दामू उर्फ दामाजी ‘अण्णा’ची प्रशासनातील ढवळाढवळ
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे.
टिप:- या लेखातील दामू उर्फ दामाजी ‘अण्णा’ ही व्यक्तीरेखा व त्याच्याशी संबंधित घटना या काल्पनिक कथेवर आधारीत आहेत. त्यांचा अस्तित्वातील कोणतीही व्यक्ती वा सत्य घटनांशी काहीही एक संबंध नाही किंवा जोडण्याचा प्रयत्न करू नये. असेलच तर तो एक निव्वळ काल्पनिक योगायोग समजावा.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका ऐतिहासिक अशा तालुक्याचे दामू उर्फ दामाजी अण्णा हे नेतृत्व करतात. दामू अण्णा तसा अत्यंत आक्रस्ताळी, महत्वाकांक्षी, असंतुष्ट, लोभी, रगेल व रंगेल (रंगीबेरंगी कपडे घालण्याची हौस) स्वभावाचा.
मी म्हणेल तीच पूर्व दिशा, असाच त्यांचा स्वभाव. दाम या शब्दाबद्दल अण्णाला भलताच मोह. कदाचित त्यामुळेच त्यांचे नाव दामू उर्फ दामाजी असे ठेवले असावे. संपूर्ण तालुक्याचे जणू काही आपणच मालक आहोत, जहागिरदार आहोत, अशाच सरदारी थाटात त्यांचे वागणे असते. अण्णासेना तथा भक्त सोडले तर सर्वसामान्य लोकांना त्यांच्या वागणूकीचा अक्षरश: कंटाळा आलेला आहे. तरी पण अण्णा काही सुधरायचे प्रयत्नच करत नाही. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने अण्णाला एकदा चांगलाच धडा शिकविला होता. परंतू तरीसुद्धा अण्णाचा मूळ स्वभाव काही केल्या बदलतच नाही. त्यामुळे तालुक्यांतील जनता यावेळी अण्णाला भीमटोला देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
एकीकडे तालुक्याचे आपणच पालक आहोत, खरेखुरे विकासपूरुष आहोत, तालुक्याच्या विकासाची आपल्यालाच काळजी आहे, असे छातीठोकपणे सांगायचे व दुसरीकडे स्वत:च्याच तुंबड्या भरायच्या, हेच तत्व अण्णांनी अंगिकारलेले आहे. दरम्यान सर्वसामान्य लोकांत असेही बोलले जाते की, अण्णा कुणाचाच नाही. तो फक्त पैशाचाच आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी अण्णाला फक्त पैसाच दिसतो.
अण्णाला तालुक्यांतील जनतेची एवढी काळजी आहे की तालुक्याच्या सर्वांगीण विकासात हातभार लावण्यासाठी अण्णांनी आपल्या भावकीतीत, जवळच्या नात्यातील बेरोजगार पोरांची मोठीच फौज मैदानात उतरवली आहे. प्रामुख्याने यांत अण्णाचे पुतणे, जवळचे व दूरदूरच्या असंख्य भाच्यांचा सक्रिय सहभाग आहे. दामू अण्णांच्या सर्व पुतण्या भाच्यांनी विकासरूपी गंगेत एवढे प्रचंड प्रमाणात हातपाय ओले करून घेतलेले आहेत की कुबेराला लाजवील, असा गंगामाईचा आशिर्वादरूपी खजिना त्यांनी कमावलेला आहे व कमवत आहेत.
तसेच तालुक्यातील कारखानदारी म्हणजे अण्णाचा जीव कि प्राण. जाता येतां कारखाने बघू बघू अण्णांनी स्वत:च्या मालकीचे कारखाने कधी व कसे उभारले व स्वत: एक कारखानदार म्हणून कसा प्रकाशझोतात आला, याचा थांगपत्ता व कोडे तालुक्यांतील भोळ्याभाबड्या जनतेला कधी कळालेच नाही. अण्णाची ही कामगिरी डोळ्यांत भरेल अशीच आहे. भूमातेची सेवा करायची म्हणून अण्णानी मोठ्या प्रमाणात जमिनी जतन करून ठेवलेल्या आहेत.
एकंदरीतच अण्णांनी प्रचंड प्रेम, ‘माया’ कमवून जनतेची मोठीच सेवा केलेली आहे. अण्णाला ‘मायेचा भस्म्या’ झाला, असेच तालुक्यांतील लोकं गमतीने म्हणत असतात.
