहतूककोंडी सोडविण्यात कोल्हे पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत. तसेच या मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामाबद्दल न बोललेलेच बरे.
खासदार म्हणून कोल्हेंनी सात वर्ष अक्षरशः वाया घालवलेली आहेत. ‘शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार दाखवा व एक रुपया मिळवा’ अशीच परिस्थिती त्यांच्याबाबत आहे. झेन एक्स आहे, नवाट गडी आहे, मतदारसंघात काहीतरी भव्य-दिव्य करेल, चाकण व रांजणगाव औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करेल, या आशेने कोल्हेंना मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने अक्षरशः डोक्यावर घेऊन निवडून दिले होते. परंतु या ‘झेन एक्स’ने अल्पावधीतच मतदारांचा भ्रमनिरास केला. एक अत्यंत निष्क्रिय खासदार म्हणून त्यांना ओळखले जाते.
अमोल कोल्हे यांच्याबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा प्रचारादरम्यान लोकांमध्ये जसे आकर्षण होते, तसे आकर्षण आता अजिबात राहीलेले नाही. मतदारसंघात त्यांना आपल्या कामांचा ठसा काही उमटविता आलेला नाही.
‘मतदारसंघात हार-तुऱ्यांत रमणारा नव्हे तर मतदारसंघाच्या गळ्यात हारतुरे यावे, यासाठी अहोरात्र झटणारा खासदार’ असे म्हणून कोल्हेंनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली होती. मध्यंतरी या मतदारसंघातील रस्ते विकासासाठी तब्बल तीस हजार कोटींचा निधी आणल्याचा आव आणून कोल्हेंनी मतदारसंघातील जनतेचे चांगलेच मनोरंजन केले होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडीच्या प्रश्नावर खासदार कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे रान तापविले होते. कोल्हे यांच्या विजयात चाकण वाहतूककोंडी या प्रश्नाचा मोठा वाटा राहिलेला आहे. पुणे नाशिक महामार्गासोबतच पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडीने वाहनचालक व प्रवाशांना जेरीस आणलेले आहे. या महामार्गांनी प्रवास करताना वाहनचालक व प्रवाशी अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत.
दरम्यान गमंतच सांगायची म्हणजे आॅगस्ट २०२३ मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी तब्बल ३० हजार कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती कोल्हेंनी एका उद्घाटन कार्यक्रमात दिली होती. यामध्ये प्रामुख्याने सुमारे ९ हजार कोटी रूपये खर्चून नाशिक फाटा ते चांडोली व सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्चून वाघोली ते शिरूर असे दोन दुमजली महामार्ग बांधण्यात येणार होते. परंतु २०२६ हे वर्ष संपायला आले, परंतु या दोन्हीही महामार्गांचे बांधकाम अद्याप सुरूच झालेले नाही.
त्यापुढील गंमत म्हणजे नुकताच केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत असलेला एक फोटो कोल्हेंनी समाजमाध्यमावर टाकलेला आहे. यामध्ये त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी १६७८० कोटी रूपयांचा निधी मिळाल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे तीन वर्षात एकही काम न होता तीस हजार कोटींचा आकडा थेट १६७८० कोटी इतका खाली आलेला आहे. परंतु चमकोगिरी करण्याची सवय माणसाला स्वस्थ बसू देत नाही. कोल्हे पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना जुन्नर येथील त्यांच्या घरासमोरचा रस्ता खुप दिवस करता आलेला नव्हता.
आता नेमके काय खरे मानायचे? हा प्रश्न जनतेला पडलेला आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या बाबतीत २०२३ मध्ये जी परिस्थिती होती, ती २०२६ मध्ये देखील काही बदललेली नाही. फक्त आकड्यांमध्ये मोठी तफावत पाहावयास मिळते. फेकाफेकीला देखील मर्यादा असतात.
