खोगीरभरती केलेल्या उमेदवारांना लोकसभेवर पाठवू नका
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीत भाजपचे मावळते खासदार सुजय विखे व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. मतदारसंघातील समस्या, पाचवीला पुजलेली पाणीटंचाई, सिंचनासह इतरही अनेक प्रलंबित प्रश्नांवर बोलणे अपेक्षित असता दोघेही अगदी हमरीतुमरीवर आलेले आहेत. त्यातच सध्याच्या नेत्यांच्या राजकीय भाषेचा स्तर तर अत्यंत खालच्या पातळीवर गेला असून त्याकडे सर्वसामान्यांनी दुर्लक्षच केलेले बरे. गुंड, गुन्हेगार लोकं जसे एकमेकांकडे पाहिल्यावर त्यांच्यात एकमेकांबद्दलचा राग, चीड, खुन्नस जागी होते, त्याच पद्धतीचे प्रतिबिंब आता राजकारणात दिसत आहे.
नुकतेच सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्याबद्दल बोलताना ‘मी इंग्रजीतून जे भाषण केले ते लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत फाडफाड इंग्रजीतून भाषण करून दाखवावे, तसे झाले तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही’ असे विधान केले. मुळातच सुजय विखे यांचे हे विधान अत्यंत बालबोध व अपरिपक्व बुद्धीचे आहे. या विधानाला ना शेंडा ना बुडखा. आणि अशा लोकांना आपण खासदार म्हणून पुन्हा निवडून देणार आहात का? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडलेला आहे. आपण काय बोलतो, काय नाही, याचे भान जर पाच वर्ष खासदारकी उपभोगलेल्या व्यक्तीला नसेल तर काय म्हणायचे?
सुजय विखेंना इंग्रजीचे काय एवढे ते कौतुक? इंग्रजी येते म्हणून फार कर्तृत्व गाजवता येते, असा त्याचा अर्थ होत नाही. या भाषेमागे जी मस्ती वा मग्रूरपणा आहे, त्यामागे वर्षानुवर्षे एकाच कुटुंबात असणारी सर्व महत्वाची राजकीयपदे, सत्तेची ऊब व घराणेशाहीचा परिणाम आहे. आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद यांच्याच घरात, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यांच्याच घरात, साखर कारखाने, दुध संघ यांचेच, जिल्हा बॅंक यांच्याच ताब्यात, शिक्षण संस्था यांच्याच. अरे हे काय? सत्तेशिवाय हे लोकं राहूच शकत नाहीत का? केवळ राजकीय स्वार्थासाठीच यांनी सर्वच पक्षांचे उंबरे झिजवलेले आहेत. आणि त्याच प्रस्थापित घराणेशाहीचे या निवडणुकीत राजकीय उच्चाटन होणे गरजेचे आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे हे एकटेच फाडफाड इंग्रजी बोलू शकतात, असा त्यांचा भ्रम झालेला दिसतो. फाडफाड इंग्रजी बोलणारे आज गल्लोगल्ली व पावलागणिक असंख्य भेटतात. अगदी लहान लहान पोरं देखील तुमच्यापेक्षा चांगली फाडफाड इंग्रजी बोलतात. तुमच्या इंग्रजीला कुणी हूंगूनही विचारणार नाही. तुमची इंग्रजी बासनात गुंडाळून भिंतीवर टांगून ठेवा. इंग्रजी भाषा आली म्हणजे संबंधित व्यक्तीच्या ज्ञानात फारच मोठी वाढ होते, असेही काही नाही.
खासदार व्हायचे असेल तर इंग्रजी भाषा आलीच पाहिजे, असा काही नियम आहे का? त्यामुळे मतदारांनी सुद्धा अशा गर्विष्ठ मावळत्या खासदाराला घरीच बसविणे योग्य ठरेल. पुन्हा जर या महोदयांना निवडून दिले तर हे म्हणतील की, माझ्या मतदारसंघातील ज्यांना ज्यांना इंग्रजी येते, त्यांनीच मला भेटायला यायचे व आपल्या समस्या इंग्रजीतच मांडायच्या. ज्यांना कुणाला इंग्रजी येत नसेल त्यांनी अजिबात मला भेटण्याचा प्रयत्न करायचा नाही.
निरर्थक व पोरकट वाद घालण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्षांत आपण काय काय दिवे लावले, ते आधी जनतेपुढे दाखवा. नगर मनमाड महामार्गाचे काम तुम्हाला अजून पूर्ण करता आलेले नाही. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी, वाहनचालकांनी प्रचंड त्रास सहन केलेला आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या एका गणंग कार्यकर्त्याने प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे व त्यांच्या कुटुंबियांवर जी काही असभ्य, असमर्थनीय व घाणेरडी भाषा वापरली, तिचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. अशा प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करून ती जागेवर ठेचून काढणे गरजेचे आहे.
ऐतिहासिक अहमदनगर शहरातील रस्त्यांची काय अवस्था आहे, तसेच चिंचोळ्या रस्त्यांमुळे शहराच्या बाजारपेठांतून धड पायी नीट चालता येत नाही. या पेठांमध्ये चारचाकी गाड्या आणणे म्हणजे मोठेच दिव्य असते. आणि ही परिस्थिती आजची नाही. वर्षानुवर्षे ही समस्या अस्तित्वात असून पिढ्यानपिढ्या सत्ता हातात असलेल्यांना अजून शहराच्या विकासाकडे वेळ देतां आलेला नाही. मुळातच तेवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची नगर जिल्ह्यात वानवाच आहे. ज्याने त्याने फक्त आपापल्या गढ्या सुरक्षित ठेवून स्वत:चाच विकास केलेला आहे.
दरम्यान राजकीय नेते आपल्याच लोकांवर कशा पद्धतीने अन्याय करतात, त्यांचे जीवनमान कशा प्रकारे उध्वस्त करतात, याचे जिवंत व ज्वलंत उदाहरण म्हणजे वांबोरी चारी.
पन्नास वर्षांनंतरही अहमदनगर जिल्ह्यातील मूळ ‘वांबोरी चारी योजना’ ही कागदावरच धूळ खात पडून असून ती प्रत्यक्षात आकाराला येऊ शकलेली नाही, आणि हे कटू सत्य होय. मुळातच बंदिस्त पाथर्डी पाईप चारी ही मूळ प्रवाही वांबोरी चारी योजना नाही. त्यामुळे पाथर्डी पाईप चारीलाच प्रवाही वांबोरी चारी म्हणवून घेणाऱ्यांनी स्वत:चे जरूर सांत्वन करून घ्यावे, परंतू जिरायत शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. वस्तुस्थिती अशी आहे की, नगर जिल्ह्यातीलच रहिवासी असलेले सर्वस्वी बी. जे. खताळ, गोविंदराव आदिक, आबासाहेब निंबाळकर व अण्णासाहेब म्हस्के ही मान्यवर मंडळी पाटबंधारे मंत्रीपदावर दिर्घकाळ राहूनही वांबोरी चारी होऊ शकलेली नाही, हीच चारीची खरी शोकांतिका आहे.
त्यामुळे ज्या उमेदवाराकडे विकासाची दूरदृष्टी आहे, लोकांच्या प्रश्नांची योग्य ती जाण आहे आणि ती सोडवण्याचा त्याचा प्रामाणिक हेतू असेल, अशाच उमेदवाराला मतदारांनी निवडून दिले पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा, अपक्ष उमेदवार जरी असला तरी चालेल.