उद्धव ठाकरे यांची नेमकी भूमिका काय समजायची?

udhav thakre

द्वारा.. अतुल दत्तात्रय काळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानासाठी माझ्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रोखले… उद्धव ठाकरे ( दि, ९/१०/२०१४.. विधानसभा निवडणूक प्रचार सभा, स्थळ..मार्केट यार्ड, चाकण). 

काँग्रेसचा निर्लज्जपणा व कोडगेपणा भाजपकडे….. उद्धव ठाकरे ( दि, २२/१०/२०१८.. शेतकरी मेळावा.. स्थळ.. मार्केट यार्ड, राजगुरुनगर) 

शिवसेनेने भाजपशी मनापासून युती केली.. उद्धव ठाकरे (११/१०/२०१९..विधानसभा निवडणूक प्रचार सभा, स्थळ.. मार्केट यार्ड, राजगुरुनगर)

एकमेकांवर सातत्याने टिका करणारे राजकीय नेते स्वार्थासाठी म्हणा किंवा काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपापसातील राजकीय कटुता, हाडवैर, मानापमान बाजूला सारून कसे एकदिलाने एकत्र येतात, याचा अनुभव जनतेला आता नवीन राहिलेला नाही. या गोष्टी आता अगदी सर्वमान्य व सर्वसामान्य झालेल्या आहेत. महत्वाचे म्हणजे ज्या विद्युत वेगाने सदर नेतेमंडळी त्यांच्या भूमिका बदलतात, झाले गेले विसरून जातात, याला खरोखर तोड नाही. आणि याचा अनुभव खेड तालुक्यातील जनतेला नुकताच येऊन गेला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पारंपरिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व भाजप यांची अभेद्य युती राजकीय वर्चस्वातून संपुष्टात आली होती. दोन्हीही पक्ष स्वतंत्रपणे त्या निवडणुकीला सामोरे गेले होते. त्या निवडणुकीत खेड-आळंदी या विधानसभा मतदारसंघातून सुरेश गोरे यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी गोरे यांच्या प्रचारासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची तोफ चाकण येथील बाजार समितीच्या भव्य प्रांगणात धडाडली होती. सभेला प्रचंड गर्दी होती.

सभेला संबोधन करताना ठाकरे यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली होती. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानासाठी माझ्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रोखले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. तसेच वाघनख्यांद्वारे राजकीय कोथळा बाहेर काढणार असा इशारा देऊन भाजपवर विश्वासघाताचा देखील आरोप केला होता.

दुसरीकडे गेल्यावर्षी राजगुरुनगर बस स्थानकासमोर बांधण्यात आलेल्या थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तसेच भगतसिंग व सुखदेव यांच्या अर्धाकृती पुतळयांचे अनावरण व भीमा नदीवर केदारेश्वर बंधाऱ्याच्या खालील भागात नव्यानेच बांधण्यात आलेल्या पुलाच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे हे राजगुरुनगरच्या दौऱ्यावर आले होते.

त्यावेळी राजगुरुनगर येथील मार्केट यार्डच्या पटांगणात आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी ‘सध्या देशातील परिस्थिती खुपच बिकट असून वातावरणात वेगळ्याच प्रकारची उष्णता निर्माण झालेली आहे. त्यामुळे सरकारने या उष्णतेची धग लवकर ओळखावी. अन्यथा यामध्ये सत्ताधाऱ्यांची सिंहासने जळून खाक होतील, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. तसेच ‘पूर्वी काँग्रेसकडे जो निर्लज्जपणा व कोडगेपणा होता, तो आता भाजपकडे आला आहे, असा घणाघात केला होता. तसेच राज्य सरकारने कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची जी यादी प्रसिद्ध केली होती, ती खोटी असल्याचा आरोप केला होता. 

दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यातच यंदा पाऊस देखील भरपूर प्रमाणात बरसला आहे. दोन्हीही पक्ष पाच वर्षे म्हणजे लोकसभा निवडणुकीपर्यंत भांड भांड भांडले. या विधानसभा निवडणुकीत युती होईल कि नाही, याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली होती. दोन्ही बाजूंकडून ताणाताणी सुरु होती. अखेर ‘एकदाचं गंगेत घोडं न्हालं’ आणि युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील जनतेने एकदाचा ताणून धरलेला दिर्घ श्वास सोडला. कारण गेल्या पाच वर्षांत राज्यातील सर्व महत्वाचे प्रश्न बाजुला पडून या दोन्ही पक्षांतील भांडणेच केंद्रस्थानी राहिली होती. असो. 

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची नुकतीच राजगुरुनगर येथील मार्केट यार्डच्याच भव्य पटांगणातत जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेनेने भाजपशी मनापासून युती केली‘ असल्याचे सांगितले. 

गमंत म्हणजे वर्षभरापूर्वी ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता, त्याच ठिकाणी, त्याच जनतेसमोर वर्षभरानंतर अगदी सहजतेने, लीलया, जबरदस्त ‘यु टर्न’ घेऊन पूर्वीच्या आपल्या भूमिकेशी फारकत घेतली. 

याला संधीसाधूपणा म्हणायचा? युती धर्माचे पालन केले असा अर्थ काढायचा? तडजोड म्हणायची? अगतिकता म्हणायची? कि अन्य काही समजायचे? हे ज्याच्या त्याच्या आकलनशक्तीवर म्हणा किंवा स्मरणशक्तीवर अवलंबून आहे.