अण्णा तालुक्याचे पहिल्यांदा जेव्हा नेतृत्व करायला लागले, त्यावेळी त्यांच्याकडे एकदम साधी चारचाकी गाडी होती. परंतू जनतेची माया कमावल्यामुळे आज अण्णाच्या दावणीला आलिशान व महागड्या गाड्यांची रास लागलेली आहे.
गंमत म्हणा किंवा तालुक्याचे दुर्भाग्य. तालुक्याच्या ठिकाणी दररोज हजारो नागरीक विविध कामांसाठी येत असतात. परंतू विकास पुरूष समजणाऱ्या अण्णाला तालुक्याच्या ठिकाणी ना मुताऱ्या बांधता आल्या ना पिण्याच्या पाण्याची सोय करता आली. हे अण्णा पण नाकारू शकत नाही.
दरम्यान तालुक्यात कोणताही वरिष्ठ सरकारी अधिकारी बसवायचा असो, अण्णाची शिफारस वा आशिर्वाद घेतल्याशिवाय त्याला खुर्चीवर बसताच येत नाही, असा दंडकच आहे. त्यासाठी अण्णाला औक्षण करून प्रसादाने भरलेली परात त्यांच्या पुढ्यात ठेवल्याशिवाय अण्णा पावतच नाही, असे म्हणतात. अण्णा कधी संतुष्टच होत नाही. नव्याचे नऊ दिवस संपल्यावर अण्णा पुन्हा मूळ स्वभाव धारण करून त्या अधिकाऱ्याला जाणूनबूजून त्रास देण्याचे काम करतात. कितीही ‘दिले’ तरी अण्णाची भूक काही मिटतच नाही. अण्णाची भूक सारखी वाढतच जाते.
दुसरीकडे जर एखादा अधिकारी अण्णाच्या अपरोक्ष वा शिफारसीशिवाय तालुक्यात बसलाच तर त्याची काही खैर नसते. अण्णा त्या अधिकाऱ्याला विविध माध्यमातून, मार्गाने एवढा त्रास देतात की विचारतां सोय नाही. साध्या साध्या गोष्टीत अण्णा अधिकाऱ्यांना स्वत:चे घरचे नोकर आहेत असे समजून नको ते चुकीचे कामे करायला सांगतात. जर अधिकाऱ्याने सदर चुकीचे काम करण्यास नकार दिला, तर मग अण्णाचा पारा भलताच वाढतो. एखादा अधिकारी अण्णाला नडला तर त्याला प्रचंड मानसिक त्रास दिला जातो. अधिकाऱ्यांना दमदाटी करणे, कायम दहशतीत ठेवणे, पदोपदी अपमान करणे, यात अण्णाला नेहमीच असुरी आनंद मिळत असतो.
एखाद्या व्यक्तीने वा भक्ताने कामाबद्दल सरकारी अधिकारी वा कर्मचाऱ्यांबद्दल काही तक्रारी केल्या तर त्याची कोणतीही शहानिशा न करता अधिकाऱ्यांचे जाऊद्या हो पण अगदी साध्या साध्या कर्मचाऱ्यांना देखील फोन करून अद्वातद्वा बोलणे प्रसंगी वाईट भाषा वापरणे, त्याला समक्ष भेटायला बोलावणे या गोष्टी अगदी सामान्य झाल्या आहेत.
अधिकाऱ्यांना मोकळेपणाने काम करू न देणे ही तर अण्णाची खासियत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मुळातच प्रशासकीय कामात काहीएक संबंध नसताना देखील अण्णा नेहमीच ढवळाढवळ करण्याचे काम करतात. विरोधी गटाचे, विरोधात असलेल्या गावांतील लोकांचे काम करू नये, यासाठी अण्णा अधिकाऱ्यांवर कायम दबाव टाकत असतात. कोणतेही काम असो ते आपल्याच सग्यासोयऱ्यांना, बगलबच्च्यांना मिळाले पाहिजे, यासाठी अण्णा आकाशपाताळ एक करतात.
चांगल्या अधिकाऱ्यांना काम करताना सातत्याने अडथळे आणण्याचे काम अण्णा करत असतात. असो, साठी बुद्धी नाठी, असेच अण्णाबद्दल झालेले आहे. शेवटी पैशांची, पदाची कितीही मस्ती करत असाल तर ती मस्ती उतरवल्याशिवाय सर्वसामान्य जनता स्वस्थ बसत नसते. आणि हा इतिहास आहे.
…