जनतेनेच ठरवलंय…. खेड आळंदीत परिवर्तन अटळ

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

लोकसभेचे कवित्व संपले. आता पुढचा पडाव आहे तो विधानसभेचा. लोकसभा निवडणूकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्यामुळे, या आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूकांची गर्दी मोठी आहे. काहींना तर आजच ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतं’, अशी परिस्थिती आहे. 

एक मात्र नक्की की, येती विधानसभा निवडणूक ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्यासाठी नक्कीच सोपी राहीलेली नाही. ‘२०२४‘ मध्ये ‘२०१४’ ची पुनरावृत्ती होईल, अशी परिस्थिती आहे. त्यासाठी काही तीव्र इच्छूकांनी आपल्या अवास्तव व आवाक्याबाहेरच्या राजकीय महत्वाकांक्षेला मुरड घातली पाहिजे. ‘मला आमदार झाल्यासारखं वाटणाऱ्यांनी’ आधी तालुक्यांतील विविध प्रलंबित प्रश्न, समस्या यांचा अभ्यास केला पाहिजे. आमदार मोहिते हे राजकारणातील मुरब्बी व कसलेले पैलवान आहेत. त्यांना लढत देणे म्हणजे नक्कीच सोपी गोष्ट नाही.

शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झालेले विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे आगामी विधानसभा निवडणूकीसाठी पुन्हा एकदा बाह्या सावरून बसलेले आहेत. भलेही मोहितेंनी गेल्या निवडणूकीत प्रचारादरम्यान मतदारांना भावनिक आवाहन करत ‘ही माझी शेवटची निवडणूक असून मला निवडून द्या’ अशी साद घातली होती. मतदारांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. दिलीप अण्णा हे दिलेल्या शब्दाला पक्के असतात, असे त्यांच्याबद्दल नेहमीच बोलले जाते. परंतु ते शब्दाला कितीही पक्के असले तरी २०१९ च्या निवडणूकीत मतदारांना दिलेल्या वचनाला ते या निवडणूकीत जागतील, हे संभवत नाही. मोहिते ‘झाले गेले विसरून जा’ असे म्हणून पुन्हा एकदा आमदारकीला सामोरे जातील, यात शंकाच नाही.

असेही मोहितेंनी पंधरा वर्ष आमदारकी उपभोगलेली आहे. आता या निवडणूकीच्या भानगडीत न पडता स्वपक्षातील नव्यांना संधी देऊन त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे. परंतु प्रेमात व राजकारणात वयांचे बंधन नसते, सरसकट सर्व प्रकारची वचने, आणाभाका या पाळायच्या नसतात, असा अलिखित नियम असतो. त्याच पार्श्वभूमीवर मोहिते हे इतरांना ही संधी कधीच मिळू देणार नाहीत.

अजित पवार गटात माजी जि.प. सदस्य अनिल ऊर्फ बाबाशेठ राक्षे हे मोहितेंना योग्य असे पर्याय आहेत. वेळ आली तर राष्ट्रवादीच्या दोन्हीं गटांमध्ये बाबाशेठ राक्षेंच्या नावाबाबत एकमत होऊ शकते. खासदार शरदराव पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी देखील वैयक्तिकरित्या बाबाशेठ राक्षेंचे थेट संबंध आहेत. तसेच राक्षेंचे तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर चांगले संबंध आहेत. मनमिळावू स्वभाव, लोकांत मिसळणे, ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. यदाकदाचित मोहितेंना अजित पवार गटाची उमेदवारी मिळाली तर त्यांच्याविरोधात बाबाशेठ राक्षे यांच्या नावाला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची सहमती वा पाठिंबा मिळू शकतो, अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत. अशीही चर्चा आहे की, खेड तालुक्याच्या माजी आमदारांचे विविध गट मोहितेविरोध म्हणून बाबाशेठ राक्षेंच्या पाठीमागे आपली ताकद उभी करू शकतात.

सध्याचे राजकारण बघता राक्षेंना मोठी संधी चालून आलेली आहे. त्यामुळे आता नाही तर पुन्हा कधीच नाही, या तत्वाने बाबाशेठ राक्षेंनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. अजित पवार गटाच्या पक्षाची उमेदवारी जरी मिळाली नाही, तरी त्यांनी कोणतीही लवचिक भूमिका न घेता वेळप्रसंगी ताठरपणा दाखवून निवडणूकीच्या आखाड्यात उतरले पाहिजे. अन्यथा पुढील पाच वर्षे वाट पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काहीही उरणार नाही. अजून किती थांबायचे, याचा विचार राक्षे करतील का? हे येत्या काही दिवसांत कळेलच.

तसे पाहिले तर स्वत:च्याच दोन चुका व आतातायीपणा मोहितेंचा खेळ बिघडू शकतात. एक म्हणजे ‘२०१९ ची विधानसभा निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असून पुढची २०२४ ची विधानसभा निवडणूक मी लढविणार नाही’ ही घोषणा त्यांनी काही गावांच्या ग्रामदैवतांसमोर जाहीरपणे केली होती. त्यामुळे येत्या विधानसभेला मोहिते निवडणूकीला जरी उभे राहिले, तर तालुक्यातील जनता त्यांना त्यांच्या घोषणेची, वचनाची आठवण नक्कीच करून देऊ शकतात. त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया वा बचाव नेमका काय असेल? हे पाहणे गंमतीचे ठरणार आहे. आगामी निवडणूकीत प्रचारादरम्यान त्यांना तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना या प्रश्नाचे उत्तर जनतेच्या दरबारात द्यावेच लागणार आहे.

