भीमाशंकर अभयारण्याच्या संरक्षण व संवर्धनाबाबत वन्यजीव विभाग निष्क्रीयच.

bhimashankar

By अतुल दत्तात्रय काळे

‘महादेव वन’ या पर्यटनस्थळाच्या माध्यमातून वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित मंत्री महोदयांच्या संमतीने कोकण कड्यावर सुरु असलेला पर्यावरणाचा विध्वंस, वाढता मानवी हस्तक्षेप, जंगलतोड, अनधिकृत बांधकामे, हॉटेल्स, रिसोर्ट्स, काही भागात झाडे तोडून करण्यात आलेले बेकायदेशीर रस्ते, थेट कोअर भागातूनच होणारी वाहनांची ये-जा, ध्वनिप्रदूषण, इंधनामुळे  होणारे वायुप्रदूषण, वन्यप्राण्यांच्या शिकारी, प्रचंड प्रमाणात होत असलेला प्लास्टिकचा वापर, पडकईच्या माध्यमातून डोंगर फोडून निर्माण करण्यात आलेली जमीन, जंगल क्षेत्रात वाढलेला पाळीव प्राण्यांचा वावर अशा विविध कारणांमुळे वन्यजीवांच्या अधिवासाच्या दृष्टीने अतिशय धोकाग्रस्त बनलेल्या भीमाशंकर अभयारण्याच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. किंबहुना भीमाशंकर अभयारण्य धोक्याच्या उंबरठ्यावर उभे आहे.

तसेच अभयारण्याच्या लगतच्या गावांच्या हद्दीतील वनसदृश्य जंगलात देखील हिरवेगार डोंगर फोडून निसर्गाला हानिकारक ठरू शकणाऱ्या धनदांडग्या लोकांच्या खाजगी प्रकल्पांची कामे सुरु आहेत. भीमाशंकर अभयारण्यातच व आजुबाजुला ठिकठिकाणी जमींनीभोवती तारेचे कुंपण नजरेस पडू लागलेली आहेत. एकंदरीतच चोहोबाजूंनी भीमाशंकर अभयारण्याला नखे लावण्याचाच प्रकार सुरु आहे. यावर तातडीने नियंत्रण आणण्याची गरज आहे. अन्यथा पश्चिम घाटावरील हा बहुमुल्य असा ठेवा नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती अभ्यासक व निसर्गप्रेमींनी  व्यक्त केलेली आहे.

पुणे वन्यजीव विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, भीमाशंकर अभयारण्यातील भोरगिरी ते भीमाशंकर यादरम्यान कुठलाही वनरस्ता अस्तित्वात नाही. तरीदेखील २००८ आणि २०१२ मध्ये बेकायदेशीररित्या भोरगिरी ते भीमाशंकर या रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. २०१२ मध्ये तर पंधरा ते वीस जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने मोठया प्रमाणात व घाईगडबडीत या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. या रस्त्याचे रुंदीकरण करताना रस्त्याच्या कडेच्या छोट्या टेकड्याही जेसीबीने अक्षरशः तासून काढण्यात आलेल्या होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार काढून बाजूच्या लहान मोठ्या झाडांचे नुकसान करण्यात आलेले होते. परंतु मोठ्या प्रमाणात जंगलाचे नुकसान होऊनही तत्कालीन वनाधिकाऱ्यांनी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले होते. संबंधित तत्कालीन दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वनगुन्हे दाखल होण्याऐवजी वरिष्ठांनी त्यांना वाचवण्याचेच काम केलेले आहे.

