महिलांचे दागिने हिसकाणाऱ्या दोघांना अटक

khed police station

राजगुरुनगर… दुचाकीवरुन येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या आरोपींना अखेर खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विकास भाऊसाहेब गायकवाड (वय ३७, रा. आळेफाटा, ता. जुन्नर) व संदिप सुखदेव शिंदे (वय २५, रा. भोजपुरी, ता.संगमनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. खेड उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी ही माहिती दिली.

याबाबतची माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून राजगुरुनगर शहर परिसरात मोटारसायकलवर येऊन रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून धुम स्टाईलने पोबारा करणारे चोरटे सक्रिय होते. अशा प्रकारच्या सहा घटना घडल्या होत्या. यामुळे महिला वर्गात मोठी दहशत पसरली होती. ज्या ज्या भागात महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या होत्या, त्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी तपासले असता दुचाकीच्या नंबरप्लेटवर ‘दादा’ असे नाव लिहिलेले आढळून आते होते.

दरम्यान पकडण्यात आलेले आरोपी संशयित दुचाकीवरून तिन्हेवाडी रस्त्यावरील तालुका क्रीडासंकुल परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरत असल्याचे शुक्रवारी (दि. २२) दुपारी पोलिस हवालदार शिवाजी बनकर आणि विकास पाटील यांना दिसले. पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पळून जात असताना आरोपी गतीरोधकावरून घसरुन खाली पडले. त्यानंतर दोनही आरोपी गाडी सोडुन पळाले आणि परीसरातील बाजरीच्या पिकात जाऊन लपले. या घटनेची खबर पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांना मिळताच पोलिस ठाण्यातील उपस्थित अधिकारी आणि पोलिसांनी पिकांना ग्रामस्थांच्या सहकार्याने वेढा देऊन पिकात लपलेल्या दोन्ही आरोपींना जेरबंद करुन ताब्यात घेतले.आरोपीकडे असलेली दुचाकी (क्रंमाक एमएच १७ बीएफ ४७८१) ही गाडी चोरुन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर आरोपींकडुन जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची एकुण किंमत २ लाख ७१ हजार रुपये इतकी आहे. तसेच ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण तीन लाख एक हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.