कोल्हेंचे भाजपप्रेम कधीच लपून राहिलेले नाही. त्यामुळे २०२९ पूर्वी ते कधीही भाजपच्या दावणीला बांधले जाऊ शकतात. मध्यंतरी त्यांनी तसे विधान देखील केले होते. असे असले तरी कोल्हेंचा राजकीय आलेख खुप खाली आलेला आहे.
मुळातच कोल्हे नेमके कसे दिसतात? हे देखील जनता पूर्णपणे विसरलेली आहे. कारण मतदारसंघातील त्यांचा वावर हा फक्त दोन लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारासाठीच मर्यादित होता. कदाचित ते मतदारसंघात पुन्हा कधी आले तर जनता त्यांना ओळखू देखील शकणार नाही. कारण जनतेशी त्यांनी सुरवातीपासूनच संपर्काची नाळ तोडल्यामुळे त्यांचे झपाट्याने अवमूल्यन झालेले आहे. म्हणूनच त्यांचे ‘मूलभूत मुल्य’ किंवा ‘मूळ किंमत’ ही एक रूपया ठेवण्यात आलेली आहे. बाकी काही नाही.
खास. कोल्हेंच्या तुलनेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे कामांच्या बाबतीत अनेक पटींनी उजवे होते. मतदारसंघातील बहुतांश नागरिकांना अढळराव व्यक्तिशः ओळखायचे. सर्वसामान्य नागरिकांना ते सहज उपलब्ध व्हायचे व अजूनही होतात. तसेच वरचेवर मतदारसंघात दौरे काढायचे, नागरिकांना भेटायचे. विशेषतः खेड तालुक्याच्या पश्चिम भागात दौऱ्याच्यावेळी शिवाजीराव अढळराव नेहमीच स्थानिकांच्या घरात जेवायचे. आजही अढळरावांचा जनसंपर्क कोल्हेंपेक्षा खुप मोठा आहे. कोल्हेंचा जनसंपर्क म्हणजे त्यांचे अष्टप्रधान मंडळ.
दरम्यान अढळराव पराभव पचवूनही लोकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जोमाने जात आहेत, मिसळत आहेत. तसेच दर शनिवारी, रविवारी अढळराव लांडेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी लोकांना सातत्याने भेटत असतात. त्यांनी भलेही काम कमी केले असेल, पण लोकांचा संपर्क अजिबात तोडलेला नाही. दुसरीकडे याउलट परिस्थिती विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबतीत पाहावयास मिळते.
कदाचित खासदार महोदयांना असे वाटत असेल की, मालिकेच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील तमाम जनतेला भेटतच असतो. तर प्रत्यक्षात मतदारसंघातील लोकांना भेटण्यात काय स्वारस्य आहे? जो खासदार स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, वेळ देऊ शकत नाही, तो सर्वसामान्य जनतेला काय वेळ देणार? झेन एक्स कोल्हेंना असल्या फालतू गोष्टींचा खुपच तिटकारा आहे.
कोल्हेंची सल्लागार मंडळी नेमकी कोणती आहे? याबाबत खरोखरच संशोधन करण्याची गरज आहे. दरम्यान अशीही चर्चा आहे की, त्यांचे अष्टप्रधान मंडळ वेगवेगळ्या माध्यमातून चाकण औद्योगिक क्षेत्रात चांगलेच सक्रीय झालेले आहे. या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काय काय गमतीजमती असतात, याचे संबंधित अष्टप्रधान मंडळातील काही सदस्यांनी जोरदार मायक्रो प्लॅनिंग केले होते.
दरम्यान तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव अढळरावांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या कुतुंगुळा असलेल्या अमोल कोल्हे यांना सर्व घटकांतील मतदारांनी भरघोस मतांनी लोकसभेवर पाठवले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देखील कोल्हे यांच्या विजयासाठी मोठे कष्ट घेतले होते. दरम्यान आपण ज्या तरुणावर एवढा विश्वास दाखवून निवडून दिले, तो निवडणूक झाल्या झाल्या काही दिवसांतच संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाईल? हे त्यांच्या गावीही नव्हते.
