खेड तालुक्याला हवे दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व..!
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीत बाबाजी काळे यांच्या रूपाने खेड तालुक्याला नवे नेतृत्व लाभले. अपेक्षित बदल झाल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनता भलतीच खुश होती. परंतु त्यांच्या आनंदावर लवकरच विरजण पडले. कारण गेल्या सहा सात महिन्यांचा कारभार बघितला तर बाबाजी काळे यांना तालुक्यात पाहिजे तसा अजिबात प्रभाव पाडता आलेला नाही. संपूर्ण तालुक्यातील जनतेने डोक्यावर घेतल्यामुळेच बाबाजी काळे यांना आमदारपदाची झूल पांघरता आलेली आहे. तरीदेखील बाबाजी काळे हे बहुतांश लोकांचे फोनच उचलत नाहीत, अशा त्यांच्याबद्दल बऱ्याच तक्रारी आहेत. हे वास्तव आहे.
फोन न उचलणे हे मुजोरपणाचे, उद्धटपणाचे व मग्रुरीचे लक्षण आहे. एवढा मिजास काय कामाचा? तुम्ही जर सर्वसामान्य जनतेचे फोन उचलत नसाल तर तुमच्याकडून तालुक्याच्या विकासाची काय अपेक्षा ठेवायची? पहिल्या सहामाहीच्या कामकाजाचा विचार केला तर आमदार काळे हे यात नापास झालेले आहेत. सहा महिन्यातच असे नखरे तर असतील तर अजून साडेचार वर्ष जायची आहेत.
आमदार म्हणून निवडून आल्या आल्या बाबाजी काळे यांचे अल्पावधीतच ठेकेदारीप्रेम, पुत्रप्रेम, सगेसोयरेप्रेम, ठराविक ठेकेदार मित्रप्रेम उफाळून आले. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे बहुसंख्यांकांचे फोन घेण्याचा त्यांना भयंकर तिटकारा आहे. आणि याच साऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरू लागलेल्या आहेत. तेच स्वत: त्यांच्यासाठी अडथळा ठरत आहेत. मात्र ते त्यांच्या लक्षातच येत नाही. ‘उतावळा…. गुडघ्याला बाशिंग.’ अशीच त्यांची अवस्था झालेली आहे.
बाबाजी काळे स्वत:ला सिद्ध करू शकलेले नाहीत. हे अगदी शिशु वर्गातील बालकही सांगू शकेल. व्यापक जनहिताचा विचार करण्याऐवजी ते ‘ठेके’दारीतच अडकून पडलेले दिसतात. कारण त्यांचा मूळ पिंड हा ठेकेदारीचाच असल्यामुळे त्यांना त्यात अधिक समाधान व आनंद मिळत असेल, अशी चर्चा तालुक्यात आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहालाच आपले घर तथा जनसंपर्क कार्यालय बनविले की जेथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. त्यामुळे जास्त काही सिद्ध करण्याची व जाहीर बोलण्याची गरज नाही.
दुसरीकडे माजी आमदार दिलीपराव मोहिते व विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यात चांगलाच कलगीतुरा चालू आहे. आणि हे प्रमाण उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. दोघांच्या वादात मात्र तालुक्यांतील विकासकामांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, तालुक्याचे नुकसान होऊ शकते. एकंदरीतच तालुक्यांतील राजकीय वातावरण चांगलेच गढूळ झालेले आहे.
मोहिते काळेंना आगामी काळात काहीच सुधरू देणार नाहीत. त्यातच आमदारपदाला न्याय देण्याची काळेंमध्ये तेवढी धमक नाही. त्यांना मोठी संधी मिळाली. परंतु मिळालेल्या संधीचे त्यांना सुरवातीपासूनच काही सोनं करता आलेले नाही. आणि ही परिस्थिती २०२९ पर्यंत तशीच राहणार आहे.
दिलीपराव मोहिते यांचा आमदार म्हणून जो दरारा, वचक होता, तो आज माजी आमदार असूनही टिकून आहे. परंतू तसा दरारा, वचक बाबाजी काळेंना तयार करता आलेला नाही. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समितीत काम केलेले आहे. तरीसुद्धा त्यांना आमदारपद जड का जातंय?
आमदार म्हणून दिलीपराव मोहितेंनी काही ठोस कामे नक्कीच केलेली आहेत. शासकीय निधी आणण्याच्या बाबतीत त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. अजूनही तालुक्यात मोहितेंनी आणलेलीच कामे चालू असल्याचे समजते. पाच वर्षांच्या काळात बाबाजी काळे यांनी मोहितेंच्या तुलनेत पंचवीस टक्के जरी निधी आणला, तर ती मोठीच मजल ठरेल.
