कुणी हापीस देतां का रे बाबांनो? हापीस? या ‘बाबा’आजीला

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

टिप:- या लेखातील दामू उर्फ दामाजी ‘अण्णा’ उर्फ जुना आका व दाबाजी उर्फ टिळाधारी ‘बाबा’आजी उर्फ नवा आका या व्यक्तीरेखा व त्यांच्याशी संबंधित घटना या काल्पनिक कथेवर आधारीत आहेत. त्यांचा अस्तित्वातील कोणतीही व्यक्ती, समूह वा अन्य सत्य घटकांशी अथवा घटनांशी काहीही एक संबंध नाही. अथवा बळेच ओढूनताणून जोडण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. मिळत्याजुळत्या असेलच, तर तो एक निव्वळ काल्पनिक योगायोग समजावा. स्वत:च्या मनाला जास्त लागून घेऊ नये. 

कुणी घर देतां का रे ? घर? या पार्श्वभूमीवर, कुणी हापीस देतां का रे? हापीस? या ‘बाबा’आजीला, या दारिद्र्यात खितपत पडलेल्या गरीबाला, या पामराला, या शासकीय लाभार्थ्यांला, या जनसेवकाला.

माझ्याकडे काय नाही? सर्वकाही आहे. राजवाड्यासारखा महाल आहे, छतावर आराम करण्यासाठी नदीवरून येणारी थंडगार व आल्हाददायक हवाही आहे. खरंच सांगतो बापुड्यांनो माझ्याकडे सर्व काही आहे. तरीही स्वमालकीच्या घरात मनच रमत नाही माझे. म्हणून तर घरासारखं हुबेहूब दिसणाऱ्या या ऐसपैस इमल्याचा हापीस म्हणून मी वापर करत आहे. माझ्यासाठी बाबांनो काहीही नको रे. मला कशातच मोह नाही. की स्वार्थही नाही. जनतेचे भले व्हावे, हेच माझे स्वप्न आहे. याच समर्पित भावनेने मी काम करत आहे. माझ्या लेकरांसाठी, माझ्या बगलबच्च्यांसाठी, माझ्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी मला या हापीसाची गरज आहे. 

दरम्यान हे हापीस लांब पडते म्हणून गावातच ‘बाबा’आजीला हापीस बांधण्यासाठी तालुक्यातील जनता वर्गणी काढणार असल्याची चर्चा सुरू आहे. असे झाले तर जनतेची सेवा करण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी या बिचाऱ्याला हक्काची (जनतेच्या स्वमालकीची) जागा तरी उपलब्ध होईल.  

गेल्यावर्षी झालेल्या लढाईत दामू उर्फ दामाजी ‘अण्णा’ उर्फ जुना आका यांचे साम्राज्य खालसा होऊन दाबाजी उर्फ टिळाधारी ‘बाबा’आजी उर्फ नवा आका यांच्या नव्या साम्राज्याची मूहूर्तमेढ रोवली गेली. अपेक्षित बदल झाल्यामुळे तहसीलमधील भोळीभाबडी सर्वसामान्य जनता भलतीच खुश झाली होती. परंतु या जनतेचा लवकरच हिरमोड झाला गेला. ’अच्छे दिना’ते स्वप्न पाहणाऱ्या जनतेला पुन्हा ‘पुराने दिन’च बरे होते असेच म्हणायची वेळ आली. 

तहसीलमधील व तहसीलबाहेरची अनेकजण अजूनही दामाजी अण्णाचे साम्राज्य खालसा झाले यावर विश्वासच ठेवायला तयार नाही. नव्या आकाला ते स्वीकारायलाच तयार नाहीत. कारण नवा आका तथा टिळाघारी ‘बाबा’आजी त्या पदाच्या योग्यतेचाच नाही, असेच त्यांचे ठाम मत आहे. कारण या टिळाधारी ‘बाबा’आजीचे खायचे व दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, याची प्रचिती लवकरच तालुक्यांतील जनतेला आली.

