थोडीशी तरी लाज शिल्लक ठेवा रे…!

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

एपस्टीन फाईल्समधून जगातील सर्वच क्षेत्रातील दिग्गजांची? नावे समोर आल्यामुळे जागतिक स्तरावर मोठीच खळबळ माजलेली आहे. दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या कॅप्टन बाबाच्या प्रकरणातील चित्रफिती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरत असल्यामुळे राज्यात तसेच देशपातळीवर चांगलाच धुडगूस घातलेला आहे. एपस्टीन व कॅप्टन बाबा तसेच या पापात सहभागी असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना रानटी पशूंची उपमा देणेच अधिक योग्य ठरेल.

या विकृत व रंगेल ‘कॅप्टन’ बाबाच्या उघडकीस आलेल्या कृष्णकृत्यांमुळे राज्याच्या अब्रूची लक्तरे देशाच्या वेशीवर अक्षरशः टांगली गेलेली आहेत. तसेच या लिंगपिसाट बाबाच्या घाणेरड्या चित्रफितींनी सुसंस्कृत राज्यातील जनता विशेषतः महिला वर्ग पुरता हादरून गेलेला आहे.

या बाबाला खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाल्यामुळेच त्याला फ्रि हिट मिळून त्याचा सुटाबुटातील बिभत्स नंगानाच पाहण्याची वेळ पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेवर आली आहे. तो अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या गळ्यातील ताईत बनला होता.  या बाबाच्या प्रकरणात राज्यातील काही नेते, अधिकाऱ्यांसह अनेक बड्या हस्तींच्या कुंडल्या बंदिस्त झालेल्या आहेत.

हा विकृत बाबा काही मंत्री, लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकारी यांचा लाडका बनण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्याकडून या लोकांना नियमित मिळणारा शक्तिवर्धक बूस्टर डोस. तसेच त्याच्याशी असलेले आर्थिक व व्यावसायिक हितसंबंध हेच होय. या बाबाच्या माध्यमातून संबंधित रंगेल थेरांना महिला व मुलींचा पुरवठा होत असावा, ही शक्यता देखील नाकारता ये नाही. ज्या लोकांना नको तिथे आपले पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी शक्तिवर्धक डोस घ्यावा लागत असेल, तअशांकडून राज्यातील महिलांच्या सुरक्षेची काय अपेक्षा ठेवायची? थोडक्यात अशी धक्का स्टार्ट मंडळी आपले प्रतिनिधी म्हणून मिरवतात, हे खुपच दुर्दैवी आहे.

कॅप्टन बाबा व त्याच्या तथाकथित रंगेल बड्या भक्तांकडून अनेक महिला, मुलींचे आयुष्य उध्वस्त केले असण्याची शक्यता आहे.

ज्या लोकांच्या हाती राज्य सांभाळण्याची जबाबदारी आहे, असे आपले राज्यकर्ते असल्या फालतू व लफंग्या लोकांच्या नादी लागतात, त्याच्या सल्ल्याने वागून त्याची कृष्णकृत्ये नजरेआड करत असतील तर हे बाकी खुपच भयानक आहे.

दरम्यान या विकृत कॅप्टन बाबाच्या नवनवीन चित्रफिती दररोज बाहेर येत असतानाच राज्य मंत्रिमंडळातील एका नररूपी मंत्र्याचे प्रताप अचानक प्रकाशझोतात आल्यामुळे तर राज्यातील जनता बधीर व स्तब्ध झालेली आहे. कॅप्टन बाबा व वळवळ्या हिरवळ बाबांमुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्याचीच मान शरमेने खाली गेलेली आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

एकंदरीतच आता तर खरोखर हद्दच पार झालेली आहे बुवा. यांना आता हे बिचारे देखील पुरेनासे झाले? मी किती बलवान ‘नर’ आहे, हेच दाखवून देण्याचा हा हिरवळ बाबांचा प्रयत्न म्हणायचा कि काय? असाच प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला आहे.

