वळसेंचा आवाका फक्त ‘आंबेगांव तालुक्यापुरताच’

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

ज्या दिलीपचा दिलीपराव केला, दिलीपरावजी केला, आमदार केला, विविध मलईदार खात्यांचा मंत्री केले, विधानसभा अध्यक्ष केले, ज्याला मानसपुत्र, उजवा हात समजून भरपूर प्रेम दिले, त्याच दिलीपने तृप्तीचे ढेकर देऊन अतृप्त होत माझ्यासाठी तुम्ही काय केले? असे म्हणून पांग फेडावे, अशीच काहीशी भावना वा तीव्र वेदना शरदराव पवारांना झाल्या असतील, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

सांगायचे तात्पर्य असे की, गेल्या महिन्यात बोलता बोलता नामदार दिलीप वळसे बोलून गेले की, ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. परंतू शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असतानाही फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात. एकप्रकारे वळसेंनी शरदराव पवारांच्या राजकीय क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवण्याचे काम केलेले आहे.

एक मात्र वळसे नक्कीच विसरलेले दिसतात की, स्वबळावर सत्ता न आणताही शरदराव पवारांनी तुम्हाला इतक्या वर्ष विविध मंत्रीपदांच्या माध्यमातून सत्ता उबवायला दिलीच ना? कमीत कमी दोन तीन आमदार निवडून आणण्याची क्षमता नसूनही शरदरावांच्याच वशिल्यामुळे तुम्हाला दरवेळी मंत्रीपद मिळत गेली, हेही तुम्ही विसरलात का?  दुसऱ्यांकडून ६०/७० आमदारांची अपेक्षा ठेवताना स्वबळावर दिलीपराव तुम्हाला पाच आमदार तरी निवडून आणता येतील का? तेही जाऊद्या, शेजारच्या खेड तालुक्याच्या तुमच्याच पक्षाच्या आमदाराने तरी कधी निवडून येण्यासाठी तुमची मदत घेतली?

वळसेंचे हे वक्तव्य अजाणतेपणातून झालेले नाही. कदाचित कुणाला तरी खुश करण्यासाठी किंवा राज्यभर प्रसिद्धी मिळविण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलेले असावे. महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्र्यांसारखे तगडे मंत्रीपद देऊनही त्यांना ते अजिबात झेपले नाही, हा इतिहास ताजा आहे.

शरदराव पवारांचे जाऊ द्या, यापूर्वी झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये आपण स्वत:च्या ताकदीवर किती आमदारांना निवडून आणले वा येत्या विधानसभा निवडणूकीमध्ये किती आमदारांना निवडून आणू शकता? याचे जाहीर उत्तर वळसे देतील का?

राज्यात स्बवळावर सत्ता आणणे ही काय एकट्या शरदराव पवारांचीच जबाबदारी आहे का? तुमची नैतिक जबाबदारी काहीच नाही का? तुम्ही फक्त मंत्रीपदे उपभोगायलाच आहात का? मोठ्या मनाने कधी मंत्रिपदाचा मान शेजारच्या खेड तालुक्याला मिळावा, यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का? माजी आमदार स्व. नारायणराव पवार व विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवण्याचे काम कुणी केले व करत आहे?

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काॅंग्रेसला स्पष्ट बहुमत न मिळण्यामागे वा एकहाती सत्ता न येण्यामागे या पक्षातील वळसेंसारखे इतरही जी काही स्वयंभू बडे, बलाढ्य, प्रभावशाली, अशी बिरूदे लावलेली प्रस्थापित मंडळी आहेत, ती खऱ्या अर्थाने जबाबदार आहेत. वर्षानुवर्षे आपापल्या गढ्या वा सामंतशाह्या सुरक्षित ठेवणे, हिच वरील लोकांची राजकिय महत्वकांक्षा राहिलेली आहे. दुभंगलेल्या राष्ट्रवादीत राष्ट्रीय पक्षाध्यक्ष शरदराव पवार व नामदार अजित पवार सोडले तर स्वत:च्या ताकदीवर एखाद दुसरा आमदार निवडून आणण्याच्या क्षमतेचा तिसरा नेता तरी कोण आहे?

