तालुक्याचे आजी आका.. माजी आकाच्या वाटेने
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे
टिप:- या लेखातील दामू उर्फ दामाजी ‘अण्णा’ उर्फ जुना आका व दाबाजी उर्फ टिळाधारी ‘बाबा’आजी उर्फ नवा आका या व्यक्तीरेखा व त्यांच्याशी संबंधित घटना या काल्पनिक कथेवर आधारीत आहेत. त्यांचा अस्तित्वातील कोणतीही व्यक्ती वा अन्य सत्य घटकांशी अथवा घटनांशी काहीही एक संबंध नाही. अथवा ओढूनताणून जोडण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. मिळत्याजुळत्या असेलच, तर तो एक निव्वळ काल्पनिक योगायोग समजावा. स्वत:च्या मनाला जास्त लागून घेऊ नये.
नुकत्याच झालेल्या तालुक्याच्या निवडणूकीत दामाजी ‘अण्णा’ तथा जुन्या आकाचा दारूण पराभव झाला व त्यांच्या जागी तालुक्याचा नवा कारभारी म्हणून दाबाजी उर्फ टिळाधारी ‘बाबा’आजी तथा नवा आका हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. जास्त मतांनी निवडून आल्यामुळे नवा आका भलताच गांगरून गेलेला आहे. त्याला वाटलं मला मिळालेली एवढी मते ही केवळ माझ्या स्वकर्तृत्वावर मिळालेली आहेत. आख्ख्या राज्यात माझ्यासारखा जनाधार असलेला दुसरा अन्य कुणी नाही. त्यामुळे त्याची छाती लईच फुगलेली आहे. अरे येड्या, आपले कर्तृत्व हे पंचवीस हजारांच्या पुढे जाणारे नव्हते. आपल्या विजयात जुन्या आकाबद्दलचा रोष प्रकट झालेला आहे. जुन्या आकाशी ज्यांचे राजकीय वैर होते, त्यांनी केवळ जुन्या आकाला धडा शिकविण्यासाठीच तुला डोक्यावर घेतलेला आहे. दामाजी अण्णा जास्त तोंडाळ नसता तर आपल्याला तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळालीच नसती. दामाजी अण्णांनी आपल्याला कुठे भिरकावून लावले असते हे कळालेच नसते. दामाजी ‘अण्णा’ नको म्हणून या टिळाधारी ‘बाबा’आजीला तालुक्यांतील जनतेने निवडून दिलेले आहे. बाकी दुसरे काहीच कारण नाही. संबंधितांनी याचे भान बाळगण्याची गरज आहे. राज्य पातळीवरचे पद मिळूनही नवा आका अजूनही जिल्हा पातळीवर असल्यासारखाच चाचपडत आहे. एकंदरीतच तालुक्याचे भविष्य अवघडच आहे.
एक मात्र मान्य केलेच पाहिजे की, जुना आका कसाही असूद्यात परंतु ते कधी हवेत उडाल्याचे दिसले नाहीत. परंतु नवा आका निवडून येऊन शंभर दिवसही झालेले नाहीत, तोच तो अक्षरश: उडायला (हवेत) लागलेला आहे. त्याला वेळीच आवर घातला पाहिजे. अन्यथा तो लवकरच जुन्या आकाला देखील मागे सोडील असेच त्याचे वागणे सुरू झाले आहे. या नव्या आकाच्या टाईटपणाच्या, बदला घेण्याच्या गोष्टी आताच बाहेर येऊ लागलेल्या आहेत. याची चौकशी लावायची, त्याची चौकशी लावायची यात नव्या आकाने कमालीचा रस घेतल्याचे समजते.
टिळाधारी ‘बाबा’आजी उर्फ नव्या आकाला फोनचे काय वावडे आहे, हेच मुळी कळत नाही. हा बाबा बहुतांश पामरांचे फोनच घेत नाही. या महाभागाने फोन घेण्यासाठी एक सहाय्यक ठेवल्याची चर्चा आहे. अरे ‘बाबा’आजी फोनच्या बाबतीत अण्णांचा आदर्श घ्या जरा? आपण जनतेचे पंचवार्षिक सालगडी नोकर आहोत. त्यांचे मालक नव्हे. निवडणूकीत तालुक्यांतील ज्या काही मोजक्या लोकांनी जुन्या आकाशी थेट पंगा घेतला, कडूपणा घेतला व यांच्या विजयात हातभार लावला, त्यांचेही फोन उचलायला या नव्या आकाच्या हाताला लकवा येत असेल तर हे वागणं बरं नव्हं.