निवडणूकीच्या आधी अनेकांच्या पाया पडणारा हा ‘बाबा’आजी निवडून आल्यानंतर भलताच शिरजोर झाला. ज्यांनी ज्यांनी याला निवडून आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले होते, प्रसंगी दामू अण्णांशी शत्रुत्व पत्करले, याचीही त्याला जाण राहिलेली नाही. त्या सर्वांनाच तो विसरला. संबंधितांने व बहुतांश सर्वसामान्य लोकांचे देखील हा बाबा फोनच घेत नाही. आणि असे अनेकांना अनुभव आलेले आहेत व येत आहेत. दामू अण्णांनी तीन तीन वेळा तालुक्याचे नेतृत्व केले, परंतु त्यांनी देखील असा कृतघ्नपणा केल्याचे स्मरणात नाही. हा बाबा मात्र निवडून आल्यानंतर आठ दिवसांतच उडायला (हवेतल्या हवेत) लागला. हा तालुका माझ्याच मालकीचा आहे, अशाच आविर्भावात तो वागू लागला. 

एक मात्र नक्की की पुढील निवडणूकीत तालुक्यांतील जनता या ‘बाबा’आजीचा टांगा पलटी केल्याशिवाय शांत बसणार नाही. काहीही झाले तरी याचा टांगा पलटी होणारच. ही काळ्यादगडावरची पांढरी रेष आहे. एवढा दांडगा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान तसे पाहिले तर दाबाजी उर्फ टिळाधारी ‘बाबा’आजीला जमीन, जुमला, जागेची अजिबात काही कमतरता नाही. ‘बाबा’आजीने भलामोठा महाल बांधून ठेवलेला आहे. परंतू मानवी स्वभावानुसार कितीही असले, तरी ते कमीच असते. त्यातच या ‘बाबा’आजीची फाटलेली झोळी कायमच रिकामी असते. भरूनही ती कधीच भरत नाही, अशी वंदता आहे.

मात्र असे असले तरी या दाबाजी उर्फ टिळाधारी ‘बाबा’आजीला महसूलच्या ठिकाणी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत:चे असे हापीसच नाही. तसे पाहिले तर हापीससाठी एखादी जागा वा गाळा भाड्याने वा विकत घेणे, ‘बाबा’आजीला काहीच अवघड नाही. परंतु तशी मानसिकताच संबंधितांची नाही. जितक्या दिवस चालेल तितक्या दिवस चालू द्या, असेच या ‘बाबा’आजीचे धोरण व वर्तन आहे. हा बाबा कधी संतुष्टच होत नाही. चेहऱ्यावर कायमच असंतुष्टपणाचे ग्रहण लागलेले असते. 

जनतेच्या समस्या सोडविणे अति गरजेचे. हापीस होईल तेव्हा होईल. तोपर्यंत मग मी कुठे बसायचे? ‘जळणाऱ्या’ लोकांचे काय? ते काहीही म्हणतील? त्यांचा थोडाच विचार करायचा असतो? आणि याच मानसिकतेतून या ‘बाबा’आजीने जनतेच्या पैशातून बांधलेल्या एका शाही इमल्याचा तथा शासकीय वास्तूचाच आपलं हापीस म्हणून वापर करण्यास सुरूवात केली. नव्याचे नऊ दिवस ठीक आहे हो. परंतु गेल्या पाच महिन्यांपेक्षा अधिक काळापासून हा ‘बाबा’आजी व त्याचे बगलबच्चे संबंधित इमल्याचा आपल्या विश्रामासाठी गृह म्हणून वापर करत आहेत. या ठिकाणी असलेल्या दोन्हीही शयनकक्षाचा वामकुक्षीसाठी वापर केला जात आहे. राखीव असलेला शयनकक्षही यांच्या तावडीतून सुटलेला नाही. सर्वकाही मस्तपणे सुरू आहे. याची फारच वाच्यता झाल्यामुळे मध्यंतरी संबंधितांना जनतेने दातळले देखील होते. तालुक्यात व इतरत्र थू थू झाली होती. परंतू यामुळे काही फरक पडेल तो निगरगट्ट ‘बाबा’आजी कसा? मुळातच यांना जनाच्या सोडाच परंतू मनाच्या देखील ….. नाहीत. याला फक्त कोडगेपणा म्हणतात, बाकी काही नाही. 

