श्री भीमाशंकर मंदिराची सुरक्षा धोक्यात..?

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

देशातील सहावे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले व पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले अतिसंरक्षित श्री भीमाशंकर मंदिराच्या आवारातच पोकलेन मशीनच्या साहाय्याने मंदिराच्या आवारातील दगडी ओटा तोडला जात आहे. तसेच शेजारीच असलेल्या भींतीच्या पायथ्यालगत देखील पोकलेनने उकरल्याचे दिसून येत आहे. मशीनच्या मोठ्या आवाजामुळे मंदिर परिसरात हादरे बसत आहेत. मंदिराच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजलेले आहेत. मशीनच्या हादऱ्यांमुळे सदर भिंतीला व मंदिराला काही गंभीर धोका निर्माण झाला तर याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न भाविकांमध्ये विचारला जात आहे. 

मुळातच पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या प्राचीन वास्तूच्या आवारात अशा प्रकारे पोकलेन मशीन आणणे योग्य आहे का? श्री भीमाशंकर मंदिर हे शेकडो वर्षे जुने असून ती एक प्राचीन अशी वास्तू आहे. राज्यातील, देशातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तरीदेखील या सर्व गोष्टींकडे जाणूनबूजून दुर्लक्ष करून मंदिरालगतच पोकलेन मशीन आणून तेथे उत्खनन करणे, हे खुपच गंभीर आहे. तथाकथित विकास आराखड्याच्या नावाखाली आधीच मंदिर परिसर मोठ्या प्रमाणात भूसभूसीत करून ठेवलेला आहे. 

याबाबत पुणे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ. विलास वहाणे यांना विचारले असता, ते या गंभीर प्रकाराबाबत पूर्णत: असंवेदनशील असल्याचे समजले. ते म्हणाले की, संबंधित ठिकाणी असलेला चबुतरा काढण्यात येत आहे. श्री भीमाशंकर ही संरक्षित वास्तू नाही. म्हणून आम्हाला याबाबत काही करता येत नाही. तुम्ही स्वत: आमच्या विभागाकडे लेखी तक्रार द्या, त्यानंतर संबंधितांवर कारवाई करू. 

प्रश्न हा आहे की, श्री भीमाशंकर मंदिरालगत अवजड असे पोकलेन मशीन आणून ते दिवसरात्र तेथे चालविले जात असूनही पुरातत्व विभाग या मंदिराच्या सुरक्षा व संरक्षणाबाबत एवढी असंवेदनशील भूमिका घेत असेल तर पुरातत्व विभाग तेथे विकास आराखड्याअंतर्गत नेमके काय व का काम करत आहे? 

दुसरीकडे खेड तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांना विचारले असता त्यांना देखील या घटनेचे गांभीर्य असल्याचे दिसून आले नाही. याबाबत सविस्तर माहिती घेऊन पुणे पुरातत्व विभाग, खेड प्रांताधिकारी व खेड पोलिस स्टेशनला पत्र पाठवून सदर घटना कळविण्यात आलेली आहे. 

दरम्यान संबंधितांना कळवून देखील अद्यापही याठिकाणी पोकलेन मशीन चालूच आहे. दरम्यान या गंभीर घटनेचे कुणालाच काहीही पडलेले नाही. दुदैवाने काही गंभीर दुर्घटना झालीच तर मग शासकीय पातळीवर नेहमीप्रमाणे युद्धपातळीवर धावाधाव केली जाईल. पण असे होऊच नये म्हणून तातडीने त्यादृष्टीने काही प्रयत्नच करायचे नाहीत, असाच निगरगट्टपणा अधिकारी वर्गात दिसून येतो. 

