कुठे नेऊन ठेवला शिरुरचा खासदार?

sharad pawar amol kolhe

द्वारा.. अतुल दत्तात्रय काळे.

मोदी लाट असताना देखील शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. अमोल कोल्हे यांना मतदारसंघातील जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले खरे. परंतु निवडून गेल्यापासून मतदारसंघातील जनतेला त्यांचे दर्शन दुर्लभच झाले आहे, असे म्हणणे मात्र चुकीचे ठरणार नाही. 

शिरुरचा खासदार दाखवा, अन एक हजार रुपये मिळवा’ असेच त्यांच्या बाबतीत मतदारसंघातील जनतेमध्ये बोलले जात आहे.

तसेच ‘कुठे नेऊन ठेवला शिरुरचा खासदार ?’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्याच्या मनस्थितीत मतदारसंघातील जनता आहे.

कोल्हे यांना बहुसंख्य लोकांनी केवळ मालिकांच्या माध्यमातून दूरचित्रवाणीवर बघितलेले आहे. त्यामुळे आपला खासदार प्रत्यक्षात नेमका कसा दिसतो? असाच प्रश्न शिरुर मतदारसंघातील जनता आपापसांत विचारत आहेत. परिणामी कालचा गोंधळ बरा होता, अशी म्हणण्याची वेळ लोकांवर येऊ नये, या जनभावनेकडे पक्षाच्या नेतृत्वाने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा कोल्हेंना पुन्हा मालिकेकडे वळावे लागेल.

मुळातच या मतदारसंघातून सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून निवडून गेलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव अढळराव यांना मतदारसंघातील जनता कंटाळलेली होती. तसेच काही प्रकल्पाबाबत अढळराव यांची वारंवार रेटून रेटून खोटं बोलण्याची सवय जनतेला पटत गेली नाही. मतदारसंघात त्यांच्याबद्दल मोठी नाराजी निर्माण झाली होती. त्या नाराजीचा विस्फोट होऊन अढळराव यांना जनतेने घरी बसविले. दरम्यान अढळराव पराभव पचवूनही लोकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जोमाने जात आहेत, मिसळत आहेत. खासदार असताना देखील अढळराव वेळ मिळेल तेंव्हा वरचेवर मतदारसंघात येत असत. तसेच दर रविवारी लांडेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी लोकांना भेटत असत. त्यांनी काम कमी केले, पण लोकांचा संपर्क अजिबात तोडला नाही.

दुसरीकडे याउलट परिस्थिती विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबतीत पाहावयास मिळते. कदाचित खासदार महोदयांना असे वाटत असेल की, मालिकेच्या माध्यमातून आपण तमाम महाराष्ट्रातील जनतेला भेटतच आहोत. तर प्रत्यक्षात मतदारसंघातील लोकांना भेटण्यात काय स्वारस्य आहे? २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भेटले तरी चालेल. जो खासदार स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, वेळ देऊ शकत नाही, तो सर्वसामान्य जनतेला काय वेळ देणार?

एरवीचे जाऊ द्या हो, परंतू सध्या विधानसभा निवडणुकीची लगीनघाई सुरु आहे. प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहचली आहे. प्रचारासाठी दिवस कमी असल्यामुळे उमेदवार, त्या त्या पक्षांचे नेतेमंडळी अक्षरशः पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पालथा घालत आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातील स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते, या मतदारसंघात तुलनेने राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती चांगली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचारासाठी कोल्हे यांची नितांत गरज आहे. अशावेळी देखील कोल्हे मतदारसंघात तोंड दाखवू शकत नसल्यामुळे कार्यकर्ते व उमेदवारांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. 

दरम्यान कोल्हे यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगत आहेत. कुणाला काय जबाबदारी द्यायची तो त्या त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो. याचा अर्थ कोल्हे यांनी स्वतःच्या मतदारसंघाकडे, मतदारसंघातील जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे असा होत नाही. सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा अत्यंत छोटया असतात. एकवेळ लोकप्रतिनिधींनी काम केले नाही तरी चालते, परंतू जनसंपर्क तोडता कामा नये. राज्याच्या जबाबदारीमुळे कोल्हे यांना स्वतःच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात येण्यास शक्य होत नसेल तर मतदारसंघातील जनतेने त्यांच्या समस्या, तक्रारी घेऊन कुणाकडे जायचे? हा महत्वाचा प्रश्न आहे. कोल्हे यांच्या पश्चात जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्यांकडे जावे, हाही पर्याय उपलब्ध नाही.

या लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसे यांनी भलेही राज्यस्तरावर काम केलेले असेल, मंत्रीमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असतील, परंतू त्यांचे नेतृत्व हे आंबेगाव तालुक्यापुरते सिमित असल्यामुळे समस्यांचे, तक्रारींचे निवारण त्यांच्याकडून होईल, ही मुळीच शाश्वती नाही. याचा अनुभव खेड तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. ते फक्त स्वतःच्याच तालुक्याचा विचार करतात, असे त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते बोलतात. असे असते तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शेजारच्या खेड, जुन्नर व शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झालाच नसता. असो. 

सर्वात महत्वाचे म्हणजे खासदार कोल्हे यांचे जनसंपर्क कार्यालय कुठे आहे? हेच मतदारसंघातील लोकांना माहीती नाही. त्यामुळे त्यांना नेमके कुठे भेटायचे? हा प्रश्नच निर्माण होत नाही. लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, हे बाकी नक्की.