पर्यटन विकासाच्या नावाखाली भीमाशंकर अभयारण्यालाच ‘सुरुंग’….
By.. अतुल दत्तात्रय काळे.
‘महादेव वन’ हे पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या नावाखाली भीमाशंकर अभयारण्यालाच ‘सुरूंग’ लावण्याचा धक्कादायक प्रकार वन्यजीव विभागाकडून सुरू आहे. अभयारण्यासारख्या संरक्षित वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे स्फोट घडविण्यास बंदी असूनही याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करण्यात आली आहे. या पर्यटनस्थळ विकास प्रकल्पाअंतर्गत तळ्यांच्या खोदाईसाठी प्रचंड प्रमाणात रात्रंदिवस सुरुंगाच्या स्फोटकांचा वापर करण्यात आलेला आहे. परिणामी अभयारण्यातील वन्यजीवांची सुरक्षाच धोक्यात आलेली असून जैववैविध्यता गंभीर संकटात सापडली आहे. धक्कादायक म्हणजे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्याच देखरेखीखाली वन्यजीव व पर्यावरण संवर्धन कायद्याला मूठमाती देऊन सदर पर्यटनस्थळाचे काम केले जात आहे. संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांच्या इच्छेतून प्रकट झालेल्या संकल्पनेनुसार या महादेव वनाचे काम केले जात आहे. त्यामुळे पश्चिम घाटावरील समृद्ध अशा वनसंपदेची हानी करणाऱ्या या प्रकल्पाविरुद्ध तक्रार कुणाकडे करायची व तक्रार केली तरी कारवाई कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत वन्यजीव अभ्यासक व निसर्गप्रेमींमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
दरम्यान सुरुंगाच्या वापराबाबत स्थानिक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही संबंधितांनी याकडे दुर्लक्षच करण्याचे काम केलेले आहे. सुरुंगाच्या वापराबाबत वन्यजीव विभागाचे स्थानिक व पुणे येथील वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे जिल्हाधिकारी व खेड तहसीलदार कार्यालयाकडे चौकशी केली असता, कोणत्याही कार्यालयाकडून संबंधित ठेकेदारांना स्फोटके घडविण्यासाठी परवानगी दिलेली नसल्याची माहिती मिळाली. तरीदेखील सुरुंगाचा प्रचंड प्रमाणात वापर करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार माहिती असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून या गंभीर घटनेची दखलच घेतली गेलेली नाही. मुळातच संरक्षित क्षेत्रातून धोकादायक अशा सुरुंगाची वाहतूक करणे निषिद्ध असूनही याकडे स्थानिक वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जाणूनबूजून दुर्लक्ष केलेले आहे.
राज्य शासनाचा महत्वाकांक्षी पर्यटन प्रकल्प असलेल्या ‘महादेव वना’ची भीमाशंकर अभयारण्यातील कोकण कड्याजवळील वनस्पती पाॅंईट येथील नागफणीच्या पायथ्याशी निर्मिती केली जात आहे. सुमारे दहा कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. याठिकाणी देशातील सर्वात मोठा नंदी बसविला जाणार आहे. सुमारे चार हेक्टर इतक्या संरक्षित वनजमिनीवर हा प्रकल्प साकारला जात आहे. या संपूर्ण जागेला लोखंडी जाळीचे कुंपण घालण्यात आलेले आहे. लोखंडी कुंपणामुळे नागफणी, वनस्पती पाॅंईट तसेच भीमाशंकर-खांडसकडे जाणारी पायवाट बाधित झाली गेली आहे. या प्रकल्पाअंतर्गत नागफणी डोंगराच्या पायथ्यालगतच सुमारे दोनशे फूटापेक्षा अधिक लांबीचा खडक फोडून कालवा खोदण्यात आलेला असून तो सिमेंट काँक्रिटमध्ये बांधण्यात आलेला आहे. तसेच लोखंडी पत्र्याचा वापर करून तो बंदिस्त करण्यात आलेला आहे. या प्रकल्पात जवळपास दहा तळयांची निर्मिती केली जात आहे. खडक फोडण्यासाठी प्रचंड प्रमाणात जिलेटीन या स्फोटकांचा वापर करण्यात आलेला आहे. काही अंतराच्या फरकाने रात्रंदिवस सुरूंग उडविले जात होते. या परिसरात राज्यप्राणी असलेली ‘शेकरु’ खार मोठ्या प्रमाणात आढळते.