‘बाबा’आजीकडून या शाही इमल्याचा अगदी बिनदिक्कतपणे वापर सुरू आहे. काही धरबंधच उरलेला नाही. कुणीही यावे आणि पाय पसरून बसावे, गारेगार शयनकक्षात ताणून द्यावी, असाच खेळ सुरू आहे. ‘बाबा’आजीसह अनेकांसाठी हे आता दुसरे घरच झालेले आहे. घरी कमी व याठिकाणी जास्त पडीक, असाच यांचा दिनक्रम चालू आहे. 

दरम्यान असाही एक प्रस्ताव समोर येत आहे की, या शाही इमल्याच्या प्रांगणात जी मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध आहे, त्या मोकळ्या पाच दहा गुंठे जमिनीवर टिळाधारी ‘बाबा’आजी व त्याच्या बगलबच्च्यांसाठी सर्व सुखसुविधांयुक्त असे भव्य व आधुनिक प्रासादरूपी विश्रामगृह उभारावे, अशा मताचे अनेक हितचिंतक या तालुक्यात आहेत. जेणेकरून संबंधितांना घरची देखील आठवण कधी होणार नाही. यासाठी माजी ‘महोदय’ देखील या प्रस्तावाला हसत हसत संमती देतील, यात काही शंकाच नाही. 

नमुन्यादाखल एक उदाहरण देणे अधिक योग्य ठरेल. या ‘बाबा’आजीचा जो खाजगी सहाय्यक नावाचा नमुना आहे, तो सर्रास संबंधित ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयात बसून तेथील कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून विविध कामांशी संबंधित कागदपत्रांच्या नकला काढून घेत असतो. संबंधित सरकारी विभागाची कामांसंबंधीची गोपनीय माहिती वा कागदपत्रे खासगी व्यक्तीकडून हाताळली जात असेल, तर हे अतिगंभीर म्हणावे लागेल. त्यामुळे सदर शासकीय कार्यालय नेमके कोण चालवतो? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अधिकारी देखील या उपटसुंभाना कसे सहन करतात? हे एक गौडबंगालच आहे. 

अधिकाऱ्यांनी देखील आता हे असले फुकटचे व फालतू लाड बंद करून संबंधित इसमाला कडक शब्दात समज देऊन बाहेर हूसकावून लावले पाहिजे. तो कुणाचाही खाजगी सहाय्यक असो. शासकीय विश्रामगृहाच्या अशा फुकटच्या वापरामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. परंतु संबंधित अधिकारी काहीच कारवाई करत नाही. त्यामुळे इतक्या दिवसांचा बुडालेला लाखो रूपयांचा महसूल संबंधित अधिकाऱ्यांकडून वसुल करण्यात यावा, अशी मागणी जनतेतून व्यक्त होत आहे. 

अरे स्वत:च्या फायद्यासाठी सरकारी मालमत्तेचा असा लाभ घेणे हे सर्वार्थाने खुपच चुकीचे आहे. एखाद्या गोष्टीचा किती लाभ घ्यावा याला काही मर्यादा असतात. या लाभार्थी लोकांना पाच दहा हजारांचे छपाईयंत्र व कागदांचे बंडल तसेच लागणारी इतर स्टेशनरी विकत घेता येत नाही का? दुसरीकडे वीजही फुकटच वापरायची? अरे काय हे? पदाचा तरी मान ठेवा? शासकीय विश्रामगृह अजून किती किती दिवस वापरणार आहात? एवढ्या दिवस शासकीय विश्रामगृह फुकट वापरत असल्यामुळे शासनाचे लाखो रूपयांचे भाडे बुडालेले आहे. मोफत सेवेचा लाभ वरपू वरपू घेतला जात आहे. ओघळ थेट ढोपरापर्यंत गेलेला आहे. किती ओरबाडायचे याचे किमान नैतिक भान तरी असूद्या? ऊस कितीही गोड असला, फुकटात मिळाला, तरी तो मुळासकट खाल्ला जात नाही. परंतु ही लाभार्थी मंडळी मुळ्यांना असणारी मातीही खात आहेत. 

माती खाणे ते हेच.