दरम्यान २०१९ मध्येच भोसरी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खासदार महोदय मतदारसंघात फिरकत नसल्याच्या तक्रारी दिवंगत अजित पवार यांच्याकडे केल्या होत्या. पवार यांनी उलट कार्यकर्त्यांनाच उपदेशाचे डोस पाजून शांत केले होते. लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मतदारसंघातील लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी, त्या सोडविण्यासाठी कमीत कमी अमावस्या पुनवेला तरी मतदारसंघात फेरफटका मारुन लोकांना भेटायचे असते, याचा विसर कोल्हेंना फारच लवकर पडल्याचे दिसते. कदाचित आपण खासदार आहोत, हेच कोल्हे विसरले कि काय? अशी शंका उपस्थित होत आहे.
शिरूर मतदारसंघालगतच असलेल्या पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाकण व रांजणगांव सारखी दोन दोन मोठी औद्योगिक क्षेत्रे मतदारसंघात असूनही कोल्हेंना मतदारसंघासाठी व मतदारसंघातील तरूणांच्या रोजगारासाठी काहीही करता आलेले नाही.
मतदारसंघातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासह दोन पिढ्यांपासून प्रलंबित असलेले धरणग्रस्तांचे पर्यायी पुनर्वसन, बेरोजगारी, उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा, पायाभूत शिक्षणासारख्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यात कोल्हेंना अपयशच आलेले आहे.
रंगीबेरंगी कपडे घालून भाषणबाजी करण्यापेक्षा कधीतरी भात खाचरातील चिखलमाती कपड्यांना लागू द्यायला पाहिजे होती. उन्हातान्हात रानांवनांत हिंडून हंडाभर पिण्याचे पाणी वाहणाऱ्या महिलांचे, लहान मुलामुलींचे हाल प्रत्यक्ष पाहून त्यांची पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे होती. परंतु गुलाबी त्वचा काळवंडेल म्हणून पहिली पाच वर्ष हे महोदय अभावानेच मतदारसंघात आले. २०२४ मध्ये दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर देखील कोल्हे काही सुधरलेले नाहीत. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’.
दरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील जाहीर प्रचार सभेत बोलताना शिवाजी अढळराव यांनी अमोल कोल्हेंवर टिका करताना त्यांचा नाटकीबाज, ॲक्टर असा उल्लेख केला होता. तसेच अजित पवार यांनी देखील कोल्हेंना ‘नटसम्राट खासदार’ म्हणून हिणवले होते. परंतु नटसम्राट हा शब्द कोल्हेंच्या चांगलाच जिव्हारी लागला. प्रत्युतरात कोल्हेंनी अजित पवारांना पलटूसम्राट, खोकेसम्राट, पक्षचोर अशा उपमा दिल्या होत्या. ज्या दिवंगत अजित पवार यांच्यामुळे कोल्हे खासदार झाले, त्यांचे जीवनमान अधिक उंचावले, त्याच अजित पवारांना कोल्हे यांनी शिव्या देण्याचे काम केले होते.
अढळरावांनी पक्ष सोडू नये…
माजी खासदार शिवाजीराव अढळराव हे शिंदे सेनेत लवकरच प्रवेश करतील, असे बोलले जात आहे. परंतु भविष्यात जर त्यांना पुन्हा एकदा ‘शिरूर’मधून खासदार म्हणून निवडून यायचे असेल तर, त्यांनी आहे त्याच राष्ट्रवादी अजित पवार गटात राहणे सर्वार्थीने योग्य ठरेल. तसेही दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विचाराने एकच आहेत. नाहीतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेसोबत जावे. शिरूर लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा कडवा शिवसैनिक व ठाकरे कुटुंबियाला मानणारा मोठाच वर्ग आहे. त्यातच भविष्यात शिंदे सेनेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तसेच या मतदारसंघात शिंदे सेनेचे फारसे अस्तित्वही नाही. त्यामुळे अढळरावांनी शिंदे सेनेचा पर्याय निवडला तर तो फारसा यशस्वी होणार नाही.