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर विकासकामांच्या माध्यमातून तसेच मंदिर परिसरात निर्माण होत असलेल्या खाजगी बांधकामांचा मोठा अवजड भार मंदिरालगत चोहोबाजूला पडत आहे. परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. त्यामुळे श्री भीमाशंकर मंदिर परिसराचे पावसाळ्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित बांधकामांवर तातडीने अंकुश आणण्याची गरज आहे.  अन्यथा भीमाशंकरचे देखील ‘माळीण’ वा ‘जोशीमठ‘ होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. दुदैवाने तो दिवस दूर नाही. या परिसरात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे, ते अटळच आहे. ते कोणीही रोखू शकत नाही. 

जुलै २०२१ च्या पावसाळयात भीमाशंकर अभयारण्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडला होता. उगमस्थानीच भीमा नदीला आलेल्या पावसाच्या पुराच्या पाण्याने भीमाशंकर मंदीराला वेढा घातला होता. धक्कादायक बाब म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात देखील जमीनीखालून पाणी शिरले होते. या पाण्यात महादेवाची पिंड अक्षरश: बुडाली होती. तरीदेखील कुणालाच शहाणपण येत नाही. 

गेल्या काही दिवसांपासून सदर खोदाई चालू आहे. रात्रीच्या वेळेस काम अधिक वेगात केले जात आहे. या मंदिराचे जे प्रमुख दोषी व निलंबित विश्वस्त आहेत, त्यांच्याच पुढाकाराने सदर काम चालू आहे. सदर मंदिरावर याच ठराविक माजी दोषी व निलंबित विश्वस्तांची मालकी प्रस्थापित झालेली आहे. दोषी व निलंबित असूनही याच विश्वस्तांच्या ताब्यात मंदिराचे व्यवस्थापन व नियंत्रण आहे. या लोकांवर कुणाचेच नियंत्रण नाही. 

खेड व आंबेगांव या दोन्ही तालुक्यांचे लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेतात. या लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळेच संबंधित दोषी व निलंबित माजी विश्वस्तांची मनमानी व मुजोरी चालू आहे. 

गेली कित्येक वर्षे पिंडीवरचे, पिंडीच्या चोहोबाजूंचे, मंदिराच्या गाभाऱ्यातील, नंदी समोरचे तसेच मंदिराच्या आवारात जिथे जिथे खाद्य उपलब्ध आहे, ते सर्वच गिळंकृत करून सर्वार्थाने गलेलठ्ठ व मुजोर झालेल्या या विंचवांच्या नांग्या चांगल्या पद्धतीने ठेचल्याशिवाय मंदिराची वर्षानुवर्षे अविरतपणे, अव्याहतपणे जी प्रचंड प्रमाणात लूट सुरू आहे, ती अजिबात थांबणार नाही. दानात मिळणाऱ्या महागड्या अशा मौल्यवान पिवळ्या धातूंपासून ते किमती वस्तू, नारळ, पैसे, नैवेद्य, तसेच इतरही अनेक प्रकारच्या वस्तू गिळंकृत केल्या जात आहेत. गर्दीच्यादिवशी भाविकांकडून दोन ते चार चार हजार रूपये घेऊन दिल्या जाणाऱ्या थेट दर्शनाच्या नावाखाली लाखो रूपयांची माया गोळा केली जात आहे. यावर कुणाचाच अंकुश नाही. सर्वकाही निरंकुशपणे सुरू आहे. 

सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून यावर काहीतरी जालीम उपाय केला जाईल, अशी भाबड्या व श्रध्दाळू भाविकांनी अपेक्षा ठेवली होती. परंतू ती फोल ठरलेली आहे. 

त्यामुळेच या मंदिर व्यवस्थापनात ज्या काही अनियमितता, अनागोंदी कारभार झालेला आहे, चालू आहे, तो जर थांबवायचा असेल तर या मंदिराचे व्यवस्थापन मान. जिल्हा न्यायाधीश यांच्या ताब्यात देणे अतिशय गरजेचे आहे. मान. न्यायालयाच्या ताब्यात या देवस्थानचे व्यवस्थापन दिल्याशिवाय या मंदिराची गेली कित्येक वर्ष बिनदिक्कतपणे व राजरोसपणे चालू असलेली लूट थांबणार नाही.