याचाच अर्थ नवा आका हा जुन्या आकाच्याच पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करू लागला आहे. शेवटी नवा आका हा जुन्या आकाचाच चेला ना? तो वाया कसा जाणार? पुन्हा ये रे माझ्या मागल्या. बाकी काय?
एक मात्र नक्की आहे. आताच लिहून ठेवा. हे नवे टिळाधारी ‘बाबा’आजी तथा नवा आका याच्या वागण्यामुळे पुढच्या निवडणूकीत हद्दपार होणार आहे. कारण जुन्या आकाच्या तुलनेत हे भलताच उथळ आहेत. त्यांचेयाकडून भरमसाठ गमतीजमती होणार आहेत. जनता त्यांना पुन्हा तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी कदापी देणार नाही. निवडून येईपर्यंत हे महाशय खुपच शांत होते. आता त्याने आपले खरे रंग दाखवायला सुरवात केलेली आहे. यांचे विविध बदलते रंग बघून विविधरंगी सरडा देखील अवाक् झाल्याचे समजते.
दरम्यान आपल्याच पंटरांना, खास लोकांना पदे भाड्याने देण्याची पद्धत तशी जुनीच आहे. आता त्याची जाहीर चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच्याच अनुसंगाने या नव्या आकाने आपल्याकडील पदाची घरातच समांतर तीन भागात विभागणी केलेली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. एक भाग स्वत:कडे व दोन भाग आपल्या लवकुशाकडे दिलेले आहेत. याचाच अर्थ भविष्यात तीन समांतर सत्ताकेंद्रे तालुक्यात कार्यरत असतील, हे बाकी नक्की. प्रशासनाच्या दृष्टीने हे अवघड जागेचे दुखणे होणार आहे. जुन्या आकाचे तसे नव्हते. स्वत:च्याच हातात, ताब्यात जुन्या आकाने आपले पद ठेवले होते. ते कुणालाच भाड्याने दिलेले नव्हते. आता मात्र या पदाचे अवमूल्यन होणार आहे.
नवा आका हा जुन्या आकासारखाच हलक्या कानाचा आहे. काही मीठाचे खडे या नव्या आकाने जवळ बाळगलेले आहेत. विशेषत: ठेकेदारी व्यवसायातील.
जुन्या आकाने व्यापक कौटुंबिक हिताचा विचार करून जवळचे, लांबचे सगेसोयरे, पै पाव्हणे, भाचे, पुतणे, मेव्हणे, भाऊ तसेच काही खासमखास पित्त्यांचा, पंटराचा कैक पिढ्यांचा सर्वांगीण विकास केलेला आहे. परंतु नवा आका या व्यापक हिताच्या मार्गाने न जाता ‘मै और मेरे दो अनमोल रतन’ व इतर फक्त जवळचेच, यांचेच हित पाहिले जाणार आहे. या हिताच्या गोष्टींमध्ये इतरांना अजिबात थारा नसेल. जुन्या आकाने अनेकांचे हित पाहिले होते. नवा आका एवढा उदार नाही, तो कंजूस आहे.
या नव्या आकाने आपल्या व्यवसायात म्हणजेच ठेकेदारीत चांगलाच सक्रीय हस्तक्षेप करण्यास सुरवात केलेली असल्याचे बोलले जात आहे. या नव्या आकाने तालुक्यांतील व बाहेरचे अशी ठेकेदारांची यादी बनवून स्वत:च सुमोटो काही जणांना काळ्या यादीत टाकल्याची चर्चा आहे. तसेच मला विचारल्याशिवाय काहीच काम करायचे नाही, असेही त्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना बजावल्याचे समजते. एकंदरीतच आपल्याच सहकारी ठेकेदारांना त्रास देण्याचे उद्योग या टिळाधारी ‘बाबा’आजी तथा नव्या आकाने सुरू केलेले आहेत. असो या गोष्टी होणारच होत्या. परंतु त्याची सुरवात एवढी लवकर होईल, असे जनतेला कदापीही वाटले नव्हते.