ज्या ठिकाणी हा प्रकल्प साकारला जात आहे, ते ठिकाण परिसरातील वन्यजीवांच्या येण्या-जाण्याची व आराम करण्याची एक प्रमुख जागा आहे. परंतु या प्रकल्पामुळे या परिसरातील वन्यजीवांच्या संचारावरच मर्यादा आलेल्या आहेत. एकप्रकारे हा प्रकल्प अभयारण्यातील वन्यजीवांच्या मुळावरच उठलेला आहे.
धक्कादायक म्हणजे वनविभागाच्या ज्या अधिकाऱ्यांवर या अभयारण्याच्या संरक्षणाची व संवर्धनाची जबाबदारी आहे, त्याच अधिकाऱ्यांच्या समक्ष या संरक्षित क्षेत्राची नासाडी सुरू आहे. प्रकल्पाच्या पाहणीसाठी मुंबई व नागपूर येथील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी वारंवार भेटी दिलेल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे वनस्पती पॉइंटजवळ वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नैसर्गिक पाणवठा आहे. बुध्द पौर्णिमेच्या रात्री या पाणवठयावर वन्यप्राण्यांची जनगणना केली जायची. परंतु महादेव वन प्रकल्पाभोवती घातलेल्या लोखंडी तारेच्या कुंपणामुळे हा पाणवठाच बंदिस्त झाला गेला आहे. लोखंडी कुंपणामुळे वन्यप्राणी आत येऊ शकत नाही. परिणामी हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून वन्यजीवांची मोठी गैरसोय झालेली आहे.
डॉ. माधवराव गाडगीळ ( जागतिक कीर्तीचे जेष्ठ पर्यावरण तज्ञ )… जैववैविध्येचा नाश करून अभयारण्य क्षेत्रात पर्यटनाला उत्तेजन देणे, हे सर्वस्वी अयोग्य आहे. असे प्रकल्प अभयारण्य क्षेत्राच्या बाहेर विकसित करावेत. चुकीच्या पद्धतीने निसर्गावर आघात करून पर्यटकांची रिघ संरक्षित क्षेत्रात आणण्यापेक्षा संबंधित परिसरात स्थानिक व दुर्मिळ जातींच्या वृक्षांची जोपासना करून देवराई वाढविणे, हेच उचित ठरेल.
वनगुन्हा दाखल होऊनही कारवाई झालीच नाही.. महादेव वन येथे सुरूंगाच्या स्फोटकांचा वापराबद्दल भीमाशंकर वनपाल यांनी संबंधित ठेकेदारांवर वन्यजीव संवर्धन कायदा-१९७२ कलम-३२ अंतर्गत वनगुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील कल्पना देण्यात आली होती. परंतु संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे समजते.
दरम्यान महादेव वन येथे काम करणारे ठेकेदार नागेश्वर कन्स्ट्रक्शन, एसएमजे कन्स्ट्रक्शन व श्रीकांत जयराम लोखंडे यांना सदरची कामे करत असताना सुरूंग लावून खोदकाम करण्यात येऊ नये. अभयारण्य क्षेत्रात सुरुंग लावण्यास प्रतिबंध आहे. असे केल्यास आपले काम रद्द करुन कारवाई केली जाईल, असे लेखी पत्र भीमाशंकर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. आर. झगडे यांनी दिले होते. मात्र पुढे त्यांच्याकडून संबंधितांवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई करण्यात आली नाही. मुळात त्यांच्याच देखरेखीखाली सदर कामे चालू आहेत.

