हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाची परवड कधी थांबणार ?

rajguru smarak

By.. अतुल दत्तात्रय काळे.

थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची आज ( दि, २३ ) ८८ वी पुण्यतिथी साजरी होत आहे. परंतु गेल्या बारा ते तेरा वर्षांपासून शासनस्तरावर होत असलेल्या धरसोडपणामुळे हुतात्मा राजगुरूंच्या यथायोग्य अशा स्मारकाचे काम रेंगाळतच चाललेले आहे. या स्मारकाबाबत कोणत्याच लोकप्रतिनिधीला जराही गांभीर्य नाही. दरवर्षी फक्त हुतात्मा राजगुरूंच्या जयंती व पुण्यतिथीलाच त्यांच्या स्मारकाचा विषय चर्चेत येतो. त्यानंतर पुन्हा सर्व काही शांत होते. दोन वर्षांपूर्वी सुमारे ८७ कोटी रुपयांचा निधी ‘हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय स्मारका’ साठी प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानंतर फक्त बैठकांवर बैठकांचे सोपस्कार पार पडले. पुढे नेमके काय झाले? याबाबत तालुक्यातील जनतेला खुलासाच होऊ शकलेला नाही. परिणामी स्मारकाचे काम अद्यापही सुरु होऊ शकलेले नाही.

या स्मारकाबाबत पूर्वीच्या आघाडी शासनाने जी काही अनास्था दाखविली, त्याच अनास्थेची पुनरावृत्ती विद्यमान भाजप व शिवसेना युतीच्या शासनकर्त्यांकडून सुरू आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी देखील चमकोगिरीत मश्गुल आहेत. 

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात राजगुरुनगर बसस्थानकासमोर बांधण्यात आलेल्या थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू, हुतात्मा भगतसिंग व हुतात्मा सुखदेव यांच्या अर्धाकृती पुतळयांचे अनावरण शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना खासदार आढळराव म्हणाले होते की, राजगुरूंच्या नावे अनेक संघटना कार्यरत आहेत. परंतु राजगुरूंच्या स्मारकासाठी कुणालाच काही करता आले नाही.

दुसरीकडे आढळराव यांनी सध्या “संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राला हेवा वाटेल असे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांचे स्मारक उभारले” अशी जाहिरातबाजी सुरू केली आहे. अर्धाकृती पुतळयांना जर आढळराव स्मारक म्हणत असतील तर त्यांची किव येते. तसेच मतदारसंघात दहा ते बारा हजार कोटींची विकासकामे केल्याचे त्यांच्याकडून दावे केले जात आहेत. मग एवढी प्रचंड रक्कम खर्च होऊनही थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकाचे काम का पूर्ण होऊ शकले नाही?

दरम्यान गेल्या बारा ते तेरा वर्षांच्या प्रदीर्घ काळात या स्मारकाच्या निर्मितीबाबत अनेक लहान मोठ्या नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. परंतू त्या सर्व हवेतच विरून गेल्या.

२०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान राजगुरूनगर येथे झालेल्या प्रचार सभेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील हुतात्मा राजगुरूंच्या भव्य अशा स्मारकाची लवकरच निर्मिती केली जाईल, असे जाहीर आश्वासन राजगुरूनगरवासियांना दिले होते. पाच वर्षे संपत आली आहेत. परंतू स्मारकाच्या उभारणीची अंमलबजावणी प्रत्यक्षात होऊ शकलेली नाही.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे वारंवार खेड तालुक्याच्या दौऱ्यावर येत असत. अनेकदा राजगुरुनगर येथेही आलेले आहेत. परंतु त्यांना देखील पाच वर्षांत हुतात्मा राजगुरुंचे स्मारक उभारण्यात अपयशच आलेले आहे. हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. 

थोर व्यक्तींच्या स्मारक निर्मितीच्या बाबतीत शासनस्तरावर होणारी दप्तरदिरंगाई व उदासीनता तसेच लोकप्रतिनिधींना असलेला गांभीर्याचा अभाव हे खचितच चांगले नसल्याची भावना व्यक्त होत आहे.