बरं झालं एकदाची यात्रा-जत्रा संपली.!! आता मतदारसंघात (जमलं तर) डोकावून बघा…?
द्वारा… अतुल दत्तात्रय काळे
बैलगाडा शर्यती चालू करण्यास भलेही सर्वपक्षीय राजकिय मंडळी सपशेल असमर्थ, अपयशी ठरली असेल. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षांनी मात्र विविध यात्रा जत्रा काढून आपापली हौस भागवून घेतली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश’ यात्रा, आदित्य ठाकरे यांची ‘जनआशिर्वाद’ यात्रा, आदेश बांदेकर यांचा ‘माऊली संवाद‘, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची ‘शिवस्वराज्य यात्रा’ तर खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘संवाद दौरा’ काढून महाराष्ट्र पिंजून नव्हे तर अक्षरशः बारीक चाळणीतून चाळून काढला.
महाराष्ट्र राज्य पूर्णतः सुजलाम सुफलाम होऊन शेवटच्या घटकापर्यंतचा परिपूर्ण आर्थिक विकास झाल्याच्या भाबड्या समजूतीतून या यात्रांचे आयोजन केले होते की काय? अशी चर्चा सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये आहे. दरम्यान या यात्रा जत्रांमुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रामुख्याने या यात्रांमुळे राज्यातील किती तरुणांना रोजगार मिळून बेरोजगारीचे उच्चाटन झाले, शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे विविध प्रलंबित प्रश्न सुटले, धरणग्रस्तांना पर्यायी जमिनी मिळाल्या, पाणीटंचाईचे निवारण होऊन महिला व मुलींच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला, भाकरीचा चंद्र शोधण्यात आयुष्य पणाला लावलेल्या गरीबांना दोन वेळचे चांगले जेवण मिळाले, शिक्षणाचा दर्जा सुधारला, गरीबांना उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडे झाले, गरीब व मध्यमवर्गीयांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, कुपोषणमुक्त महाराष्ट्र झाला, खड्डे मुक्त रस्ते झाले, दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या, प्रदुषण कमी झाले, पर्यावरणाचे संवर्धन झाले, खेडे समृद्ध झाली, आर्थिक सुबत्ता आली, लाचखोरी कमी झाली, हि न संपणारी यादी आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे दुष्काळ व महापूराच्या पार्श्वभूमीवर यात्रा जत्रांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करणे कितपत योग्य आहे? हा संबंधित संवेदनशील राजकिय पक्षांचा वैयक्तीक प्रश्न आहे. त्यामुळे इतरांनी म्हणजे सर्वसामान्य जनतेने त्यात लक्ष न घालणेच अधिक योग्य ठरेल.
बाकी जाऊ द्या.. आपण शिरुर लोकसभा मतदारसंघाचा विचार करु या.
काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला पूर्वीचा खेड व आत्ताच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने माजी खासदार शिवाजीराव अढळराव यांच्या माध्यमातून जोरदार मुसंडी मारुन पंधरा वर्षे वर्चस्व गाजवले होते. अढळराव यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून येऊन हॅटट्रिक केली होती. मात्र चौकार मारण्याच्या नादात अढळराव यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी त्रिफळाचीत झाले. मुळातच अढळराव यांनी विशेषतः खेड तालुक्यातील काही महत्वाच्या प्रकल्पांबाबत व प्रश्नांबाबत जी धरसोड, तकलादू व आपमतलबी भूमिका घेतली, त्याची परिणिती त्यांच्या पराभवात झालेली आहे. तीन वेळा खासदार राहिलेल्या अढळरावांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या कुतुंगुळा असलेल्या अमोल कोल्हे यांना सर्व घटकांतील मतदारांनी भरघोस मतांनी लोकसभेत पाठविले.
अढळरावांना पंधरा वर्षांत जे प्रश्न सोडविता आले नाही, ते प्रलंबित प्रश्न आता तरी सुटतील या भाबड्या आशेने मतदारांनी अमोल कोल्हे यांना मोठ्या विश्वासाने निवडून दिले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देखील कोल्हे यांच्या विजयासाठी मोठे कष्ट घेतले होते. दरम्यान आपण ज्या तरुणावर एवढा विश्वास दाखवून निवडून दिले, तो निवडणूक झाल्या झाल्या काही दिवसांतच संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाईल? हे त्यांच्या गावीही नव्हते.
दरम्यान भोसरी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खासदार महोदय मतदारसंघात फिरकत नसल्याच्या तक्रारी अजित पवार यांच्याकडे केल्यानंतर पवार यांनी उलट कार्यकर्त्यांनाच उपदेशाचे डोस पाजून शांत केले. एकवेळ कार्यकर्ते समजून घेतील, मात्र मतदारराजा काहीच समजून घेणार नाही. तो तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मतदारसंघातील लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी, त्या सोडविण्यासाठी कमीत कमी अमावस्या पुनवेला तरी मतदारसंघात फेरफटका मारुन लोकांना भेटायचे असते, याचा विसर कोल्हेंना फारच लवकर पडल्याचे दिसते. कदाचित आपण खासदार आहोत, हेच कोल्हे विसरले कि काय? अशी शंका उपस्थित होत आहे.
स्वतःच्या मतदारसंघातील लोकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यापेक्षा खासदार महोदयांना परळी व केज महत्वाचे वाटतात. म्हणे परळी व केज या दोन्ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणल्याशिवाय फेटा घालणार नाही. अहो, परळी, केजचे राहू द्या बाजूला. अशी राणा भीमदेवी थाटात थोतांड प्रतिज्ञा करण्यापेक्षा, राजगुरुनगर ते मोशी तसेच शिक्रापूर दरम्यानची वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी असाच ‘पण’ केला असता तर परिसरातील जनतेचा, वाहनचालकांचा व प्रवाशांचा ऊर अभिमानाने भरून आला असता. मोशी ते राजगुरुनगर या दरम्यान प्रवास करण्यापूर्वी वाहनचालक व प्रवाशी दहा वेळा विचार करतात. कारण वाहनकोंडीची एवढी दहशत, भीती त्यांच्या मनांत बसलेली आहे. परळी, केजची जनताच ठरवेल कुणाला निवडून द्यायचे ते.
नस्ती उठाठेव करण्यापेक्षा आधी स्वतःच्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघातील केवळ आंबेगांव वगळता जुन्नर, खेड, भोसरी, शिरुर व हडपसर या पाच ठिकाणी सत्ताधारी पक्षांचे आमदार आहेत. यंदा आंबेगांवच्या जागेला देखील दगाफटका बसू शकतो. त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघातील एकुण सहापैकी अधिकाधिक आमदार कसे निवडून आणता येतील? याकडे लक्ष द्या. परळी, केजची अजिबात काळजी करु नका.
म्हणे अढळराव यांनी पंधरा वर्षांत काय केले? अहो खासदार महोदय गेल्या पाच महिन्यांत आपण काय केले? याचे मूल्यमापन करुन पहा. महत्वाचे म्हणजे आधी ‘भूमिकेतून’ बाहेर पडा. एक मात्र नक्की की, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पाच महिन्यात मतदारसंघात विशेष अशी छापच पाडता आलेली नाही. चमकोगिरीमध्येच ते मश्गुल आहेत.