दरम्यान सेनापती कितीही शूर, योद्धा असला किंवा एकहाती लढाई जिंकून देणारा असला तरी त्याच्या हाताखालचे सैनिक सुद्धा तेवढेच शूर, कर्तृत्ववान असावे लागतात. शेवटी सैनिकांच्या जीवावर, भरवशावरच सेनापती युद्ध जिंकत असतो. इथं सैनिकच जर पाठ दाखवून मैदानातून पळ काढत असतील, आपापल्या गढ्या शाबूत ठेऊन गमंत बघत असतील, तर सेनापती एकटा प्राणाची बाजू लावून किती व कसा लढणार? याचा विचार निष्ठावान समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी कधी केला का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडलेला आहे. मुळातच हा प्रश्न दिलीप वळसेंनी स्वतःलाच विचारला असता तर बरं झालं असतं.

शरदराव पवारांनी डोक्यावर हात ठेवला नसता तर वळसेंना उभ्या हयातीत कधी आमदार, मंत्री सोडा, साधा ग्रामपंचायत सदस्य वा सोसायटीचा संचालक तरी होता आले असते का? हा महत्वाचा प्रश्न आहे.

ज्या शरदराव पवारांमुळे आपल्याला एवढे सारे काही मिळाले, त्यांच्याबद्दलच असे जिव्हारी बोलायचे व नंतर माफी मागून शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, त्यांना मी कधीही अंतर देणार नाही आणि त्यांच्याबद्दल वाकडा शब्दही बोलणार नाही, असे म्हणून मखलाशी मारायची? याला काहीएक अर्थ नाही.

दरम्यान वस्तुस्थिती अशी आहे की, वळसेंच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. किंबहुना वळसे आंबेगांव तालुक्यापुरतेच मर्यादित आहेत, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. राज्याचे जाऊ द्या, पुणे जिल्ह्यात तरी वळसेंचा किती प्रभाव आहे? असे असते तर ते शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजी अढळराव यांच्याविरोधात नक्कीच उभे राहिले असते. वळसे जर राज्यस्तरावरचे मोठे नेते असतील तर त्यांनी येत्या विधानसभा निवडणूकीमध्ये आंबेगांव तालुका सोडून शेजारच्या खेड तालुक्यात उभे राहून निवडून येऊन दाखवावे.

तसे पाहिले तर राष्ट्रवादी पक्ष एकसंघ असताना त्यांचे अजित पवारांशी तरी कधी पटत होते? तरीदेखील वळसेंनी अजित पवारांच्या बंडाला साथ दिल्यामुळे खेड व आंबेगांव तालुक्यांतील जनतेला खरंच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे.

शरदराव पवारांना सोडून अजित पवारांना साथ देण्यामागे वळसेंची नक्कीच काहीतरी मजबूरी असावी अथवा एखादी व्यावसायिक वा आर्थिक दुखरी नस दाबल्यामुळेच ते अजित पवारांना साथ देण्यास तयार झाले असावेत, अशी चर्चा जनसामान्यांत बोलली जात आहे. तसेच दिलीप वळसेंना चांगले माहित होते की, अजित पवारांच्या बंडात खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते हे नक्कीच साथ देतील व बक्षिसी म्हणून त्यांना मंत्रीपदाची लाॅटरी देखील लागेल. आणि असे झाले तर मंत्रीपदाची संधी आपल्याला मिळणार नाही. वर्षानुवर्षे ज्या दिलीप मोहितेंना मंत्री होऊ दिले नाही, तेच मोहिते कॅबिनेट मंत्री झाले तर ते कसे सहन करायचे? हेही कारण वळसेंच्या अजित पवार गटात सामिल होण्यामागे असू शकते.

असो, ‘जो बूॅंद से गयी वो हौद से नहीं आती’.