दुसरीकडे लोकसभा निवडणूकीपूर्वी शिवाजी अढळरावांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊ नये, यासाठी मोहितेंनी जी स्टंटबाजी केली, पक्षाला सोडचिठ्ठी देऊन घरी बसण्याची जी प्रतिज्ञा घेतली होती, तिला तोड नाही. एवढे सारे होऊनही क्षणार्धात
मोहितेंनी आपल्या भूमिकेपासून पळ काढला व लगोलग ‘तो मी नव्हेच’ ही भूमिका वठवून अढळरावांच्या गळ्यात गळा घातला. तसेच अढळरावांना प्रचारासाठी कडेवर घेऊन संपूर्ण तालुका पिंजून काढला, हे काही लोकांच्या पचनी पडलेले नाही.
इथेच मोहितेंची खरी गोची झाली आहे. जर आमदार मोहिते आपल्या अढळराव विरोधावर ठाम राहिले असते, तर आजचे चित्र वेगळे दिसले असते.

मुळातच नको त्या वेळी, नको त्या ठिकाणी व नको त्या विषयांवर व्यक्त होणे, हा दिलीप अण्णांचा पिंड म्हणा वा छंद म्हणा वा नाद म्हणा, कि जो त्यांना स्वस्थ बसू देत नाही. कामांच्या बाबतीत आमदार मोहिते हे इतरांच्या तुलनेत सरसच आहेत. परंतु पदरी असलेल्या कान फूंकणाऱ्या चुकीच्या सल्लागारांमुळे त्यांची अडचण होते.

दुसरीकडे अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आल्यामुळे खेड तालुक्यातील महाविकास आघाडीमघील विशेषत: शिवसेना ठाकरे गट व शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील विधानसभेसाठी इच्छूक असलेल्यांची छाती तर भलतीच फूगून गेलेली आहे. कोल्हेंना आम्हीच निवडून आणले, असाच काहींनी समज करून घेतलेला दिसतो. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत काही झाले तरी मीच आमदार होणार, असाच ग्रह संबंधितांनी करून घेतलेला आहे. काही इच्छूकांनी कोल्हेंच्या निवडीचे तालुक्यात किळस वाटेल अशा पद्धतीने फ्लेक्स लावून मीच कोल्हेंच्या पसंतीचा विधानसभेसाठीचा उमेदवार आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. लोकसभा व विधानसभेचे संदर्भ वेगळे असतात. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत कोल्हेंची जादू चालेलच असे काही नाही. लोकसभेला मतांची बेगमी करताना कोल्हेंनी विधानसभेला तिकीट मिळवून देण्यासाठी कुणा कुणाला नादी लावले हे कळावयास मार्ग नाही.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे हे या आघाडीकडून प्रमुख दावेदार आहेत. काळे यांनी जि प सदस्य या नात्याने व वैयक्तिक पातळीवर देखील तालुक्यात मोठी विकासकामे केलेली आहेत. पायाला भिंगरी लावून त्यांनी तालुका पिंजून काढलेला आहे. त्यांच्या कामांचा झपाटा मोठा आहे. तालुक्यात त्यांचा नातेसंबंध देखील मोठ्या प्रमाणात आहे. स्वत:चा जि प गट सोडून त्यांनी इतर गटांत देखील कामे केलेली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून काळे हे विधानसभेची तयारी करत आहेत. आजतरी महाविकास आघाडीतील शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटातील विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या इतरांपेक्षा त्यांची दावेदारी प्रबळ व भक्कम आहे. काळेंना देखील मोठी संधी आहे. दरम्यान हा मतदारसंघ आपल्याच गटाला मिळावा, यासाठी शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष व उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष जोरदार रस्सीखेच करणार, हे बाकी नक्की.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचा विचार केला तर ऐन लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केलेले माजी जि.प. सदस्य अतुल देशमुख हे विधानसभेसाठी तीव्र इच्छूक आहेत. असे असले तरी राष्ट्रवादीतील जुना गट त्यांना कितपत स्वीकारेल, हे सांगणे कठीण आहे. देशमुख यांना पक्षाअंतर्गत मोठा विरोध होऊ शकतो. तसेच याच गटाचे सुधीर मुंगसे हे देखील गुडघ्यांना बाशिंग बांधून उभेच आहेत. या महोदयांचे राजकिय कर्तृत्व नेमके काय व किती आहे, हे ज्ञात नाही.

दरम्यान महाविकास आघाडीकडून आमदार मोहितेंना अतुल देशमुख टक्कर देतील, अशी परिस्थिती नाही. कारण देशमुख यांच्या नावावर सर्वानुमते सहमती होऊ शकत नाही. मुळातच शरद पवार गटातील व उद्धव ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते देशमुखांना कितपत स्वीकारतील, हा खरा प्रश्न आहे. २०१९ मध्ये देशमुखांना जसा पाठींबा होता, तो आता दिसत नाही. दुसरीकडे सुधीर मुंगसे यांचा तर घासच नाही. त्यामुळे काळे हे मोहितेंना चांगली लढत देऊ शकतात. त्यासाठी आपल्या स्पर्धकांशी बाबाजीशेठ काळे कसे जूळवून घेतात, हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच पक्षांतर्गत स्पर्धकांना देखील सांभाळण्याची कसरत काळेंना करावी लागणार आहे. दरम्यान या त्रांगड्यामुळे महाविकास आघाडीकडील इच्छूकांना सोडून अनपेक्षितपणे एखादे धक्कादायक नांव देखील पुढे येऊ शकते.