एक मात्र मानायलाच पाहिजे. ओपनिंगला येऊन गली मध्ये एकाच पद्धतीचे फटके मारून एकेरी दुहेरी धावा काढत तसेच रटाळ, संथ व बचावात्मक चिवट फलंदाजीचे दर्शन घडवत त्रिशतकाकडे वाटचाल करू पाहणाऱ्या कॅप्टनची फलंदाजी बघून प्रेक्षकांचा राग अनावर झाला होता.   

परंतु नाईट वाॅचमन म्हणून बढती मिळालेल्या वळवळ्या अशा अवलिया हिरवळ बाबाने तर सरपटी बाॅलवर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून मागे उत्तुंग षटकार ठोकत तो चेंडू थेट मैदानाबाहेर टोलवून दिला. या अफलातून षटकाराने कॅप्टनसह सर्वांनाच अचंबित करून टाकले. या नराच्या अंगी भलतेच गुण असल्याचे दिसतात बाकी.

दरम्यान हिरवळ बाबाला फसवलं, स्वपक्षातील विरोधकांनी ट्रॅप केला, सात महिन्यापूर्वीची चित्रफित आताच कशी बाहेर आली? दोन तीन चित्रफिती जोडून एकच चित्रफित तयार केली. अशा पद्धतीने हिरवळ बाबांचा बचाव केला जात असेल तर काय म्हणायचे? हिरवळ बाबांचा बचाव करणाऱ्या या तथाकथितांना मग काय हिरवळ बाबाच्या देखील कॅप्टन बाबा सारख्याच उत्तान व किळसवाण्या
चित्रफिती समाज माध्यमांवर येणे अपेक्षित आहे का?

राज्याचे व जनतेचे नेतृत्व करणारेच जर असली शिसारी आणणारी घाणेरडी कृत्ये करत असतील तर काय म्हणायचे याला? एवढा तमाशा दिसूनही काहीजणांकडून हिरवळ बाबाची पाठराखण केली जात असेल तर राज्याची अधोगती किती रसातळाला गेलेली आहे, याचे हे मूर्तिमंत उदाहरण.

या प्रकरणाने एवढी नाच्चकी होऊनही हिरवळ बाबाला शुद्ध करण्याचे प्रयत्न करण्यात आले. यापूर्वी देखील अनेक असल्या मंत्र्यांचे शुद्धीकरण करण्यात आलेले आहे. कितीही लफडे करा, महिलांचे शोषण करा, अधिकारी महिलांचे शोषण करा, असले अनैतिक, अनैसर्गिक धंदे करून जनतेनध्ये कितीही बदनाम व्हा,, जनता बोंबलून बोंबलून थकून जाईल, विरोधक राजीनामे मागून गप्प बसतील, घाबरायचे नाही. कोणतीही चौकशी न होता यांना क्लिनचीटच मिळणार आहे, त्यामुळेच ही असली मंडळी शेफारली जाऊन मदमस्त होऊन वागत असते.

मुळातच अशा लोकांना लाथा मारून राजकीय व सामाजिकदृष्या बहिष्कृत करणे गरजेचे असता, त्यांची बडदास्त ठेवली जाते. त्यांच्या स्थानाला जराही धक्का लावला जात नाही. आणि तसेच या लोकांना केलेल्या चुकीच्या वर्तनाचा अजिबात पश्चाताप होत नाही. उलट अशी थेरं करणारे उजळ माथ्याने समाजात हिंडत असतात.

दुसरीकडे राज्यशकट हाकणाऱ्या संघात कॅप्टन बाबापेक्षा अधिक स्फोटक व उच्चांकी धावा करणारे काही फलंदाज आहेत. यात प्रामुख्याने गुलछबू पिस्तुल्या बाबा, नव्यानेच प्रकाशझोतात आलेला नंगेबाबा, मुन्नी बदनाम हुई फेम काळाचष्मा बाबा, गाठोडं बाबा, वांधातृष्ण तिखे बाबा व इतर. तसेच या संघात जबरदस्त तगड्या फलंदाजांची भलतीच मोठी फौज आहे.

