मेदनकरवाडीच्या माजी सरपंचाना अटक करा… रिपब्लिकन पक्षाची मागणी
चाकण….. मेदनकरवाडी ग्रामपंचायतीचा कचरा गोळा करणाऱ्या मागासवर्गीय ठेकेदार दाम्पत्याचे पैसे लाटून तसेच त्यांच्यावर राजकीय दबाव आणून संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि मेदनकरवाडीचे माजी सरपंच रामदास मेदनकर यांच्यावर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.२०) चाकण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. मेदनकर यांनी संबंधितांना मारहाण केल्याचाही आरोप आहे.
याबाबतची माहिती अशी की, ग्रामपंचायतीचा कचरा उचलण्याचे कंत्राट दिलेल्या ठेकेदार प्रियांका शिवाजी झोंबाडे ( वय २२, रा. रा. कुरूळी, ता. खेड) यांची बँकेत जमा झालेली रक्कम अधिक पैसे देण्याच्या आमिषाने मेदनकर यांनी काढून घेतली. परंतु संबंधित काढून घेतलेल्या रकमेची मागणी करणाऱ्या ठेकेदार महिला व तिच्या पतीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार रामदास मुरलीधर मेदनकर व संकेत रामदास मेदनकर ( दोघेही रा. मेदनकरवाडी , ता. खेड) यांच्यावर भादं वि क ४२०, ३२३,५०४, ५०६, ५०९ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मेदनकर यांनीही झोंबाडे दांपत्याच्या विरोधात खंडणी मागितल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रियांका शिवाजी झोंबाडे व तिचे पती शिवाजी रोहीदास झोंबाडे ( सध्या रा, मेदनकरवाडी, ता.खेड) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३८५,५०४,५०६, ३४ अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आम्ही केलेल्या कामाचे करारात ठरलेले पैसे वारंवार मागितल्याने माजी सरपंचानी दिलेली खंडणीची तक्रार खोटी असल्याचा झोंबाडे दाम्पत्याचा आरोप आहे.
रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव हरीश देखणे, तालुकाध्यक्ष संतोष डोळस, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव आदींनी मेदनकर यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली असून त्याबाबतचे निवेदन पोलिसांना दिले आहे. यावेळी चाकण न.प.चे नगरसेवक राहुल कांडगे, सचिन वाघमारे, अनिल मोरे, संदेश साळवे, नितीन गायकवाड, संतोष जाधव, राहुल गोतारणे, सुरेश गायकवाड, सतीश आगळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.