भीमाशंकर अभयारण्यात रस्त्याच्या कामासाठी सुरूंगाचा वापर करून खडक खोदाई
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

अभयारण्य क्षेत्र तसेच राष्ट्रीय उद्यानांमध्ये सुरूंगाचा (जिलेटीन कांड्या) वापर करून स्फोट घडविण्यास पूर्णत: बंदी असली तरी भीमाशंकर अभयारण्यात टेकडी फोडण्यासाठी गेली चार ते पाच महिन्यांपासून सुरूंगाचा प्रचंड प्रमाणात वापर करून भोरगिरी ते वेल्होळी दरम्यान नवीन रस्ता तयार केला जात आहे. स्फोटकांच्या आवाजामुळे परिसरातील वन्यजीवांच्या मुक्त संचारावर मर्यादा येवून, तसेच त्यांचा अधिवास बाधित झाल्यामुळे वन्यजीवांना गंभीर धोका निर्माण झालेला आहे.
दरम्यान सदर उत्खनन खाजगी मालकीच्या हद्दीत होत असल्यामुळे कारवाई करता येत नसल्याचे संबंधित वनअधिकाऱ्याने सांगितले.
मुळातच अभयारण्य वा अतिसंवेदनशील क्षेत्रात स्फोटकांची वाहतूक करणे व स्फोट घडविणे, यांवर पूर्णत: प्रतिबंध आहे. तसेच मान. सर्वोच्च न्यायालयाने देखील संवेदनशील क्षेत्रात उत्खनन करण्यास प्रतिबंध केलेला आहे. असे असूनही राजरोसपणे अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातच स्फोटकांचा वापर होऊन जंगलाची नासाडी केली जात असता, याची साधी कल्पनाही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नसेल तर हे फारच गंभीर म्हणावे लागेल.
याबाबत भीमाशंकर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांना विचारले असता सुरूवातीला त्यांनी सुरूंगाचा वापर होत नसल्याचे ठासून सांगितले. नंतर सारवासारव करताना सदर उत्खनन अभयारण्यातील खाजगी मालकीच्या हद्दीत होत असून वन्यजीव विभागाचा गट लांब आहे. याबाबत काय करता येईल बघू, असे सांगून हात झटकले.
महत्वाचे म्हणजे भीमाशंकर अभयारण्यात भोरगिरी बीट हे वन्यजीवांच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असे आहे.
रस्ता तयार करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांचे व इतर वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सदर नुकसानीस जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.
दरम्यान भीमाशंकर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच संबंधित वनपाल, वनरक्षक यांना सदर गंभीर प्रकार माहिती असूनही त्यांनी याकडे जाणूनबूजून दुर्लक्ष करण्याचे काम केलेले आहे. त्यांच्याच आशिर्वादाने उत्खनन केले जात आहे.
ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अभयारण्याच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी आहे, तीच मंडळी भीमाशंकर अभयारण्याच्या जीवावर उठली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. एकंदरीतच संबंधितांनी कर्तव्यात कसूर केलेली आहे. आणि त्याचा मोठा फटका अतिसंवेदनशील असे अभयारण्य क्षेत्र व वन्यजीवांना बसलेला आहे.
त्यामुळे संबंधित जबाबदार वनअधिकारी व वन कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी. तसेच त्यांच्यावर देखील तातडीने वनगुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
उत्खनन होत असताना इतक्या दिवस संबंधित अधिकारी, कर्मचारी झोपले होते का? त्यांनी संबंधितांवर वेळीच कारवाई करून काम का थांबवले नाही? जर वेळीच संबंधित उत्खननाचे काम थांबविले असते, तर एवढ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेच नसते. अशीही चर्चा परिसरात सुरू आहे. आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची हीच असंवेदनशील भूमिका मात्र वनसंपदा व वन्यजीवांच्या मुळावर उठली आहे.
यापूर्वी देखील अभयारण्याच्या अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीने व आशिर्वादाने २०१२ च्या पावसाळयात भोरगिरी ते गुप्त भीमा दरम्यान अतिसंवेदनशील भागातून बेकायदेशीरपणे रस्त्याचे रूंदीकरण करून अभयारण्याचे मोठे नुकसान केलेले आहे. संबंधितांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच निगडाळे येथे देखील एका राजकिय पक्षाच्या नेत्याच्या संबंधित स्थानिक व्यक्तीने दोन ते तीन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केलेला आहे.
महत्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून अभयारण्य क्षेत्रात कोणत्याही नवीन रस्त्यांच्या कामांसाठी केंद्र शासनाकडून बंदी घालण्यात आल्याचे समजते. तरीदेखील संवेदनशील क्षेत्रात अशाप्रकारे सुरूंगाचा वापर होत असेल तर ते निश्चितच गंभीर म्हणावे लागेल.