किती फाईल्स आल्या अन् किती येऊ राहिल्यात, काय फरक पडतो आम्हाला? काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलेले राज्यातील हाय प्रोफाईल सेक्स स्कॅंडल रॅकेट घातले ना यांनी विस्मृतीत ? राज्यशकट चालवणारे व त्यांचेच उच्चपदस्थ या नालायक खेळात गुंतलेले
असेल तर घंटा सत्य बाहेर येणार? जोपर्यंत दोषींचा खऱ्या अर्थाने चौरंग्या वा कडेलोट होत नाही, तोपर्यंत हे असेच चालणार आहे.

काही महिन्यांपूर्वी लैंगिकदृष्ट्या विकृत असलेला कॅप्टन बाबा ज्या जिल्ह्यातून येतो, त्याच जिल्ह्यातून एका बड्या ‘दादा’ बाबाच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु संबंधित दादा बाबावर कारवाई करण्याऐवजी त्या महिलेलाच खोटी ठरवून बहिष्कृत केले गेले. एकप्रकारे त्याच्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घातले गेले. आणि याचाच फायदा हे लोकं घेतात. कारण राजकीय राजाश्रय हेच यांचे प्रमुख हत्यार असते.

धर्माला बदनाम करून अनेक लिंगपिसाट तथाकथित बाबा मंडळी धर्माच्या आडून खुप काही घाणेरडे धंदे करत आहेत. याची कुणाला माहिती नाही असे नाही. परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यास सत्ताधारी कचरत असतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या भोंदू व विकृत समाजरक्षकांच्या मागे असलेले लाखो अनुयायांचे जाळे व खोटी अंधश्रद्धा. श्रध्देच्या आडून असे उद्योग करून बहुतांश स्वत:च्याच धर्मातील माय माऊलींची इज्जत लुटतात याचे देखील भान या धर्मरक्षकांना नसते, यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही. .

मुळातच कॅप्टन बाबा हा दिसायला सर्वसामान्य चेहऱ्याचाच. परंतु आपल्या या कुरूप रूपाला अधिक खुलविण्यासाठी या बाबाने नेमके काय काय सौंदर्य प्रसाधने वापरली कि याच्या जाळ्यात बळजबरी करून वा दहशतीच्या जोरावर कि नेमक्या कोणत्या अडचणींमुळे वा भीतीमुळे शेकडो महिला अडकल्या गेल्या? याची चर्चा लोकांमध्ये चालू आहे.

एक मात्र नक्की कि या प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असू शकते. बळी पडलेल्या संबंधित महिला, तरूणी या विकृत बाबाच्या माध्यमातून आणखी कुणाकुणाच्या शोषणाला बळी पडल्या, कि जे वासनांध लोकं स्वत:चे पुरूषत्व सिद्ध करण्यासाठी या नराधमाकडून तथाकथित शक्तिवर्धक औषध विकत घेत होते, हे देखील तपासात उघड होणे गरजेचे आहे.

गाव असो की तालुक्याचे ठिकाण, शहरे असो की महानगरे असो, राज्य असो की देश असो, सर्वत्रच अशा असंख्य फाईल्सचे ढीग साचलेले आहेत. राजकीय क्षेत्र, शासकीय विभाग, सामाजिकक्षेत्र, शैक्षणिकक्षेत्र, व्यावसायिक  क्षेत्रे, या सर्वच क्षेत्रात महिला, तरूणी मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषणाला बळी पडतात किंवा त्यांना बळी पडण्यास भाग पाडले  जाते. महिला ह्या केवळ उपभोग्य वस्तू असतात, ही विकृत मानसिकता वर्षानुवर्षे आजही ‘जैसे थे’ टिकून आहे.

कधी असहायतेपोटी तर कधी बदलीसाठी तर कधी नोकरीसाठी तर कधी दोन वेळची पोटाची खळगी भरण्यासाठी गरजवंत असलेल्या महिलांना आपली शिकार करण्यासाठी हे असले वासनांध, लिंगपिसाट टपूनच बसलेले असतात.

महिला सबलीकरण, महिलांच्या सुरक्षेवर लंबीचौडी भाषणे देणारे पशूच इज्जतीचे लचके तोडण्यात आघाडीवर असतात.