खेड तालुक्याचा उ.~~ प्र. आणि बि~~हार होण्यापासून रोखा…
द्वारा… अतुल दत्तात्रय काळे
भीमा व भामा या दोन नद्यांच्या समृद्ध खोऱ्यात विभागणी झालेला खेड तालुका उत्तर पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो. श्री क्षेत्र भीमाशंकर व आळंदी या दोन तीर्थक्षेत्रांमुळे राज्यातील तसेच परराज्यातील भाविकांची दर्शनासाठी या तालुक्यात वर्षभर वर्दळ चालूच असते. श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा वाफगांव येथील ऐतिहासिक वाडा, तसेच बडोदा येथील श्रीमंत महाराजा गायकवाड सरकारांची पहिली गादी असलेला भव्य वाडा आजही दावडी येथे मोठ्या दिमाखात उभा आहे. थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळही याच तालुक्यातील. हुतात्मा राजगुरू यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची प्रेरणा भावी पिढयांना मिळावी तसेच त्यांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून तालुक्याच्या ठिकाणाला राजगुरुनगर हे नाव देण्यात आलेले आहे. राजगुरुनगर येथे भिमातीरी आजही राजगुरूंचा भव्य असा वाडा दिमाखात उभा आहे.
तसे पाहीले तर खेड तालुका हा अनेक ऐतिहासिक व इतिहासकालीन घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे.
दुसरीकडे पुणे व पिंपरी चिंचवड या दोन मोठ्या शहरांपासून हाकेच्या अंतरावरील खेड तालुक्यातील चाकण परिसरात मोठी औद्योगिक वसाहत निर्माण झालेली आहे.
या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याचे कारण म्हणजे सध्या राज्य विधानसभा निवडणुकीची धामधूम मोठ्या जोरात सुरू आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात देखील विविध राजकीय पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांकडून प्रचाराची राळ उडवून देण्यात आलेली आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदारसंघातील सुज्ञ व सुजाण मतदारांनी तालुक्याच्या विकासाबरोबरच तालुक्याच्या भल्याचा व भविष्याचा सारासार विचार करून कोणत्याही योग्य, सुसंस्कृत व जनतेला त्रासदायक न ठरणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याची गरज व्यक्त होत आहे. निवडणूकीपुरता विचार न करता पाच वर्षांचा विचार करण्याची गरज आहे. जेणेकरून तालुक्यात शांतता राखली जाईल.
यापूर्वी सत्तेच्या जोरावर राजकीय विरोधकांना तसेच विरोधातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील दहशत निर्माण करणारे काही जण पुन्हा निवडणूकीला सामोरे जात आहेत. हे तालुक्यातील जनता अद्याप विसरलेली नाही. माणसाचा मूळ स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेला ‘अच्छे दिनाचे’ स्वप्न दाखविण्यात आले होते. परंतू अच्छे दिन कोसो मैल दूरच आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करून, पाच वर्षे पस्तावण्याची वेळ येऊ नये, यासाठी योग्य उमेदवार निवडण्याची काळजी जनतेने घेण्याची गरज आहे. उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेण्याची गरज आहे. भले तो राजकिय का गुन्हा असेना. त्यामुळे एकही गुन्हा नसलेल्या कोणत्याही उमेदवाराला तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी देण्याची गरज व्यक्त होत आहे. हे तालुक्यातील भावी पिढ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
दरम्यान तालुक्याची सुत्रे चुकीच्या व अयोग्य व्यक्तीच्या हातात गेली तर, तालुक्याची शांतता भंग पावून तालुक्याचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडून जाण्याची भीती जेष्ठ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. परिणामी दहशतीच्या जोरावर तालुक्यात गुंडाराज निर्माण होऊन तालुक्याचा उ.~~प्र. व बि~~हार होण्यास वेळ लागणार नाही, अशीही चर्चा तालुक्यात सुरु आहे.
तसेच काही उमेदवारांकडून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मद्याची रेलचेल उपलब्ध करून देण्यात आली असून मंडळांना विविध वस्तूंचे, पैशांचे वाटप सुरु असल्याचे बोलले जात आहे. गाव गणंगाना हाती धरुन संबंधित उमेदवारांचा विजयाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे उमेदवार निवडूनच येऊ नये, यासाठी काही सुज्ञ मतदारांकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे समजते. कारण सर्वसामान्य जनतेला शांततेची व प्रगतीची आवश्यकता आहे.
गेल्या काही वर्षांचा विचार केला तर चाकण परिसरात शेकडो लहान मोठ्या कंपन्या उभारण्यात आलेल्या आहेत. यामध्ये जागतिक वाहन निर्मिती क्षेत्रातील बड्या कंपन्याचा देखील समावेश आहे. बहुतांश कंपन्यामधील विविध कामांच्या ठेकेदारीत सर्वच राजकीय पक्षांचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व काही स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी सक्रीय आहेत. दुसरीकडे या कंपन्यांमध्ये स्थानिक सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना कामांचे ठेके वा नोकऱ्या का मिळू शकत नाही? त्यातच खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित करण्यात आल्यामुळे तालुक्यातील जमिनींना सोन्याचा भाव आला होता. त्यामुळे जमिनींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्या कालावधीत काही लोकप्रतिनिधी, विविध पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या अक्षरशः शेकडो एकर जमिनी स्वस्तात म्हणण्यापेक्षा फुकटातच व दहशतीच्या जोरावर लुटलेल्या आहेत. अनेकांनी अशिक्षित शेतकऱ्यांना फसवून कागदपत्रांवर त्यांचे अंगठे घेऊन जमीनी बळकावलेल्या आहेत. धरणग्रस्तांच्या जमिनी कुणी कुणी लाटल्या? काही जणांनी तर चाकण औद्योगिक वसाहतीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या परताव्याच्या जमीनीवर देखील डल्ला मारलेला आहे. आणि दुर्दैवाने असे पदाधिकारी येनकेनप्रकारे विविध निवडणूका जिंकून जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून उजळ माथ्याने वावरत आहेत. एकिकडे शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करायच्या, त्यांना देशोधडीला लावायचे व स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी, हितचिंतक समजायचे.
त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, नागरिकांनी बळी न पडता अशा प्रवृत्तीला दूर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.