श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या निधीचा विनियोग कधी होणार?
By अतुल दत्तात्रय काळे
सहावे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट स्थापन होऊन सतरा वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटलेला आहे. देवस्थानकडे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी पडून आहेत. मात्र तरीही देवस्थान समितीला भाविकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी व स्वच्छतागृहासारख्या प्रार्थमिक सुख-सुविधा पाहिजे त्या प्रमाणात निर्माण करण्यात सातत्याने अपयशच आलेले आहे. स्व:हित, पदाधिकारी व विश्वस्तांची मनमानी, दूरदृष्टीपणा व निर्णयक्षमतेचा अभाव तसेच नको तेवढा राजकीय हस्तक्षेप, सुरक्षारक्षकांचा मुजोरपणा, या भाऊगर्दीत भाविकांना सुखसुविधा देण्यात कुणालाच स्वारस्य नाही.
त्यातच देवस्थानचे बहुतांश विश्वस्त हे लाभार्थी देखील आहेत. त्यामुळे अशा विश्वस्तांकडून भाविकांनी अपेक्षा ठेवणेच चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. देवस्थान म्हणजे आमचीच जहागिरी असल्याचा काही विश्वस्तांचा समज झालेला आहे. याबाबत भाविकांमध्ये मोठा असंतोष पाहावयास मिळतो. तसेच मंदिर व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आनंदीआनंदच आहे. कोट्यावधींचा निधी बॅंकेत ठेवण्यापेक्षा भाविक-पर्यटकांना लागणाऱ्या प्रार्थमिक सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच परिसरातील आदिवासी गावांच्या विकासासाठी वापरला जावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व भाविकांची आहे. परंतु याबाबत देवस्थानकडून सकारात्मक प्रयत्नच केले जात नाहीत. त्यामुळे विश्वस्तांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शासनाने देवस्थान ताब्यात घ्यावे. देवस्थानला मिळणाऱ्या विविध देणग्यांचा व मौल्यवान वस्तूंचा विनियोग कशाप्रकारे होतो, याची सखोल चौकशी व्हावी, अशी चर्चा भाविकांमध्ये आहे. तसेच देवस्थानच्या कारभारात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्यासाठी देवस्थानचे अध्यक्षपद जिल्हा न्यायाधिशांकडे द्यावे, अशी मागणी काही भाविकांकडून केली जात आहे.
दरम्यान श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने सुमारे दिडशे कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिलेली आहे. मात्र प्रस्तावित विकासकामे नेमक्या कोणकोणत्या जागेत केली जाणार आहेत, याबाबत नीट स्पष्टता होत नाही. मंदिराच्या आजूबाजूची सर्व जमीन खाजगी असून भोवताली वन्यजीव विभागाच्या मालकीची जमीन आहे. वन्यजीव विभागाच्या जमिनीत प्रस्तावित कामांसाठी जागा मिळणे, अवघड आहे. तसेच कोणतीही भूसंपादन प्रक्रिया न करता संबंधित खाजगी जमिनीत विकासकामे करणे, नियमबाह्य असेल. मात्र असे असूनही काही कामे करण्यात आलेली आहेत. दुसरीकडे मंदिर परिसरात पूर्वीपासूनच
जी मोठ्या प्रमाणातील बांधकामे झालेली आहेत, ती सर्व बेकायदेशीर आहेत.
दरवर्षी लाखो भाविक व पर्यटक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येत असतात. भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्या व अभिषेक रकमेच्या माध्यमातून लाखो रुपये देवस्थानला मिळतात. अभिषेकरुपी मिळणाऱ्या रकमेत लाभार्थी असलेल्या काही विश्वस्तांचा मोठा वाटा आहे. आणि तशी तरतूद ट्रस्टच्या घटनेतच करुन ठेवलेली आहे. परंतु त्या तुलनेत देवस्थानकडून भाविकांच्या सुख सुविधांकडे दुर्लक्षच केले जाते. भाविकांना मंदिर परिसरात बसण्यासाठी वा आराम करण्यासाठी जागाच नाही. पावसाळ्यातच तर भाविकांचे खुप हाल होतात. याचा जेष्ठ भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेषत: महिला वर्गाला याठिकाणी मोठ्या प्रमाणात असुविधांचा सामना करावा लागत आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी यासारख्या अतिमहत्वाच्या व्यक्ती दर्शनासाठी भीमाशंकर येथे वारंवार येत असतात. परंतु त्यांच्यासाठी येथे साध्या स्वच्छतागृहाची देखील सोय नाही.
मुळातच मंदिर हे अभयारण्य क्षेत्रात आहे. अभयारण्य व लगतच्या क्षेत्रातील गावांमध्ये राहणारा बहुतांश समाज हा आदिवासीबहूल आहे. याभागात आरोग्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ व भाविकांच्या सोयीसाठी एखाद्या गावात सुसज्ज हाॅस्पिटलची सुविधा निर्माण करणे आत्यंतिक गरजेचे आहे. मात्र देवस्थानने या महत्वाच्या सामाजिक दायित्वाकडे नेहमीच दुर्लक्ष केलेले आहे. तसेच परिसरातील आदिवासी मुलांमुलींना शैक्षणिक वा इतर कोणत्याही कारणास्तव देवस्थानच्या निधीतून आवश्यक ती मदतच केली जात नाही. तसेच नैसर्गिक आपत्ती अथवा राष्ट्रीय संकटाच्या वेळी धर्मादाय कारणासाठीचा निधी वापरणे आवश्यक असते. परंतू अद्यापपर्यंत यासाठी तो निधी वापरलाच गेलेला नाही. धक्कादायक म्हणजे भीमाशंकरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माळीण दुर्घटनेत दिडशे ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला होता. वास्तविक पाहता या दुर्घटनेत मरण पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना देवस्थानकडून कर्तव्य म्हणून आर्थिक मदत देणे अपेक्षित होते. देवस्थानचे अध्यक्षपद आमदार दिलीप वळसे यांच्याकडेच होते. मात्र देवस्थानकडून बाधितांना एक छदामही मदत देण्यात आलेला नाही.
सामाजिक दायित्व म्हणून या देवस्थानकडून एक रूपयाची देखील मदत कोणत्याच सामाजिक कारणांसाठी आजपर्यंत देण्यात आलेली नसल्याचे समजते. वास्तविक पाहता भाविकांसाठी देवस्थानने स्वत:च्या मालकीच्या किमान मुलभूत सुविधा तरी निर्माण करण्याची गरज असता त्याकडे दुर्लक्षच करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने रूग्णवाहिका, अग्निशमन गाडी, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, कचरा उचलणारी वाहने, स्वच्छतेची उपकरणे, आपत्कालीन व्यवस्था उभारणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण करणे, चांगल्या पद्धतीची स्वच्छतागृहे, यासारख्या मुलभूत बाबींचा समावेश आहे. तसेच वयोवृद्ध भाविकांना येथे व्हिलचेअरची गरज आहे. परंतु विश्वस्तांना या गोष्टींचा विसर पडलेला आहे. गमंत म्हणजे या विश्वस्तांमध्ये दोन विद्यमान आमदार व एका माजी खासदाराचा समावेश आहे. ‘बोलाचीच कढी व बोलाचाच भात’.. दुसरे काय?