तसेच आंबेगाव हद्दीतून भीमाशंकरच्या अलीकडील निगडाळे येथे एका स्थानिक व्यावसायिकाने बेकायदेशीर दोन ते तीन किमी लांबीचा रस्ता तयार केलेला आहे. भीमाशंकर येथे जाण्यासाठी भोरगिरी ते निगडाळे असा रिंग रोड काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. दुसरीकडे भीमाशंकर अभयारण्यात बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर हॉटेल्सवर वन्यजीव विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल निसर्गप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

भोरगिरी गावाच्या वरच्या बाजुला वेल्होली गावाच्या पायथ्याशी असलेल्या अतिसंवेदनशील भागातील जंगलामध्ये भिमा नदीला मिळणाऱ्या एका ओढ्यावर सिमेंटच्या पुलाचे काम वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने करण्यात आलेले आहे. दरम्यान या पुलाच्या बांधकामासाठी वन्यजीव विभागाची कोणत्याही प्रकारची लेखी परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या पुलासाठी पुणे येथील एक प्रसिद्ध निसर्ग संवर्धन संस्था फारच आग्रही होती. यासाठी सदर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयस्थित एका बड्या अधिकाऱ्याचा दबाव संबंधितांवर आणला होता. की ज्या अधिकाऱ्याची नुकतीच मुंबई महापालिकेत बदली झालेली आहे. दरम्यान संबंधित पुलाचे काम खाजगी जागेत केल्याचे सांगून वरिष्ठ अधिकारी स्वता:ची जबाबदारी झटकू पाहत आहेत.

मुळातच टोपोसिट मध्ये भोरगिरी ते वेल्हाेली दरम्यान रस्ता अस्तित्वात नसताना देखील या रस्त्यासाठी वन्यजीव विभाग आग्रही आहे. पुलाचे बांधकाम ज्या ओढ्यावर करण्यात आले, त्याठिकाणी जाण्यासाठी सुमारे तीनशे मीटर इतक्या संरक्षित वनक्षेत्राच्या हद्दीतून पाऊल वाटेने जावे लागते. ही पाऊल वाट दाट झाडीतून गेलेली आहे. या लहान पाऊल वाटेने संबधित ठिकाणी पुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य वाहनांमधून नेणे शक्य नसल्यामुळे ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार बेकायदेशीरपणे विविध प्रजातींची झाडी तोडून जेसीबीच्या साहाय्याने पाऊल वाटेचा दहा ते बारा फुट इतक्या रूंदीचा रस्ता तयार केला आहे. 

भीमाशंकर अभयारण्यातील भोरगिरी गाव ते भोरगड दरम्यान असलेल्या खाजगी जमीनीमध्ये काही व्यावसायीकांकडून उत्खनन करून प्लाॅटिंगसाठी रस्ते तयार केलेले आहेत. यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आलेली आहे. वन्यजीव संरक्षण व वनसंवर्धन कायदा पायदळी तूडवून हा सर्व बेकायदा प्रकार करण्यात आलेला आहे. संबंधित अधिकारी व वनरक्षकांना सर्व प्रकार माहिती असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी अजिबात गंभीर असल्याचे दिसत नाही.

दरम्यान भीमाशंकर अभयारण्यातील भोरगिरी हा भाग वन्यजीवांच्या दृष्टिने अत्यंत समृद्ध असून या परिसरांत सर्व प्रकारच्या वन्यजीवांचे अस्तित्व सर्वाधिक आहे. त्यामुळे या भागात वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात संचार असतो. हा संपूर्ण परिसर अभयारण्याचा “कोअर झोन” म्हणूनच ओळखला जातो. या भागावर निसर्गाने भरभरून सौंदर्याची उधळण केलेली आहे. त्यामुळेच भोरगिरी हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनलेले आहे. या भोरगिरी बीटमध्ये शेकरू तुलनेने अधिक प्रमाणात आढळते. तसेच दुर्मिळ होत चाललेली पिसोरी, सांबर, भेकर, उदमांजर, रानडुक्करे येथे मोठ्या संख्येने आहेत. भोरगिरी परिसरांत बिबट्याचा देखील वावर आहे. अनेक पर्यटकांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे. परंतु वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे या अभयारण्यातील जैववैविध्यतेला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. मात्र वन्यजीव विभागाला याचे जराही गांभीर्य नसून त्यांच्याच आशीर्वादाने समृद्ध जंगलाची वाट लागलेली आहे.