तालुक्याच्या आमदारांनी टिल्ल्या पिल्ल्यांना, गावाने ओवाळून टाकलेल्या गणंगाना, बोगस कामे करणाऱ्या ठेकेदारांना सोबत घेऊन काम करावे का? मोहितेंनी पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या काळात कधीही प्रति आमदार, ‘सावली’ आमदार निर्माण होऊ दिला नाही. या महोदयांच्या काळात तर अगदी टिल्लू पिल्लू तसेच ठराविक ठेकेदार देखील स्वत:ला आमदार म्हणून तालुक्यात मिरवत आहेत.
याच पार्श्वभूमीवर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे दूरदृष्टीने विचार करणारे नवे तरूण नेतृत्व पुढे येण्याची गरज आहे.
एकंदरीतच विधानसभा निवडणूकीपासून पुरता बट्ट्याबोळ झालेल्या तालुक्याच्या राजकारणाचा विचार केला तर आगामी काळात नवख्या कार्यकर्त्यांना तथा पदाधिकाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते.
सर्वप्रथम ‘मी सेवेकरी’च्या माध्यमातून खेड तालुक्यात बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेले सुधीर मुंगसे यांना भविष्यात तालुक्याचे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी ते तीव्र इच्छूक होते. त्यामुळे त्यांचे नांव तालुक्यात सर्वदूर गेलेले आहे. आमदार बाबाजी काळेंना ते निश्चितच योग्य पर्याय आहेत. सुधीर मुंगसे यांच्यात तालुक्याचे नेतृत्व करण्याची क्षमता ठासून भरलेली आहे. तसेच मुंगसे हे ‘लंबी रेस का…‘ ठरणार आहेत.
दुसरीकडे राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या माध्यमातून तालुक्यात पोहचलेले गणेश थिगळे यांच्याकडे देखील चांगले नेतृत्वगुण असून त्यांना तालुक्याच्या राजकारणात मोठी संधी आहे. त्यांचा मित्र परिवार देखील तालुकाभर पसरलेला आहे. काहीजणांना थिगळे यांच्या नावाबद्दल आश्चर्य वाटू शकते. पण हल्ली राजकारणात काहीही घडू शकते.
एकंदरीतच भविष्यातील खेड तालुक्याच्या राजकारणाचा विचार केला तर सुधीर मुंगसे व गणेश थिगळे हे दोन चेहरे आशादायक असून तालुक्याच्या राजकारणात ते दोघे नक्कीच प्रभाव पाडू शकतात.
तालुक्याचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधीने सर्वांना सोबत घेतले पाहिजे. ठराविक ठेकेदारांना सोबत ठेवून तालुक्याचा विकास होत नसतो. संबंधित जवळच्या ठेकेदारांनाच सर्व लहान मोठी कामे मिळावी, यासाठी अन्यांवर बळजबरी करणे योग्य नव्हे. याला विकासाची दृष्टी न म्हणता गोतावळ्याचा सर्वांगीण विकास साधणारी दूरदृष्टी म्हणतात.
महोदयांच्या जवळचा एक ठेकेदार तर तालुक्यात ‘सावली’ आमदार म्हणूनच वावरत आहे. हा ‘सावली’ आमदार अन्य ठेकेदारांना थेट ‘तुम्ही या कामांचे टेंडर भरू नका, ते काम दुसऱ्याला द्यायचे आहे’. या भाषेत धमकीवजा इशारा देत असतो. धक्कादायक म्हणजे स्वत: महोदय देखील, ‘शेठ तुम्ही या कामाचे टेंडर भरू नका, ते आपल्या माणसांना द्यायचे आहे, असे ठेकेदारांना सांगत असतात. मग बाकीचे ठेकेदार कुणाचे आहेत? ते पण स्वत:च्या तालुक्यातीलच आहेत ना? अशा पद्धतीने तालुक्याचा विकास होत असतो का?
आजी माजी आमदारांच्या द्वंद्वात काही जणांची मात्र ‘इकडे आड तुकडे विहीर’ अशीच अवस्था झालेली आहे. कारण विधानसभा निवडणूकीत बाबाजी काळेंना मदत केल्याच्या संशयावरून संबंधित लोकांवर, पदाधिकाऱ्यांवर माजी आमदार मोहिते कमालीचे नाराज झालेले आहेत. त्यातच निवडणूकीत काळेंना मदत करूनही काळे मदत करत नसल्यामुळे संबंधितांना परत मोहितेंकडे जाता येईना, असेही समजते. आगामी विधानसभेपर्यंत हे असेच चालणार आहे.
प्राधान्याने जनहिताला अग्रहक्क देणे आवश्यक असते. परंतु हल्ली जनहितच तळाला व चूलीत गेलेले असून स्व:हित व परिवारहित वरच्या स्थानावर विराजमान झालेले आहे. त्यामुळेच विकासाला खिळ बसते वा घो… लागतो.